गोंदिया, दि.8 : वन्यजीव गुन्ह्यांना प्रभावीपणे प्रतिबंध करणे, वन्यजीव संरक्षण कायद्याची सक्षम अंमलबजावणी करणे तसेच वन्यजीव तस्करीविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो (WCCB), पश्चिम विभाग, भारत सरकार, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय आणि नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने “Strengthening Wildlife Law Enforcement” या विषयावर दोन दिवसीय क्षमता वृद्धीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वन्यजीव सप्ताह २०२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ 8 ऑक्टोबर रोजी साकोली येथे झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन योगेश वरकड, उपसंचालक, WCCB, नवी मुंबई, पियुषा जगताप, क्षेत्र संचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि उत्तम सावंत, प्रादेशिक व्यवस्थापक, FDCM, नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवन जोंग, उपवनसंरक्षक, गोंदिया, योगेंद्र सिंह, उपवनसंरक्षक, भंडारा, तुषार ढमढेरे, उपसंचालक, नागझिरा तसेच श्री. नागे, विभागीय व्यवस्थापक, FDCM, भंडारा यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन व समन्वय अतुल देवकर, विभागीय वन अधिकारी, नवेगाव, साकोली यांनी केले.
गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील वन विभागाच्या विविध शाखांसह वन्यजीव, प्रादेशिक वन विभाग व FDCMच्या विविध यंत्रणांमधील सर्व सहाय्यक वनसंरक्षक (ACF) व वनक्षेत्रपाल (RFO) यांच्यासह एकूण 62 अधिकारी या प्रशिक्षणात सहभागी झाले.
प्रशिक्षणामध्ये वन्यजीव गुन्ह्यांचे स्वरूप व प्रतिबंध, वन्यजीव संरक्षण अधिनियमातील कायदेशीर तरतुदी, गुन्ह्यांचा तपास, पुरावे संकलन व जतन, वन्यजीव तस्करीची कार्यपद्धती, तस्करीचे मार्ग व नेटवर्क ओळखणे, गुप्त माहितीचे संकलन व विश्लेषण, गुन्हे नोंदणी आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक बाबी याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच वन्यजीव गुन्ह्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी विविध विभाग व अंमलबजावणी यंत्रणांमध्ये माहितीची देवाणघेवाण आणि समन्वयाचे महत्त्व यावरही विशेष भर देण्यात आला.
यावेळी क्षेत्र संचालक पियुषा जगताप यांनी सांगितले की, “वन्यजीव गुन्हे आणि तस्करीचे स्वरूप दिवसेंदिवस अधिक संघटित होत आहे. त्यामुळे केवळ वन्यजीव विभागापुरते मर्यादित न राहता सर्व संबंधित शाखा व यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय आणि माहितीची देवाणघेवाण आवश्यक आहे. या प्रशिक्षणाचा लाभ प्रत्येक स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कार्यात होईल. गोंदिया व भंडारा परिसरातील वन्यजीव तस्करीला आळा घालण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे कार्य करणे ही काळाची गरज आहे.”
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पासह गोंदिया व भंडारा जिल्ह्याचा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, वन्यजीव संरक्षणासाठी प्रभावी कायदा अंमलबजावणी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची कायदेशीर, तपासात्मक व मैदानी कार्यक्षमता वाढण्याबरोबरच विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक दृढ होऊन वन्यजीव गुन्हे व तस्करीविरोधातील कारवाई अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.
00000000

No comments:
Post a Comment