जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 2 October 2020

माझे कुटुंब-माझी जबाबदारी- माझी जनजागृती

 

3 ऑक्टोबरला गृह भेटीतून कुटुंबांना मिळणार माहिती

१० हजार स्वयंसेवक-प्रचारक पोहचणार १ लाख कुटुंबापर्यंत

संपूर्ण जग आज कोरोना विषाणू संसर्गाच्या विळख्यात सापडले आहे. जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचा शिरकाव झाल्याने अनेकांना त्याची बाधा झाली आहे. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच या विषाणूंमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीला या आजाराची माहिती व्हावी आणि आपण कुठली काळजी घ्यावी यासाठी राज्य शासनाने या आजाराविषयी  शिक्षण देणारी माझे कुटुंब - माझी जबाबदारी ही मोहीम राज्यात सुरू केली आहे.

         गोंदिया जिल्हा राज्याच्या राजधानीपासून कोसो दूर असलेला जिल्हा. मागास,दुर्गम, आदिवासी बहुल आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या जिल्ह्यात कोरोनाला हद्दपार करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्यातून घेतला आहे. या मोहिमेत एक पाऊल पुढे जाऊन जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्या संकल्पनेतून  3 ऑक्‍टोबर रोजी "माझे कुटुंब - माझे जबाबदारी- माझी जनजागृती" हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. लोकसहभागातून करण्यात येणाऱ्या या जनजागृती मोहिमेत १० हजार स्वयंसेवक व प्रचारक सुरक्षित अंतर राखून गृहभेटीतून ही मोहीम राबविणार आहे.

         एक प्रचारक किमान दहा कुटुंबांना भेट देऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेबाबत माहिती देणार आहे. कोरोना विषाणूची बाधा होऊ नये म्हणून प्रत्येकाने शरीराचे तापमान व ऑक्सीजन पातळी मोजावी. सतत मास्क घालून राहावे.मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडून नये.दर दोन-तीन तासांनी सतत हात साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावे. ते शक्य नसल्यास सॅनीटायझरचा वापर करावा. नाक,तोंड,डोळे यांना वारंवार हात लावू नये. ताप आल्यास तसेच सर्दी, खोकला, घसा दुखणे,थकवा अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी. मधुमेह, हृदयविकार,किडनी आजार,लठ्ठपणा असल्यास दररोज तापमान व ऑक्सिजनची पातळी मोजावी. तापमान ९८.६ पेक्षा जास्त असल्यास जवळच्या फीवर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करावी.सध्या सुरू असलेले आजारपणातील उपचार सुरू ठेवावेत.खंड पडू देऊ नये. डॉक्टरांकडून नियमित तपासणी करावी. कोरोना बाधित असलेल्या व्यक्तींनी होम आयसोलेशनमध्ये राहावे. घराबाहेर पडू नये.

          दर दोन तासांनी हात साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावेत. स्वतंत्र टॉयलेट, बाथरूम व जेवणाची भांडी वापरावी. कपडे स्वतंत्र धुवावे.ताप व थकवा जाणवल्यास रुग्णालयात जाऊन तपासणी करावी. कोविड होऊन गेलेल्या व्यक्तीने रुग्णालयातून येऊन पुन्हा सात दिवस घरी होम आयसोलेशनमध्ये राहावे.कोविड-19 आजार होऊन गेला म्हणून वैयक्तिक प्रतिबंधाच्या बाबीकडे दुर्लक्ष करू नये. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडणी आजार इत्यादी आजार असल्यास आजारावर वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू आहे याची खात्री करावी.

         कोविड-19 मधून बरे झालेल्या व्यक्तीस प्लाजमा दान करावयाचा असल्यास एसबीटीसी या संकेतस्थळाची माहिती द्यावी आणि त्यासाठी संदर्भित करावे .अशा प्रकारची माहिती १० हजार स्वयंसेवक- प्रचारक एक लाख कुटुंबांना तीन ऑक्टोंबर रोजी देणार आहे.

         ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरावर,उपविभागीयस्तरावर, आणि तालुकास्तरावर बैठका घेण्यात आल्या आहेत.यासाठी जिल्ह्यातील नागरिक,सेवाभावी संस्था, पदाधिकारी समाजातील विविध घटकांचे सहकार्य लाभत आहे.या मोहिमेचा प्रचार प्रसिद्धीसाठी सेवाभावी संस्थांनी प्रचार साहित्य स्वयंस्फूर्तीने तयार केले आहे.भेट देऊन जनजागृती केलेल्या कुटुंबाबाबतचा अहवाल संकलीत करण्यासाठी प्रपत्र विहित करून दिलेले आहे. माझे कुटुंब- माझी जबाबदारी या अभियानात ही नावीन्यपूर्ण मोहीम मैलाचा दगड ठरणार आहे हे मात्र निश्चित.

00000


No comments:

Post a Comment