गोंदिया, दि.12 : वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत नागझिरा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनी रेलटोली येथील गुजराती बालक मंदिर येथे रविवार दि.18 ऑक्टोबर ते मंगळवार दि.20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
पर्यावरण, वनसंपदा आणि वन्यजीवांचे संरक्षण याविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, तसेच विशेषतः विद्यार्थी आणि युवकांना निसर्गसंवर्धनासाठी प्रेरित करणे हा या प्रदर्शनीचा मुख्य उद्देश आहे. वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास, त्यांचे जीवन आणि जैवविविधतेचे महत्त्व छायाचित्रांच्या माध्यमातून जाणून घेण्याची संधी या प्रदर्शनीतून उपलब्ध होणार आहे.
या प्रदर्शनीत गोंदियातील प्रसिद्ध छायाचित्रकार डॉ. राजेंद्र जैन यांनी टिपलेल्या वन्यजीवांच्या आकर्षक छायाचित्रांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यांच्या छायाचित्रांच्या माध्यमातून वन्यजीवांचे निसर्गातील स्थान, त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण जीवन आणि वनसंवर्धनाची गरज यांची माहिती अभ्यागतांना मिळणार आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी ही प्रदर्शनी दररोज सकाळी 10.30 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत खुली राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, युवक, निसर्गप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांना आपल्या सोयीनुसार प्रदर्शनाला भेट देता येणार आहे.
वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी, नवयुवकांनी तसेच नागरिकांनी या छायाचित्र प्रदर्शनीला भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक नागझिरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
0000000
No comments:
Post a Comment