जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday 3 October 2020

माझे कुटुंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृती नाविन्यपूर्ण उपक्रमातून 2 लाख २८ हजार कुटुंबांना गृहभेटीतून मिळाली माहिती

१० लाख ४७ हजार ७४२ नागरिकांना माहिती मिळण्यास मदत

१९ हजार ५३६ अधिकारी-कर्मचारी व स्वयंसेवकांचा सहभाग






 जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडून कोरोनाला जिल्ह्यातुन हद्दपार करण्यासाठी आज  ३ ऑक्टोबर रोजी माझे कुटुंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृती या मोहिमेअंतर्गत १९ हजार ५३६ अधिकारी-कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी जिल्ह्यातील २ लाख २८ हजार ४ कुटूंबांच्या गृहभेटी घेऊन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तसेच या विषाणूंमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी तसेच आपण कुठली काळजी घ्यावी याविषयीची माहिती दिली. त्यामुळे या कुटुंबाच्या माध्यमातून १० लाख ४७ हजार ७४२ नागरिकांपर्यंत माहिती पोहोचण्यास मदत झाली आहे. या मोहिमेत जिल्ह्यात कोरोनाचा आलेख कमी होण्यास निश्चितच मदत होणार असून लवकरच कोरोना जिल्ह्यातून हद्दपार होण्यास हातभार लागेल.

      राज्य शासनाने या आजाराविषयी  शिक्षण देणारी माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम राज्यात सुरू केली. याच मोहिमेचा एक भाग म्हणून आज ३ ऑक्टोबर रोजी  जिल्हा प्रशासनाने लोकांच्या सहभागातून या मोहिमेत एक पाऊल पुढे टाकून जिल्हाधिकारी मीना यांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे "माझे कुटुंब-माझे जबाबदारी-माझी जनजागृती" या नाविन्यपूर्ण उपक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. १० हजार अधिकारी-कर्मचारी व स्वयंसेवकांचा या मोहिमेत सहभाग अपेक्षित असतांना प्रत्यक्षात मात्र १९ हजार ५३६ जणांनी यामध्ये सहभाग घेतला. १ लाख कुटुंबाला गृहभेटीचे नियोजन असतांना प्रत्यक्ष २ लाख २८ हजार ४ कुटुंबाला गृहभेटी देण्यात आल्या. यामधून जिल्ह्यातील १० लाख ४७ हजार ७४२ नागरिकांपर्यंत या मोहिमेच्या माध्यमातून कोरोना विषयक जनजागृती करण्यास मदत झाली.

       गोंदिया तालुक्यात ३४२७ अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवकांनी ४३ हजार ७९२ कुटुंबांना भेटी दिल्या. या भेटीतून २ लाख ८ हजार ९५६ नागरिकांना, तिरोडा तालुक्यातील २६१४ अधिकारी-कर्मचारी व स्वयंसेवक यांनी ३६ हजार २९७  कुटुंबांना भेटी दिल्या. यामधून १ लाख ४५ हजार १८८ नागरिक,गोरेगाव तालुक्यात १८५७ अधिकारी-कर्मचारी व स्वयंसेवकाने १९२८९ कुटुंबाना भेटी दिल्याने ८२ हजार २३२ नागरिक, आमगाव तालुक्यात २१४८ अधिकारी कर्मचारी व स्वयंसेवकांनी २७ हजार २८ कुटुंबांना भेटी दिल्या यातून एक लाख २२ हजार ४६५ नागरिक, सालेकसा तालुक्यातील १३८३ अधिकारी कर्मचारी व स्वयंसेवकांनी १५ हजार ३९४ कुटुंबांना भेटी दिल्या यामधून ७४ हजार २०८ नागरिक, देवरी तालुक्यात १७९८ अधिकारी कर्मचारी व स्वयंसेवकांनी १९ हजार २९१ कुटुंबांना भेटी दिल्या यामधून १ लाख १८ हजार ४५० नागरिक, सडक-अर्जुनी तालुक्यात १७३० अधिकारी-कर्मचारी व स्वयंसेवक यांनी १८ हजार ९८१ कुटुंबांना भेटी दिल्या यामधून ७५ हजार ९२४ नागरिक आणि अर्जुनी/ मोरगाव तालुक्यात २५७९ अधिकारी-कर्मचारी व स्वयंसेवक यांनी २७ हजार ९३२ कुटुंबांना भेटी दिल्या यामधून १ लाख २० हजार ३१९ नागरिकांना माहिती मिळण्यास मदत झाली आहे.

अधिकारी-कर्मचारी व स्वयंसेवकांनी किमान दहा कुटुंबांना भेट घेऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेबाबत माहिती दिली. कुटुंबातील व्यक्तीला कोरोना विषाणूची बाधा होऊ नये यासाठी प्रत्येकाने शरीराचे तापमान व ऑक्सीजन पातळी मोजावी. सातत्याने तोंडाला मास्क घालून राहावे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडून नये. दर दोन-तीन तासांनी सतत हात साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावे. तसे करणे शक्य नसल्यास सॅनीटायझरचा वापर करावा. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नये. ताप आल्यास तसेच सर्दी, खोकला, घसा दुखणे, थकवा अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी. मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा असल्यास दररोज तापमान व ऑक्सिजनची पातळी मोजावी. तापमान ९८.६ पेक्षा जास्त असल्यास जवळच्या फीवर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करावी. सध्या सुरू असलेले आजारपणातील उपचार सुरू ठेवावेत. खंड पडू देऊ नये. डॉक्टरांकडून नियमित तपासणी करावी. कोरोना बाधित असलेल्या व्यक्तींनी होम आयसोलेशनमध्ये राहावे. घराबाहेर पडू नये. स्वतंत्र टॉयलेट, बाथरूम व जेवणाची भांडी वापरावी. कपडे स्वतंत्र धुवावे. ताप व थकवा जाणवल्यास रुग्णालयात जाऊन तपासणी करावी. 

       कोविड होऊन गेलेल्या व्यक्तीने रुग्णालयातून येऊन पुन्हा सात दिवस घरी होम आयसोलेशनमध्ये राहावे. कोविड-१९ चा आजार होऊन गेला म्हणून वैयक्तिक प्रतिबंधाच्या बाबीकडे दुर्लक्ष करू नये. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनी आजार इत्यादी आजार असल्यास या आजारावर वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू आहे याची खात्री करावी. कोविड-१९ मधून बरे झालेल्या व्यक्तीस प्लाजमा दान करावयाचा असल्यास एसबीटीसी या संकेतस्थळाची माहिती आदी माहिती गृहभेटी देणाऱ्या अधिकारी-कर्मचारी व स्वयंसेवकांनी गृह भेटीदरम्यान कुटुंबांना दिली.

       ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरावर, उपविभागीयस्तरावर, आणि तालुकास्तरावर बैठका घेण्यात आल्या. यासाठी जिल्ह्यातील नागरिक, सेवाभावी संस्था, पदाधिकारी समाजातील विविध घटकांचे सहकार्य मिळाले. गृहभेट देऊन जनजागृती केलेल्या कुटुंबाबाबतचा अहवाल विहित प्रपत्रात संकलीत करण्यात आला. माझे कुटुंब- माझी जबाबदारी या अभियानात ही नावीन्यपूर्ण मोहीम मैलाचा दगड ठरली. आजच्या या आरोग्यविषयक मोहिमेला जिल्ह्यात लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले.

00000

 

 

No comments:

Post a Comment