जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601
Monday, 5 October 2026
भाषेमुळेच परस्परांतील नाते अधिक दृढ होतात - साहित्यिक युवराज गंगाराम : शारदा वाचनालयात अभिजात मराठी भाषा सन्मान दिन साजरा
गोंदिया, दि.5 : भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून समाजाची संस्कृती, परंपरा, भावना आणि विचारांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. विविध भाषा आणि बोलीभाषांचा सन्मान व संवर्धन केल्याने परस्परांतील नाते अधिक दृढ होतात. भाषेमुळे मने जुळतात आणि समाज अधिक सुसंवादी होतो, असे प्रतिपादन साहित्यिक युवराज गंगाराम यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व श्री शारदा वाचनालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी येथील शारदा वाचनालयात अभिजात मराठी भाषा सन्मान दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी अंजु निमसरकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव डी. डी. रहांगडाले आणि सहसचिव यशवंत भगत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते साहित्यिक कवी कुसुमाग्रज उपाख्य वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
युवराज गंगाराम म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देताना तिची सुमारे अडीच हजार वर्षांची प्राचीन परंपरा विचारात घेण्यात आली आहे. भाषेचे स्वरूप आणि वापर भौगोलिक अंतरानुसार बदलत असले तरी भाषा माणसांना एकमेकांशी जोडण्याचे काम करते. प्रत्येकाने आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासोबतच प्रमाण भाषेचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. मराठी साहित्य हे माणूसकेंद्री आणि वास्तववादी असावे. आपल्या लेखनातून समाजातील वास्तवाचे प्रभावी चित्रण झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मराठी भाषेला लाभलेली इतर भाषांची समृद्ध परंपरा त्यामुळे मराठी अधिक वृद्धिंगत होत गेली असल्याचे त्यांनी सांगितले. कुठलीही भाषा पूर्णपणे आत्मसात करताना त्या भाषेत प्रत्येक क्रिया करणे आणि त्याच भाषेत विचार करणे किती आवश्यक आहे त्यामुळे आपण त्या भाषेची वाहक होत असल्याचेही त्यांनी सांगितले. श्री गंगाराम यांनी साहित्य जगतात आपले अढळ स्थान निर्माण केले असून त्यांच्या जगण्याचा भाग हा मराठी भाषा आणि त्याचे साहित्य आहे. व्यक्तीने स्वभाषेसह इतर भाषाही शिकावी आणि बहुभाषिक व्हावे, यामुळे आपण जागतिक स्तरावरही संवाद साधू शकतो आणि आपला आत्मविश्वास अढळ राहतो.
जिल्हा माहिती अधिकारी अंजु निमसरकर म्हणाल्या, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आणि साहित्यिक वारशाचा गौरव झाला आहे. ‘अभिजात’ म्हणजे क्लासिक आणि क्लासिक म्हणजे शास्त्रीय व समृद्ध परंपरा असलेले. मराठी भाषेला साहित्याची मोठी परंपरा असून तिच्या गोडव्याला वेगळे महत्त्व आहे. प्रत्येकाने प्रमाण मराठी भाषा बोलण्याचा आणि तिचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी शिक्षण, ज्ञान आणि विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठीतील दर्जेदार साहित्य इतर भाषेत भाषांतर होणार तसेच इतर भाषेतील मराठीशी निगडीत साहित्यही आपल्याला वाचण्यास मिळतील, शासन स्तरावर या संदर्भात प्रयत्न होत आहेत असेही त्यांनी सांगितले. यासह महाराष्ट्राच्या बाहेर मराठी भवन निर्माण होत असून महाराष्ट्र बाहेरील मराठी लोक एकत्रित येऊन या ठिकाणी मराठी भाषेची निगडित कार्यक्रम करतील तसेच देशाबाहेरही असणाऱ्या बृहत महाराष्ट्र मंडळ मार्फत होणाऱ्या साहित्य संमेलनांना शासन पाठबळ देत असल्याचे त्यांनी सांगितले.
खुमेंद्र बोपचे यांनी प्रास्ताविकातून मराठी भाषेच्या प्राचीन व समृद्ध परंपरेचा आढावा घेतला. मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मराठी भाषेचे वैभव, समृद्ध वारसा, प्राचीन ग्रंथ आणि संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हा अभिजात मराठी भाषा सन्मान दिन साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झनकलाल पारधी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार यशवंत भगत यांनी मानले. कार्यक्रमास स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी तसेच ग्रंथालयाचे सदस्य, वाचक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment