जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday, 6 October 2026

गोंदिया जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियानाला’ अभूतपूर्व प्रतिसाद : आरोग्य यंत्रणा सक्रिय, नागरिकांचा मोठा सहभाग

 


गोंदिया, दि.6 : राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ दि.१७ सप्टेंबर पासुन सुरु असुन ते १७ ऑक्टोबर पर्यंत राबविले जाणार आहे. या अभियानाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सक्रिय झाली असून, ग्रामीण व दुर्गम भागातील हजारो नागरिकांनी विविध आरोग्य शिबिरांचा आणि शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे.

या अभियानाच्या यशस्वीतेसाठी गोंदियाचे जिल्हाधिकारी मंदार पत्की आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित चंद्रा दोंतुला यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा गतीमान झाली आहे.

            आरोग्य यंत्रणेची दमदार कामगिरी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग-

या विशेष अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन केले जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांच्या थेट नियंत्रणात आरोग्य विभागाचे पथक तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचत आहे.

या मोहिमेला गती देण्यासाठी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे आणि जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे हे सातत्याने मैदानावर उतरून जनजागृती व नियोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

आरोग्य यंत्रणेची दमदार कामगिरी-

•          मोफत आरोग्य तपासणी : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे.

•          तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा : हृदयरोग, स्त्रीरोग, बालरोग आणि नेत्ररोग तज्ज्ञांकडून रुग्णांची जागेवरच तपासणी करून औषधोपचार केला जात आहे.

•          रक्तदान व समुपदेशन : विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, आरोग्याविषयी जनजागृतीपर समुपदेशन सत्रे घेतली जात आहेत.

समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांचे मोलाचे योगदान-

जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र सेवा देत आहेत. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागात आशा सेविका घरोघरी जाऊन नागरिकांना आरोग्य तपासणीसाठी प्रवृत्त करत आहेत. आयुष्मान भारत कार्ड वितरण, गरोदर मातांची तपासणी, बालकांचे लसीकरण आणि इतर कल्याणकारी योजनांचा थेट लाभ नागरिकांना मिळवून दिला जात आहे.

"प्रशासनाने नागरिकांच्या दारापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गरजू नागरिकाने या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी." — मंदार पत्की, जिल्हाधिकारी

0000000

No comments:

Post a Comment