दत्तक विधानाची प्रक्रिया पूर्ण; बालकांना मिळाले सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंब
गोंदिया, दि.8 : प्रत्येक बालकाला
प्रेमळ कुटुंब, आई-वडिलांचे वात्सल्य आणि सुरक्षित वातावरणात वाढण्याचा अधिकार
आहे. याच भावनेतून गोंदिया जिल्ह्यातील १० बालकांच्या दत्तक विधानाची प्रक्रिया
पूर्ण करण्यात आली असून, या बालकांना हक्काचे कुटुंब मिळाले आहे. जिल्हाधिकारी
मंदार पत्की यांच्या आदेशानुसार, महिला व बाल विकास विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण
कक्षाच्या पुढाकाराने ७ ऑक्टोबर २०२६ रोजी ही प्रक्रिया पूर्ण करून अंतिम आदेश
पारित करण्यात आले.
आई-वडिलांचे प्रेम, कुटुंबाचा आधार
आणि आपलेपणाची भावना या प्रत्येक बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या
असतात. मात्र, विविध परिस्थितींमुळे काही बालकांना जन्मतःच या सुखापासून वंचित
राहावे लागते. अशा बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंब मिळवून
देण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने दत्तक विधानाची प्रक्रिया प्रभावीपणे
राबविली आहे.
महिला व बाल विकास विभागांतर्गत इंडियन सोशल
वेलफेअर सोसायटीद्वारे संचालित आसरा शिशुगृह, गोंदिया येथील तीन बालके आणि जिल्हा
बाल संरक्षण कक्षामार्फत सात बालके, अशा एकूण १० बालकांचे दत्तक विधान पूर्ण झाले.
यामध्ये नातेसंबंधांतर्गत तीन, सावत्र पिता यांच्यामार्फत चार आणि समर्पित
बालकांपैकी तीन बालकांच्या दत्तक प्रकरणांचा समावेश आहे. या प्रक्रियेमुळे संबंधित
बालकांना कुटुंबाच्या मायेचा आधार आणि सुरक्षित भविष्याची नवी संधी मिळाली आहे.
कायदेशीर प्रक्रियेद्वारे दत्तक विधान :
बाल न्याय (मुलांची काळजी व
संरक्षण) अधिनियम, २०१५ मधील कलम ५६ तसेच सुधारित अधिनियम, २०२१ मधील तरतुदींनुसार
दत्तक विधानाची कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येते. सुधारित अधिनियमातील कलम ६१
नुसार दत्तक प्रकरणांमध्ये अंतिम आदेश पारित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना
देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली
गोंदिया जिल्ह्यातील ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
महिला व बाल विकास मंत्रालय, केंद्र
शासन आणि केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA), नवी दिल्ली यांच्या
मार्गदर्शनानुसार, तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या ४ मे २०२६ रोजीच्या आदेशाचे पालन
करून दत्तक विधानाची प्रक्रिया गतिमान व पारदर्शक करण्यात आली. संबंधित बालकांची
प्रकरणे अधिकृत ऑनलाइन प्रक्रियेद्वारे आणि नियमानुसार निकाली काढण्यात आली.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
तुषार पौनिकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे,
संरक्षण अधिकारी (असंस्थात्मक) मुकेश पटले, गंगाबाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी
डॉ. सचिन उईके, आसरा शिशुगृहाच्या अधीक्षिका आर्चना फुलेकर, तसेच राज्य दत्तक
स्वायत्त संस्था, पुणे आणि केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या
समन्वयातून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी साधला बालकांशी संवाद :
दत्तक विधानाची प्रक्रिया पूर्ण
झाल्यानंतर जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी बालकांना जवळ घेत त्यांच्याशी संवाद
साधला. बालकांना हक्काचे कुटुंब, आई-वडिलांचे प्रेम, घर आणि सुरक्षित भविष्य
मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नातेसंबंधांतर्गत आणि सावत्र पिता
यांच्यामार्फत दत्तक घेण्यात आलेल्या बालकांच्या पालकांशीही त्यांनी संवाद साधून
माहिती जाणून घेतली. बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करताना पालकांचे
अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कायदेशीर दत्तक प्रक्रियेलाच प्राधान्य द्या :
दत्तक विधान ही केवळ प्रशासकीय
प्रक्रिया नसून अनाथ, निराधार, सोडून दिलेल्या आणि समर्पित बालकांच्या पुनर्वसनाचा
महत्त्वपूर्ण मार्ग आहे. प्रत्येक बालकाला सुरक्षित आणि प्रेमळ कुटुंब मिळावे,
यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. बालक दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पात्र
दाम्पत्यांनी शासनाच्या अधिकृत केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाच्या (CARA)
पोर्टलवर नोंदणी करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी
मंदार पत्की यांनी केले आहे.
परस्पर पैसे देऊन बालक दत्तक घेणे
किंवा रुग्णालयातून अनधिकृतरीत्या बालक ताब्यात घेणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा
आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी अधिकृत प्रक्रियेचाच अवलंब करावा.
दत्तक विधानाबाबत मार्गदर्शन व मदतीसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष गोंदिया किंवा
आसरा शिशुगृह गोंदिया येथे संपर्क साधावा. तसेच अवैध दत्तक प्रकरणाची माहिती
मिळाल्यास चाइल्ड हेल्पलाइनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
या दत्तक विधान प्रक्रियेत जिल्हा
बाल संरक्षण कक्षातील रूपेश चुंडुके, धर्मेंद्र भेलावे, भागवत सूर्यवंशी,
ज्ञानेश्वर पटले आणि शितल राऊत यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
१० बालकांना हक्काचे कुटुंब
मिळाल्याने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली असून, प्रत्येक बालकाला प्रेम,
सुरक्षितता आणि कुटुंबाचा आधार मिळवून देण्याच्या दिशेने गोंदिया जिल्हा
प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
00000000

No comments:
Post a Comment