वनसंवर्धनासोबत स्थानिक समुदायाला पर्यायी रोजगार; महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना
गोंदिया, दि.7 : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत
नागझिरा वनपरिक्षेत्राच्या बफर क्षेत्रातील सोंदलागोंदी गावात स्थानिक नागरिकांना
वनांवर आधारित पारंपरिक उपजीविकेला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी “ऑयस्टर मशरूम लागवड” (Oyster Mushroom Cultivation) उपक्रमास 6 ऑक्टोबर 2026 रोजी प्रारंभ करण्यात आला.
स्थानिक समुदायासाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करणे, महिलांना
आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि वनसंपदेवरील अवलंबित्व कमी करणे, हा या उपक्रमाचा
प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमामुळे गावातील नागरिकांना स्थानिक
पातळीवर रोजगार व उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार असून, वनसंवर्धनाच्या
प्रयत्नांमध्ये स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. वनसंवर्धन
आणि स्थानिकांच्या आर्थिक विकासाचा समतोल साधण्यासाठी अशा उपक्रमांना विशेष
महत्त्व देण्यात येत आहे.
सदर उपक्रमाला ग्राम परिस्थितिकी विकास समिती (EDC) च्या
माध्यमातून सहकार्य मिळाले असून, यासाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प
प्रतिष्ठानकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या उपक्रमासाठी गावातील 10 कुटुंबांची निवड करण्यात
आली असून, त्यामध्ये महिला व पुरुषांचा सहभाग आहे. प्रत्येक लाभार्थ्याला सध्या 25 मशरूम बॅग्स उपलब्ध करून
देण्यात आल्या आहेत.
लाभार्थ्यांना मशरूम उत्पादनाची शास्त्रीय
पद्धत, मशरूम बॅग्सची देखभाल, उत्पादन व्यवस्थापन तसेच उत्पादनातून उत्पन्न
निर्मिती याबाबत Pilot Mushroom
Farm या संस्थेमार्फत तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे
लाभार्थ्यांना मशरूम उत्पादनाचे तंत्रज्ञान आत्मसात करून त्यातून नियमित उत्पन्न
मिळविण्यासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त होणार आहे.
हा उपक्रम नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या
क्षेत्र संचालक पियुषा जगताप
आणि उपसंचालक, नागझिरा खंड,
गोंदिया तुषार ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक वनसंरक्षक विपीन लांडगे
यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.
उपक्रमाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी नागझिरा वनपरिक्षेत्र अधिकारी आयशा लांबट
आणि त्यांच्या कर्मचारी वर्गाने विशेष प्रयत्न केले आहेत. वन्यजीव व
वनसंवर्धनासोबतच स्थानिक समुदायाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी भविष्यातही
समुदायाच्या सहभागावर आधारित विविध शाश्वत उपजीविका उपक्रम राबविण्याचा
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा मानस आहे, अशी माहिती नागझिरा वनपरिक्षेत्र
अधिकारी आयशा लांबट यांनी दिली.
00000000



No comments:
Post a Comment