जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday 15 July 2019

योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळाला पाहिजे - पालकमंत्री डॉ.परिणय फुके

पंडीत दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ



      शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. त्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी केले.
        आज 15 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने आयोजित पंडीत दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ.फुके यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, भारतीय सनदी सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी रोहण घुगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
         पालकमंत्री डॉ.फुके पुढे म्हणाले, जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत 78 हजार 984 पात्र लाभार्थी आहेत. त्यापैकी 78 हजार 257 कुटूंबांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित 727 कुटूंब लाभार्थींना शिधापत्रिका वाटप करण्यात येणार आहे. अंत्योदय अन्न योजनेमध्ये समावेश करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांना अन्न पुरवठा योजनेअंतर्गत 35 किलो धान्य वितरीत करण्यात येते. यामध्ये प्रती 2 रुपये किलो प्रमाणे 10 किलो गहू व प्रती 3 रुपये किलो दराने 25 किलो तांदूळ याप्रमाणे वितरीत करण्यात येते. पात्र लाभार्थ्यांचे प्राधान्य कुटूंबातील व्यक्तींना प्रती व्यक्ती 5 किलो धान्य देण्यात येते. यामध्ये 2 रुपये प्रती किलो दराने 2 किलो गहू व 3 रुपये प्रती किलो दराने 3 किलो तांदूळ वितरीत केले जाते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्याकरीता प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी संख्येनुसार 6 लाख 78 हजार 450 एवढा इष्टांक ठरवून दिलेला आहे. त्यापैकी माहे जून-2019 अखेर 6 लाख 65 हजार 624 एवढा इष्टांक पूर्ण करण्यात आलेला आहे. उर्वरित 12 हजार 826 एवढ्या इष्टांकाची पुर्तता करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 95 हजार 422 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. ज्यांच्याकडे गॅस जोडणी नाही त्यांना 15 जुलै ते 14 ऑगस्ट 2019 या अभियान कालावधीत गॅस जोडणी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
         यावेळी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते अंत्योदय अन्न योजनेंतर्गत पारबता उईके, सयाबाई कोहळे, दिलीप नेवारे, बुगनबाई पारधी, फुलवंता भोयर, निर्मला पुसाम, भागरता मेश्राम, श्यामा राऊत. प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेंतर्गत प्रफुल टेंभूर्णीकर, निलावती भंडारी, योगराज नेवारे, किर्ती रहांगडाले, भाऊलाल टेकाम, धुरपता सिंधीमेश्राम, मारोती बगमारे यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत अनिता बघेले, अमृता बोपचे, सुषमा रहांगडाले, सविता कटरे, रितू रहांगडाले, कमलाबाई चव्हाण, मिनाक्षी दाणी, कमलाबाई कोरे, ज्योती कापसे, रंजुबाई शिवणकर, पुष्पा चौहाण, प्रभावती मेश्राम, शांताबाई बिहारी यांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले.
          जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे म्हणाल्या, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे 15 जुलै ते 14 ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये पंडीत दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाअंतर्गत ही विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपले जीवनमान उंचवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
          प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी सुभाष चौधरी यांनी केले. संचालन स्मिता आगाशे यांनी केले. उपस्थितांचे आभार निरिक्षण अधिकारी निलेश देठे यांनी मानले. कार्यक्रमास जि.प.सदस्य रचना गहाणे, माजी आमदार हेमंत पटले, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्यासह गॅस एजन्सीधारक व शिधापत्रिकाधारक बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment