जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 12 October 2026

पदवीधर मतदारांना मतदान करण्यासाठी भर पगारी सुट्टी : 23 ऑक्टोबरला होणार मतदान

 


गोंदिया, दि.12 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-2026 साठी मतदान करणाऱ्या पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भर पगारी सुट्टी व विशेष सवलतीची तरतूद करण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजा अनुज्ञेय असून, खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत मतदारांना मतदानासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. भारत निवडणूक आयोगाने 22 सप्टेंबर 2026 रोजीच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी शुक्रवार 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत मतदान होणार असून, मंगळवार 27 ऑक्टोबर 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 मधील तरतुदींनुसार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आवश्यक सवलती देण्यात येतात. सामान्य प्रशासन विभागाच्या 23 जून 2011 रोजीच्या शासन निर्णयानुसार, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदार असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तिक रजा अनुज्ञेय आहे. ही रजा कर्मचाऱ्यांना नियमितपणे अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे. दरम्यान, खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना ही विशेष नैमित्तिक रजा लागू नसल्याने त्यांना मतदान करता यावे, यासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्याबाबत विभागीय आयुक्त, नागपूर यांच्यामार्फत संबंधित कार्यालयांना निर्देश देण्यात आले आहेत. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदार असलेल्या पात्र नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे. 00000000

No comments:

Post a Comment