गोंदिया, दि.15 : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इतर मागासवर्ग (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (EBC) आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती (DNT) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘पीएम यशस्वी’ (PM YASASVI) मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. पात्र विद्यार्थ्यांनी योजनांच्या स्वरूपानुसार राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) किंवा महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर २०२६ असून, सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मुदतीत भरले जातील, याची दक्षता संबंधित शाळा व महाविद्यालयांनी घ्यावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक तुषार गुरव यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ‘पीएम यशस्वी’ योजनांची अंमलबजावणी निर्धारित सूचनांनुसार राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (NSP) करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना संबंधित योजनेसाठी निश्चित केलेल्या पोर्टलची माहिती घेऊनच अर्ज सादर करावा.
*मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे अर्ज*
‘PM YASASVI Pre Matric Scholarship Scheme For OBC, EBC & DNT Students’ अंतर्गत इयत्ता नववी व दहावीमध्ये शिकणाऱ्या आणि पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पात्र मुला-मुलींनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करावेत.
इयत्ता नववी व दहावीतील ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत. तसेच इयत्ता पाचवी व आठवीतील मुलींचे शिष्यवृत्ती अर्जही पूर्वीप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर भरावेत.
याशिवाय, माध्यमिक शाळांमधील VJNT व SBC विद्यार्थ्यांसाठीची जिल्हा परिषद गुणवत्ता शिष्यवृत्ती, मुंबईपुरती मर्यादित गुणवंत शिष्यवृत्ती, दारिद्र्यरेषेखालील (BPL) विद्यार्थ्यांसाठी खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांतील शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क भरण्याची योजना आणि सैनिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता या योजनांचे अर्जही महाडीबीटी पोर्टलवरच भरावेत.
*मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज NSP पोर्टलवर*
‘PM YASASVI Post Matric Scholarship Scheme For OBC, EBC & DNT Students’ अंतर्गत इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागास प्रवर्ग (SBC) आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे नवीन (Fresh) अर्ज राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवरच भरावेत.
यामध्ये OBC विद्यार्थ्यांची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, SBC विद्यार्थ्यांची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, VJNT विद्यार्थ्यांची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्गीय मुलींच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा समावेश आहे. या चार योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर नवीन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध राहणार नसल्याने संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना NSP पोर्टलवर अर्ज भरण्याबाबत सूचना द्याव्यात.
*महाडीबीटीवर अर्ज करता येणाऱ्या सात योजना*
खालील सात योजनांचे अर्ज पूर्वीप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत :
1. राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती — VJNT व SBC प्रवर्गातील इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी.
2. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि व्यावसायिक महाविद्यालयांशी संलग्न वसतिगृहात राहणाऱ्या VJNT व SBC विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता.
3. इमाव, विमाप व विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना.
4. इतर मागासवर्ग (OBC) विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना.
5. विशेष मागास प्रवर्ग (SBC) विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना.
6. विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना.
7. OBC, VJNT व SBC प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना.
*पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मुदतीत भरण्याच्या सूचना*
शिष्यवृत्ती अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा विलंब झाल्यास संबंधित शाळा किंवा महाविद्यालय जबाबदार राहील, असे विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व संबंधित शाळा व महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांना योजनांची माहिती द्यावी, अर्ज भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करावे आणि निर्धारित मुदतीत शंभर टक्के पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सादर होतील, याची खात्री करावी.
विद्यार्थ्यांनीही अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर २०२६ लक्षात घेऊन आवश्यक कागदपत्रांसह विहित पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक तुषार गुरव यांनी केले आहे.
00000000
No comments:
Post a Comment