अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन; त्रुटींची पूर्तता न केल्याने प्रशासनाची कारवाई
गोंदिया, दि.15 : अन्न सुरक्षा व स्वच्छतेविषयक नियमांचे उल्लंघन तसेच तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींची पूर्तता न केल्याप्रकरणी गोंदिया येथील कुडवा नाका, रिंग रोड परिसरातील मे. शालीमार हॉटेलचा अन्न व्यवसाय परवाना दि.१३ ऑक्टोबर २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
अन्न व औषध प्रशासनामार्फत जिल्ह्यातील अन्न आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा व स्वच्छतेविषयक नियमांचे पालन केले जाते किंवा नाही, याची नियमित तपासणी करण्यात येते. या अनुषंगाने मे. शालीमार हॉटेलची दि.३ सप्टेंबर २०२६ रोजी FoSCoS प्रणालीद्वारे तपासणी करण्यात आली होती. या तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित परवानाधारकास सुधारणा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, नोटिशीच्या अनुषंगाने आवश्यक सुधारणा करून त्याबाबतचा पूर्तता अहवाल सादर करण्यात आला नाही.
त्यानंतर दि.१२ ऑक्टोबर २०२६ रोजी आस्थापनेची पुनर्तपासणी करण्यात आली. यावेळी यापूर्वी निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटी कायम असल्याचे आढळून आले. यामध्ये अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी अपुऱ्या सुविधा, घसरडी फरशी, कर्मचाऱ्यांसाठी हात धुण्याच्या सुविधेचा अभाव, भिंतींचे रंग व प्लास्टर निघालेली अवस्था, वायुवीजन व एक्झॉस्ट यंत्रणेतील अस्वच्छता, उघडी गटारे तसेच गटारांमध्ये साचलेला अन्नकचरा यांचा समावेश होता.
याशिवाय, अन्नपदार्थ हाताळताना आवश्यक स्वच्छता राखली जात नसल्याचे आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचेही तपासणीदरम्यान निदर्शनास आले. अन्नपदार्थांची सुरक्षित साठवणूक, स्वच्छ परिसर आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता या बाबी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.
अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ तसेच त्याअंतर्गत लागू असलेल्या नियम व विनियमांतील तरतुदींच्या अनुषंगाने या त्रुटींची दखल घेण्यात आली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या गोंदिया कार्यालयातील सहायक आयुक्त (अत्र) तथा पदनिर्देशित अधिकारी अमृता शिर्के यांनी संबंधित आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. निलंबनाच्या कालावधीत संबंधित आस्थापनेत कोणत्याही प्रकारचा अन्न व्यवसाय करू नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनामार्फत नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न आस्थापनांची तपासणी करून कायद्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येते. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा, परिसरातील स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्ता व सुरक्षिततेबाबत जागरूक राहून कोणतीही अनियमितता आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000000
No comments:
Post a Comment