जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 9 October 2026

अंतराळ तंत्रज्ञानाच्या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांनी घेतला प्रगत विज्ञानाचा अनुभव

 







उपग्रहांचा दैनंदिन आयुष्यासह शेती, नकाशे आणि शालेय अभ्यास, भूगर्भशास्त्रीयसाठी उपयोग   

       गोंदिया, दि.9 : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण व्हावी, अंतराळ तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि विज्ञान क्षेत्रातील करिअरच्या संधींची माहिती मिळावी, या उद्देशाने समाज कल्याण विभागाच्या वतीने सेवा संकल्प च्या अंतर्गत विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या माध्यमातून शासकीय निवासी शाळा व वसतिगृहांतील विद्यार्थ्यांनी अंतराळ तंत्रज्ञानाचा अभ्यास करत विज्ञानाच्या विविध पैलूंची माहिती जाणून घेतली.

          समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालय, गोंदिया आणि शिक्षा बहुउद्देशीय संस्था, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा नियोजन भवन सभागृहात ‘अंतराळ तंत्रज्ञानाची ओळख’ या विषयावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

          कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. रुपेशकुमार राऊत, जिल्हा माहिती अधिकारी अंजु निमसरकर, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर (एमआरएसएसी), नागपूरचे सहायक शास्त्रज्ञ अशोक मेडपल्लीवार, जीआयएस असोसीएटस रिमोट सेन्सींग केंद्र नागपूरच्या हर्षा धुमाळ, सुवर्णा काटोळे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त किशोर भोयर,  महाराष्ट्र  मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे घनश्याम पटले, जीआयएस एक्सपर्ट रविंद्र पाटील, संजय वर्मा, गिरीश कुदळे, वैशाली कुदळे, निरज वर्मा आणि रश्मी वर्मा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

विज्ञानातील आवड आणि मूलभूत विषयांवरील प्रभुत्व महत्त्वाचे

          विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधताना जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. रुपेशकुमार राऊत यांनी अंतराळ तंत्रज्ञानाची प्राथमिक माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच अंतराळ तंत्रज्ञानाची ओळख होणे ही महत्त्वाची बाब आहे. या क्षेत्रात करिअर घडवायचे असल्यास विज्ञानाची आवड असणे आवश्यक आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभुत्व मिळवावे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार करिअरचे ध्येय निश्चित करून त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करावेत.

विद्यार्थ्यांना नासाला (NASA) भेट देण्याच्या संधीसंदर्भात शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर केल्यास त्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले.

वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन

विद्यार्थ्यांनी केवळ करिअरपुरते विज्ञानाचे महत्त्व मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनातील घटनांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पहावे, असे आवाहन केले. मानवाच्या जीवनशैलीत काळानुसार झालेले बदल, पृथ्वीची निर्मिती आणि वैज्ञानिक संशोधनाचा विकास यांविषयी जिल्हा माहिती अधिकारी अंजु निमसकर यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

           पृथ्वी सूर्याभोवती फिरते, या संकल्पनेच्या वैज्ञानिक अभ्यासापासून पुढे विज्ञानाच्या विविध क्षेत्रांत झालेल्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. रॉकेटरी, मंगल मिशन या अशा वैज्ञानिक सिनेमे विद्यार्थ्यांनी पहावे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी नागपूर येथील रमण विज्ञान केंद्राला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

उपग्रह तंत्रज्ञानाचा शेती आणि नकाशे तयार करण्यासाठी उपयोग

           एमआरएसएसी, नागपूरचे सहायक शास्त्रज्ञ अशोक मेडपल्लीवार यांनी उपग्रह तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करताना पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास, नकाशे तयार करणे आणि कृषी क्षेत्रातील उपग्रहांच्या उपयोगाविषयी सविस्तर माहिती दिली.

           उपग्रहांच्या माध्यमातून जमिनीचे क्षेत्रफळ, अक्षांश-रेखांश तसेच भौगोलिक स्थितीविषयी माहिती मिळवता येते. शेतीच्या नियोजनासाठीही या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भूगोल आणि भूगर्भशास्त्राचा अभ्यास करताना आधुनिक तंत्रज्ञानाची माहितीही आत्मसात करावी, असे त्यांनी सांगितले.

       यावेळी घनश्याम पटले आणि रविंद्र पाटील यांनीही विद्यार्थ्यांना अंतराळ तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंबाबत मार्गदर्शन केले. या संवादात्मक कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान, उपग्रह तंत्रज्ञान आणि त्याच्या व्यावहारिक उपयोगांची माहिती मिळाली.

          याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शिक्षा बहुउद्देशीय संस्था, गोंदिया यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

       कार्यशाळेचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी केले. सूत्रसंचालन समाज कल्याण निरीक्षक स्वाती कापसे यांनी केले, तर आशिष जांभुळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळांतील विद्यार्थी, शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समाज कल्याण निरीक्षक राजेश मुधोळकर, प्रमोद गणवीर, ओम नेमाडे यांच्यासह लक्ष्मण खेडकर, निशांत वाघमारे, निवेदिता बघेले, गिरीधर गोबाडे, रोहिणी रामटेके, जयश्री क्षिरसागर, दीपक मेश्राम, प्रकाश मेश्राम, मिनाक्षी बागडे, मुस्कान बिसेन, निवास शहारे, लक्ष्मण राऊत, सुरेंद्र बडोले, विद्या मेश्राम, क्रिस्टल कंपनीचे बाह्यस्रोत कर्मचारी तसेच समतादूत यांनी परिश्रम घेतले.

                                         0000000

No comments:

Post a Comment