जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 6 October 2020

भविष्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता नियोजन करा - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

 



गोंदिया येथे कोरोना परिस्थितीचा आढावा

 

गोंदिया दि ६(जिमाका)कोरोना या जागतिक महामारीमुळे संपूर्ण जग आज त्रस्त झाले आहे.प्रत्येकाने वेळीच सावध होऊन कोरोनाच्या  संसर्गापासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.१५ ऑक्टोबरनंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने विविध यंत्रणांना सोबत घेऊन आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

  आज ६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील कोरोना बाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतांना श्री पटोले बोलत होते. यावेळी आमदार विनोद अग्रवाल,आमदार सहसराम कोरोटे, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे,पोलीस अधीक्षक विश्व पानसरे,अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

  श्री पटोले पुढे म्हणाले,आरोग्य यंत्रणेने बाधित रुग्णांवर वेळीच उपचार करावे. सोबतच मृत्यूदर कमी करण्यासाठी काम करावे. जिल्ह्यातील बाधित रुग्ण उपचारातून बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. जिल्ह्यात कोरोना आजाराशी लढा देण्यासाठी प्रशासनाने नवीन अधिकारी नेमून दिले आहे. संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी ऊर्जेने काम करावे.त्याचप्रमाणे संसाधनांची उपलब्धता करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

  जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे कार्ड असलेल्या व्यक्तींना मोफत उपचार मिळत असल्याची माहिती लोकांपर्यंत आरोग्य विभागाने पोहोचवावी असे सांगून श्री पटोले पुढे म्हणाले,खाजगी रुग्णालयांकडून आवश्यक तेवढ्याच बिलाची आकारणी व रुग्णांची समस्या सोडविण्यासाठी आणि खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांची या काळात लूट होणार नाही याकडे प्रशासनाने विशेष लक्ष दयावे. खाजगी रुग्णालयांचे सनियंत्रण करावे. नागरिकांची किंवा रुग्णाची तक्रार येणार नाही. रुग्णालयाच्या आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. तसेच बाहेर डिस्प्ले बोर्ड लावावेत.त्यामुळे नागरिकांना माहिती मिळण्यास मदत होईल.२४ तास सुरू असलेल्या नियंत्रण कक्षात तक्रार करणाऱ्या नागरिकांना संपूर्ण माहिती दिली जावी असेही श्री पटोले यावेळी म्हणाले.

 जिल्ह्यातील धान खरेदी प्रकरणी चौकशी समिती पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात यावी. या समितीमध्ये अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे सदस्य असतील. अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात यावे. जिल्ह्यात प्रलंबित असलेले वनहक्क पट्टे योग्य ती कार्यवाही त्वरित करून संबधितांना वितरित करण्यात यावे.असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

  आमदार अग्रवाल म्हणाले,मागील पंधरा दिवसात आरोग्य यंत्रणेच्या  कामात सुधारणा झाली आहे. परंतु अजूनही कामात सुधारण्याची आवश्यकता आहे. कोरोना बाधित गर्भवती महिलांची प्रसूती पूर्वी इथे होत नव्हती आता प्रसूती इथे करण्यात येत आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदे त्वरित भरल्यास आरोग्य यंत्रणेवर ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.

  आमदार कोरोटे म्हणाले,आपल्या स्थानिक विकास निधीतून आरोग्य यंत्रणा सुदृढ करण्यासाठी १० लक्ष रुपये निधी देण्यात आला आहे. यातून खरेदी केलेली सामग्री देवरी मतदारसंघात कोणत्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे त्याची माहिती मिळाल्यास रुग्णांना तेथे उपचार घेण्याकरीता जाण्याबाबत कळविण्यात येईल. असे ते म्हणाले.

 जिल्हाधिकारी  श्री.मीना यांनी जिल्ह्यातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीची माहिती संगणकीय  सादरीकरणातून विधानसभा अध्यक्षांना दिली.२४ तासात सकारात्मक रुग्णांचा तपासणी अहवाल मिळत असून राष्ट्रीय पोर्टलवर देखील अद्यावत माहिती देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

  अपर जिल्हाधिकारी खवले यांनी जिल्ह्यात ३ ऑक्टोबर रोजी माझे कुटुंब- माझी जबाबदारी -माझी जनजागृती या मोहिमेतून करण्यात आलेल्या जनजागृतीबाबतची माहिती दिली.जिल्ह्यातील ७४ टक्के कुटुंबापर्यंत एका दिवशी पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

  सभेला निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी राहुल खांडेभराड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके,अमरिश मोहबे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शाम निमगडे,जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे,जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांची यावेळी उपस्थिती होती.

00000


No comments:

Post a Comment