जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 2 July 2019

कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा 22 हजार 411 लाभार्थ्यांना लाभ


      विकास प्रक्रियेत कामगारांचे योगदान महत्वाचे आहे. कामगार काम करीत असतांना त्याला सुरक्षीतता दयावी. त्यांना आरोग्याच्या सुविधांसोबतच अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने नोंदणीकृत इमारत व इतर बांधकामावर कामे करणाऱ्या कामगारांसाठी त्यांचा रोजगार तसेच त्यांच्यासाठी सेवा शर्तीचे नियमन करुन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. जिल्ह्यात या मंडळाकडे नोंदणी केलेल्या 22 हजार 411 पात्र लाभार्थ्यांना 4 कोटी 49 लक्ष 71 हजार 500 रुपयांचे साहित्य व आर्थिक स्वरुपात मदत केली आहे.
        जिल्ह्यातील 18 ते 60 वयोगटातील बांधकाम कामगार आणि मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेल्या कामगारांना, त्यांच्या पाल्यांना तसेच पत्नीच्या प्रसुतीसाठी देखील मंडळाच्या कल्याणकारी योजनेतून आर्थिक मदत करण्यात आली आहे.
      कामगार कल्याण मंडळाकडे कामगारांची नोंदणी जिवित असलेल्या जिल्ह्यातील 156 लाभार्थी कामगारांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी प्रती कामगार 3 हजार रुपये याप्रमाणे 4 लक्ष 68 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. 14 कामगारांच्या पत्नीच्या प्रसुतीसाठी 2 लक्ष 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. इयत्ता पहिली ते सातवी, इयत्ता आठवी ते दहावी, इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या 143 पाल्यांना 6 लक्ष 12 हजार 500 रुपये शैक्षणिक व प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य करण्यात आले आहे. 14 पाल्यांना पदवीच्या शिक्षणासाठी प्रत्येकी 20 हजार रुपये याप्रमाणे 2 लाख 80 हजार रुपये महाविद्यालय प्रवेश, पुस्तके आणि शैक्षणिक सामुग्रीसाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.
      नोंदणीकृत तीन कामगारांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटूंबांना अंत्यविधी योजनेअंतर्गत प्रत्येकी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत अंत्यविधीसाठी करण्यात आली आहे. चार विधवा पत्नींना प्रत्येकी 24 हजार रुपये प्रमाणे 96 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. पहिला विवाह करणाऱ्या दोन कामगार लाभार्थ्यास प्रत्येकी 30 हजार रुपये विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी अनुदान देण्यात आले आहे. 87 कामगारांच्या 98 पाल्यांना नवनीत पुस्तक संच देण्यात आले आहे.
       जिल्ह्यातील 8 हजार 636 नोंदणीकृत कामगारांना अवजारे खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 5 हजार रुपये अनुदान याप्रमाणे 4 कोटी 31 लक्ष 80 हजार रुपये देण्यात आले आहे. 6 हजार 26 रुपये सुरक्षा संच व अत्यावश्यक संच देण्यात आले आहे. जिल्ह्यातील 1300 कामगारांना कौशल्य विकास वृध्दीकरण योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांना महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या विविधप्रकारच्या 28 कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्या कुटूंबातील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सुध्दा या योजनेची मदत होत आहे.

No comments:

Post a Comment