जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 14 October 2026

गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना
गोंदिया, दि.14 : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आणखी ४० तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. यापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याचा ट्रिगर-१ अंतर्गत समावेश करण्यात आला होता. आता ट्रिगर-२ अंतर्गत जिल्ह्यातील उर्वरित सात तालुक्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असून, दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
राज्यात यापूर्वी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यात नव्याने ४० तालुक्यांची भर पडल्याने राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या आता ३०५ झाली आहे. या तालुक्यांमध्ये दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाकडून कार्यवाहीला गती देण्यात येत आहे.
*शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये*
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने कर्जवसुलीसाठी कोणत्याही प्रकारचा तगादा लावू नये, अशा सक्त सूचना संबंधित सहकारी सोसायट्या, जिल्हा बँका, राष्ट्रीयीकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना त्रास होईल, अशी कोणतीही कृती करू नये, असे निर्देशही देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शेतीसाठी साडेसात अश्वशक्तीपर्यंतचा वीजपुरवठा मोफत असल्याचे नमूद करत, वीजबिलाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांवर अनुचित दबाव आणला जात असल्यास संबंधितांना सक्त सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कामकाजावरही लक्ष ठेवण्यात येत असून, त्यांनी शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी आततायीपणा करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
*पिण्याच्या पाण्यासाठी अवैध उपशावर कठोर कारवाई*
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून, या अनुषंगाने राज्यात १६ हजार वीजजोडण्या तोडण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
*दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ*
दुष्काळी तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या परीक्षा शुल्कात कोणतेही निकष न लावता सरसकट माफी देण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळण्यास हातभार लागणार आहे.
*जनावरांच्या चाऱ्यासाठीही उपाययोजना*
दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून चाऱ्याच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. ज्या भागांत पाणी उपलब्ध आहे, तेथे चारा पिकांची लागवड करण्यावर भर देण्यात यावा. तसेच रब्बी हंगामात ज्वारीसारख्या चारा देणाऱ्या पिकांची लागवड करण्यासाठीही प्रयत्न करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या चाऱ्याची शासनाकडून हमीभावाने खरेदी करण्याबाबतही उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
एकूणच, गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त क्षेत्रात समावेश झाल्याने शेतकरी, विद्यार्थी आणि पशुपालकांना दिलासा देणाऱ्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. पिण्याचे पाणी, चारा उपलब्धता, कर्जवसुलीपासून संरक्षण आणि विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणे अशा विविध बाबींना शासनाने प्राधान्य दिले आहे.
0000000

No comments:

Post a Comment