शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषी क्षेत्रात कार्यरत संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन
गोंदिया, दि.12 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान (अन्नधान्य पिके), राष्ट्रीय कृषी विकास योजना, भरडधान्य (मका) व कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत सन २०२६ च्या रब्बी हंगामासाठी विविध कृषी योजनांच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. या योजनांतर्गत पीक प्रात्यक्षिके, प्रमाणित बियाणे वितरण आणि मिनिकिट वितरण या घटकांसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सदर पीक प्रात्यक्षिके शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. इच्छुक गट, कंपन्या व संस्थांनी https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे यांनी केले आहे.
*अर्जासाठी आवश्यक अटी व पात्रता*
पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करणारा शेतकरी गट ३१ मार्च २०२६ पूर्वी नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित गटाची आत्मा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM), राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM), महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड किंवा अन्य शासकीय यंत्रणेकडे नोंदणी झालेली असावी.
पीक प्रात्यक्षिकासाठी निवडलेल्या गटामध्ये २५ पेक्षा अधिक शेतकरी असल्यास, संबंधित गटाने त्यापैकी २५ शेतकऱ्यांची निवड करणे आवश्यक आहे. महाडीबीटी पोर्टलवर नोंदणीकृत शेतकरी गट, कंपनी किंवा संस्थांची निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (First Come, First Served – FCFS) या तत्त्वावर करण्यात येणार आहे.
प्रात्यक्षिकांचा लाभ घेणाऱ्या गटातील शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक (AgriStack) प्रणालीवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. लाभार्थी गटांची निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे होणार असल्याने संबंधितांनी कृषी विभागाच्या विहित नमुन्यातील हमीपत्र देण्याची तयारी ठेवावी.
पीक पद्धतीवर आधारित प्रात्यक्षिकांसाठी लाभार्थी निवडताना दोन्ही हंगामांत पिके घेण्याची तयारी आणि त्यासाठी आवश्यक सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनाच प्राधान्याने निवडावे. तसेच शासनाने निश्चित केलेल्या तंत्रज्ञानानुसार पीक प्रात्यक्षिकांची अंमलबजावणी करण्यास तयार असलेल्या शेतकऱ्यांचाच लाभार्थ्यांमध्ये समावेश करावा.
*ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन*
रब्बी हंगामातील पीक प्रात्यक्षिके, प्रमाणित बियाणे वितरण आणि मिनिकिट वितरण या घटकांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रात कार्यरत संस्थांनी mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांबाबत अधिक माहितीसाठी संबंधितांनी कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे यांनी केले आहे.
00000000
No comments:
Post a Comment