जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 30 July 2019

नाविण्यपुर्ण कामे खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून करावी - पालकमंत्री डॉ.परिणय फुके

जिल्हा खनिज प्रतिष्ठान सभा

          जिल्ह्यातील गौण खनीज स्वामित्वधनातून खनीज प्रतिष्ठामध्ये जमा होणाऱ्या निधीतून नाविण्यपूर्ण कामे करण्यात यावी. असे निर्देश पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी दिले.
        आज 30 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा खनीज प्रतिष्ठान सभेत पालकमंत्री डॉ.फुके बोलत होते. यावेळी खासदार सुनिल मेंढे, आमदार सर्वश्री इंजि.राजकुमार बडोले, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा खनिकर्म अधिकारी राजविलास गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती.
         पालकमंत्री डॉ.फुके म्हणाले, या निधीतून सूचविलेली जुनी सर्व कामे रद्द करण्यात यावी. रेती घाटावरुन रेती चोरी होणार नाही. त्यामुळे मोठा महसूल बुडणार नाही यासाठी त्यावर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक ड्रोन कॅमेरा खरेदी करण्यासाठी आणि रेती घाटावर निरिक्षण मनोरे उभारण्यासाठी या प्रतिष्ठानचा मोठा निधी त्यासाठी राखीव ठेवावा. ज्या लेखाशिर्षातून निधी मिळत नाही अशी नाविण्यपूर्ण कामे या निधीतून करण्यात यावी. तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा ते एलोरा दरम्यानच्या रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.
         खासदार मेंढे यांनी या निधीतून ज्या गावात व ज्या ठिकाणी कामे करण्यात येणार आहे ती कामे गुणवत्तापूर्ण असली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन आवश्यक त्या ठिकाणी हा निधी देण्यात यावा असे ते म्हणाले.
       आमदार बडोले यांनी खनीज प्रतिष्ठानच्या निधीतून जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील कामांसाठी निधीची मागणी केल्यास प्राधान्यक्रम ठरवावा असे सांगितले.
       आमदार रहांगडाले म्हणाले, ज्या ग्रामपंचायत अंतर्गत रेतीघाट आहे त्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांना निधी उपलब्ध करुन दयावा. या निधी मागणीसाठी परस्पर येणारे प्रस्ताव मंजूर करु नये. घाटकुरोडा ते एलोरा या 8 कि.मी. रस्त्याची दुरुस्ती या निधीतून करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
        जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी खनिकर्म, खनीज प्रतिष्ठानच्या निधीतून शासकीय कामासाठी उच्च प्राधान्य बाबीसाठी 60 टक्के निधी खर्च करण्याबाबत शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे शिक्षण, आरोग्य व पिण्याचे पाणी या बाबीसाठी प्राधान्य असल्याचे सांगितले.
        जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री.गजभिये यांनी जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठानमध्ये जून 2019 अखेर 4 कोटी 47 लाख 94 हजार 500 रुपये निधी जमा असल्याचे सांगितले. सन 2017-18 आणि 2018-19 या वर्षात वाळूघाटाच्या पर्यावरण व खानकाम आराखडा अंतर्गत 25 लाख 59 हजार 600 रुपये इतका खर्च झाला असून 3 कोटी 99 लाख 95 हजार 175 रुपये शिल्लक असल्याचे सांगितले.
        जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 131 गावातून 4 कोटी 47 लाख 94 हजार 500 रुपये इतका निधी जमा करण्यात आला आहे. यापैकी 60 टक्के निधी 2 कोटी 68 लाख 76 हजार 700 रुपये उच्च प्राथम्य बाबीमध्ये पिण्याचे पाणी, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, महिला व बालकल्याण या बाबीसाठी राखून ठेवण्यात आला आहे. तर 40 टक्के निधी 1 कोटी 79 लाख 17 हजार 800 रुपये अन्य प्राथम्य बाबीसाठी अर्थात रस्ते, पुल, जलसंपदाची कामे, पर्यावरण दर्जा वाढ, ऊर्जा व पाणलोट क्षेत्र विकासासाठी राखून ठेवण्यात आल्याची माहिती श्री.गजभिये यांनी दिली.

No comments:

Post a Comment