जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601
Tuesday, 13 October 2026
कुडवा येथील शिफा दूध डेअरीवर जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई
जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांच्या उपस्थितीत मोहीम राबविली
गोंदिया, दि.13 : नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरणाऱ्या आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीच्या पथकाने 13 ऑक्टोबर 2026 रोजी कुडवा येथील लोहिया पार्क परिसरातील शिफा दूध डेअरीवर तपासणी करून कारवाई केली. या तपासणीत मोठ्या प्रमाणावर बुरशीयुक्त, दुर्गंधीयुक्त आणि मानवी सेवनासाठी अयोग्य असलेले दुग्धजन्य पदार्थ आढळून आले. जप्त करण्यात आलेले हजारो किलो पदार्थ शहराबाहेर खड्डा खोदून पुरून नष्ट करण्यात आले. याशिवाय, अप्रमाणित वजनकाटा आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या व्यावसायिक वापरासंदर्भातही कारवाई करण्यात आली.
जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये दुग्धव्यवसाय विकास विभाग, अन्न व औषध प्रशासन, वैधमापन शास्त्र विभाग, पुरवठा विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या पथकांचा सहभाग होता.
*अस्वच्छता आणि बुरशीमुळे आरोग्याला धोका*
डेअरीची तपासणी केली असता पनीर, खवा, कुंदा, रसगुल्ले आणि पेढे यांसारखे दुग्धजन्य पदार्थ व मिठाई तयार करण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळली. पदार्थ साठविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शीतगृहाच्या भिंतींवर काळी व हिरवी बुरशी साचलेली होती. परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण, जमिनीवर सांडलेले धान्य, उघड्यावर ठेवलेला कच्चा माल आणि अस्वच्छ भांडी आढळून आली.
तसेच, रसगुल्ल्यांच्या एका डब्यात मृत कीटक किंवा माशी आढळल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले. या परिस्थितीमुळे अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले. मानवी आरोग्यास घातक ठरू शकणारे हे पदार्थ जप्त करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.
*दूध खरेदी-विक्रीच्या नोंदी आढळल्या नाहीत*
तपासणीदरम्यान डेअरीमध्ये दूध खरेदी किंवा विक्री केल्याच्या अधिकृत पावत्या, नोंदवही अथवा संबंधित अभिलेख आढळून आले नाहीत. त्यामुळे दूध खरेदी-विक्रीच्या व्यवहारांबाबत आवश्यक नोंदींच्या अभावाची बाब समोर आली. या प्रकरणात संबंधित विभागांकडून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
*अप्रमाणित वजनकाटा जप्त; वैधमापन कायद्यान्वये गुन्हा*
वैधमापन शास्त्र विभागाने केलेल्या तपासणीत डेअरीमध्ये शासनमान्य प्रमाणपत्र नसलेला वजनकाटा वापरला जात असल्याचे आढळले. ग्राहकांना योग्य वजनात वस्तू मिळणे आवश्यक असताना नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधित वजनकाटा जप्त करण्यात आला. या प्रकरणी वैधमापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
*सात घरगुती गॅस सिलिंडर जप्त*
डेअरीमध्ये मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी व्यावसायिक गॅसऐवजी घरगुती वापराच्या लाल रंगाच्या गॅस सिलिंडरचा वापर केला जात असल्याचे तपासणी पथकाला आढळले. त्यानंतर पुरवठा विभागामार्फत तातडीने कारवाई करून सात घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. या प्रकरणी डेअरी चालकाविरुद्ध पुरवठा विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*जप्त केलेल्या पदार्थांची सुरक्षित विल्हेवाट*
जप्त करण्यात आलेले हजारो किलो दुग्धजन्य पदार्थ पिकअप वाहनातून शहराबाहेरील निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे जेसीबीच्या साहाय्याने खोल खड्डा खोदून हे पदार्थ पुरून नष्ट करण्यात आले. ही कार्यवाही अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांच्या उपस्थितीत तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या सहभागाने करण्यात आली.
*या कारवाईदरम्यान दुग्धशाळा व्यवस्थापक प्रशांत बोरसे, सहाय्यक आयुक्त अमृता शिर्के, ओंकार लांजेवार, अन्नसुरक्षा अधिकारी चैतन्य नानोटे, पुरवठा विभागाचे श्री. काळे, जयदीप वाघ व अभिषेक गौर, वैधमापन निरीक्षक संजय कांबळे तसेच पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा*
जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अन्नपदार्थ तयार करताना स्वच्छतेचे नियम न पाळणाऱ्या, भेसळ करणाऱ्या अथवा ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी दिला.
*नागरिकांनी मिठाई व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना दक्ष राहावे*
सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. अत्यंत कमी दरात विकल्या जाणाऱ्या किंवा संशयास्पद दर्जाच्या पदार्थांची खरेदी टाळावी. पदार्थांचा वास, रंग, साठवणुकीची पद्धत आणि विक्रीच्या ठिकाणची स्वच्छता याकडे लक्ष द्यावे.
आपल्या परिसरात अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ तयार केले जात असल्याचे किंवा भेसळीचे प्रकार आढळल्यास नागरिकांनी जिल्हा प्रशासन अथवा अन्न व औषध प्रशासनाला तातडीने माहिती द्यावी. अशा तक्रारींची दखल घेऊन संबंधितांविरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीने कळविले आहे.
00000000
Subscribe to:
Post Comments (Atom)









No comments:
Post a Comment