सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘सावली’ वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसोबत स्नेहसंवाद
गोंदिया, दि.14 : प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याने विचारपूस करणारी माणसे आजच्या धावपळीच्या जीवनात कमी होत आहेत. वृद्धांना अनेकदा एकाकीपणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्यासाठी वेळ देणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांना सन्मानाची वागणूक देणे गरजेचे आहे. जीवन जगण्याची शैली आपल्याला आजी-आजोबांकडून मिळते, असे प्रतिपादन जिल्हा समाज कल्याण अधिकारी भारती वरुडकर यांनी केले.
सेवा संकल्प अभियानांतर्गत सिव्हिल लाईन, गोंदिया येथील ‘सावली’ शहरी बेघर निवारा केंद्रातील वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. कार्यक्रमाला माय भारतचे उपसंचालक सौरभ निशाद, जिल्हा माहिती अधिकारी अंजु निमसरकर आणि सेंट झेवियर्स हायस्कूलच्या समन्वयक आफरीन मॅडम तसेच श्वाती वैद्य, विहान मोटकुरे व्यासपीठावर उपस्थित होते.
श्रीमती वरुडकर म्हणाल्या, सेवा संकल्प अभियानांतर्गत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणारा हा स्तुत्य उपक्रम आहे. माणूस शेवटच्या श्वासापर्यंत काही ना काही शिकत असतो. त्यामुळे वृद्धांना आनंदी ठेवणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांना भावनिक आधार देणे महत्त्वाचे आहे. समवयस्क व्यक्तींमध्ये विचारांची देवाणघेवाण होते आणि मन जुळते. आयुष्यात मित्र असणारी व्यक्ती एकाकी राहत नाही. वृद्धापकाळात एकटेपणा जाणवू लागल्यास आपल्या आवडीचे छंद जोपासणे आवश्यक आहे. छंदांमुळे मन प्रसन्न राहते आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो.
तरुणांनी वेळ मिळेल तेव्हा वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांची भेट घ्यावी, त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधावा. आपल्या आजी-आजोबांसह सर्व ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
*ज्येष्ठ नागरिकांशी संवादातून सुख-दुःखांची देवाणघेवाण*
श्रीमती निमसरकर म्हणाल्या, सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून वृद्धाश्रमातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि नवचैतन्य निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी योजनांची व्यापक प्रचार-प्रसिद्धी करणे हे जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रमुख कार्य आहे. वृद्धाश्रमातील नागरिकांसोबत वेळ घालवून त्यांच्याशी दिलखुलास चर्चा केल्याने त्यांच्या सुख-दुःखांची देवाणघेवाण करता येते. अशा उपक्रमांतून त्यांना आपलेपणाची जाणीव होते, असे त्यांनी सांगितले.
माय भारतचे उपसंचालक सौरभ निशाद यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात माय भारत कार्यालयाची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे. पालकांना वृद्धापकाळात वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची काळजी घेण्याचा संकल्प करावा. तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सेंट झेवियर्स हायस्कूलच्या समन्वयक आफरीन मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
*गीत-संगीत आणि नृत्याने वृद्धाश्रमात आनंदाचे वातावरण*
कार्यक्रमादरम्यान सेंट झेवियर्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या मनोरंजनासाठी सुमधुर गीते सादर केली. विद्यार्थिनी प्रती उषा हिने गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. जिल्हा माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनीही ‘मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे...’ हे गीत सादर केले. गीत-संगीत आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे वृद्धाश्रमातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. या उपक्रमातून ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी मान्यवरांचया हस्ते सिव्हील लाईन, गोंदिया येथील सावली निवारा वृध्दाश्रमाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी केले. सूत्रसंचालन उपसंपादक कैलाश गजभिये यांनी केले, तर तुषार उरकांदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सावली निवारा केंद्राचे प्रमुख लोकेश पटले आणि माय भारत कार्यालयाचे प्रविण हेडाऊ यांनी परिश्रम घेतले. यावेळी वृद्धाश्रमातील नागरिकांसह सेंट झेवियर्स हायस्कूलचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000000





No comments:
Post a Comment