गोंदिया, दि.5 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत जिल्ह्यातील पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत 21 हजार 610 लाभार्थ्यांना 121.71 लाख रुपये कर्जखात्यांमध्ये थेट वितरित करण्यात आले आहेत.
योजनेच्या कर्जमाफी व एकवेळ समझोता (OTS) घटकाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती महाआयटीमार्फत विकसित करण्यात आलेल्या पोर्टलवर अपलोड केली आहे. पोर्टलवर 30 हजारांहून अधिक कर्जखात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे.
योजनेच्या निकषानुसार पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी सुमारे 25 हजार 328 शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यापैकी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत सुमारे 21 हजार 655 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.
आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांपैकी ऑनलाइन पोर्टलद्वारे पहिल्या यादीतील 12 हजार 679 लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 75.75 लाख रुपये, दुसऱ्या यादीतील 5 हजार 169 लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 30.30 लाख रुपये, तर तिसऱ्या यादीतील 2 हजार 762 लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 21.66 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण 20 हजार 610 लाभार्थ्यांना 127.71 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना तातडीने पीक कर्ज वाटप करण्याचे निर्देश सर्व बँकांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, प्रसिद्ध यादीतील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांना लाभाची रक्कम थेट त्यांच्या कर्जखात्यात वितरित करण्यात येणार आहे.
00000000
No comments:
Post a Comment