जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 8 October 2026

स्वाधार योजनेच्या अर्जासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत : पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज व नूतनीकरण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

 


गोंदिया, दि.8 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अर्ज व नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. गरजू व पात्र विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत एकूण आठ शासकीय वसतिगृहे सुरू आहेत. यामध्ये मुलांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह गोंदिया व अर्जुनी मोरगाव येथे, तर मुलींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहे गोंदिया, नवीन गोंदिया (कुडवा), तिरोडा, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व देवरी येथे कार्यरत आहेत. या वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास, नाश्ता, भोजन व शैक्षणिक साहित्य यांसारख्या आवश्यक सुविधा विनामूल्य पुरविण्यात येतात.

व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 10 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करूनही प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पात्र विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेला असल्याची खात्री करावी.

स्वाधार योजनेअंतर्गत वार्षिक आर्थिक मदत :

या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता व शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक 43 हजार रुपये, तर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक 38 हजार रुपये देण्यात येतात. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाते.

शासकीय वसतिगृह नसलेल्या तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी थेट अर्ज करता येतो. तसेच मागील वर्षी या योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी लाभ सुरू ठेवण्यासाठी नूतनीकरणाचा ऑनलाइन अर्ज 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

अर्जासाठी संपर्क साधण्याचे आवाहन :

गरजू व पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीची वाट न पाहता या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावेत. योजनेविषयी अधिक माहितीसाठी समाजकल्याण कार्यालयाच्या 07182-234117 या दूरध्वनी क्रमांकावर, acswogondia@gmail.com या ई-मेलवर किंवा कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन संपर्क साधावा, असे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी कळविले आहे.

                                                            0000000

No comments:

Post a Comment