गोंदिया, दि.13 : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयाच्या डाव्या कालव्याकडील भागाला भगदाड पडल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापनाची कामे प्रभावीपणे व समन्वयाने पार पाडण्यासाठी तिरोडा उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांची घटना नियंत्रक (Incident Commander), तर तिरोडा तहसीलदार यांची उपघटना नियंत्रक (Deputy Incident Commander) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मंदार पत्की यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम २५, ३०, ३३, ३४, ४१ व ५१ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून यासंदर्भातील आदेश निर्गमित केला आहे.
बोदलकसा जलाशयाच्या डाव्या कालव्याच्या भागाला भगदाड पडल्यामुळे विसर्गाच्या पाण्यामुळे संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, तिरोडा उपविभागात कोणतीही नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती उद्भवू नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपाययोजना करता याव्यात, यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नियुक्त करण्यात आलेल्या घटना नियंत्रक व उपघटना नियंत्रक यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून आपत्ती व्यवस्थापनाची कामे पूर्ण क्षमतेने राबवावीत. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून संभाव्य धोके ओळखणे, आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणे, यावर भर देण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात विविध विभागांमध्ये योग्य समन्वय राखून कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने आणि तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दिले आहेत.
00000000
No comments:
Post a Comment