जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday, 3 October 2026

माता-बालमृत्यू रोखण्यासाठी हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : मुख्य कार्यकारी अधिकारी झेनित चंद्रा दोंतुला



एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती आणि कुपोषित बालकांना एनआरसीमध्ये संदर्भित करण्याचे निर्देश

गोंदिया, दि. 3 : माता व बालमृत्यू रोखणे ही आरोग्य यंत्रणेची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असून, या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक संवेदनशीलता आणि जबाबदारीने काम करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झेनित चंद्रा दोंतुला यांनी दिले.
जिल्हा परिषद गोंदिया येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हास्तरीय नियमित लसीकरण, मातामृत्यू, बालमृत्यू व गाभा समितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील माता व बालमृत्यू, नियमित लसीकरण तसेच कुपोषणाच्या स्थितीचा आढावा घेतला.
कर्करोग प्रतिबंधासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या एचपीव्ही लसीकरणाबाबत पालक आणि नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात यावी. पात्र मुली व बालकांना या लसीकरणाचा लाभ मिळण्यासाठी आरोग्य विभागाने प्रभावीपणे जनजागृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यातील माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून आवश्यक उपचार, संदर्भ सेवा आणि नियमित पाठपुरावा सुनिश्चित करावा. उपचार अथवा पाठपुराव्यात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तीव्र कुपोषित बालकांचा शोध घेऊन त्यांना तातडीने पोषण पुनर्वसन केंद्रात (NRC) संदर्भित करावे, तसेच त्यांच्या उपचार व पोषण स्थितीचा नियमित पाठपुरावा करावा, अशा सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या.
बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिगंबर मरस्कोल्हे, डॉ. निकिता पोयाम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
0000000

No comments:

Post a Comment