जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601
Thursday, 15 October 2026
अन्न व्यवसाय चालकांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे
प्रतिबंधित रंगांचा वापर टाळण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन गोंदिया, दि.15 : नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अन्न व्यवसाय चालकांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे. अन्नपदार्थांमध्ये आकर्षक रंग आणण्यासाठी प्रतिबंधित व अनधिकृत रंगांचा वापर करू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, गोंदिया कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत 13 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, फास्टफूड विक्रेते, मिठाई विक्रेते तसेच इतर अन्न व्यवसाय चालकांसाठी मार्गदर्शनपर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अन्न सुरक्षा व मानदे कायदा, 2006 आणि त्याअंतर्गत लागू नियमांच्या अनुषंगाने अन्नपदार्थांची सुरक्षितता, स्वच्छता, गुणवत्ता तसेच व्यवसायासाठी आवश्यक परवाना व नोंदणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
*अन्ननिर्मितीच्या ठिकाणी स्वच्छता राखणे आवश्यक*
अन्नपदार्थ तयार करण्याचे ठिकाण, स्वयंपाकघर, भांडी, उपकरणे आणि अन्न हाताळण्यासाठी वापरण्यात येणारी साधने स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. अन्न तयार करणाऱ्या व्यक्तींनी वैयक्तिक स्वच्छता राखावी, स्वच्छ कपड्यांचा वापर करावा आणि अन्नपदार्थ दूषित होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कच्चे व शिजवलेले अन्न स्वतंत्रपणे हाताळण्यासह अन्नपदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
*कच्च्या मालाची गुणवत्ता आणि खरेदीची बिले जतन करा*
अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा दूध, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मसाले आणि इतर कच्चा माल दर्जेदार व सुरक्षित असावा. हा माल अधिकृत किंवा विश्वासार्ह विक्रेत्यांकडून खरेदी करावा. खरेदीच्या वेळी पक्के बिल अथवा पावती घेऊन ती जतन करावी. आवश्यकतेनुसार कच्च्या मालाचा स्रोत व खरेदीचा तपशील सादर करता यावा, यासाठी संबंधित नोंदी अद्ययावत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
*फास्टफूड व इतर खाद्यपदार्थांमध्ये अनधिकृत रंगांचा वापर टाळा*
फास्टफूड, चायनीज पदार्थ, ग्रेव्ही, चटण्या तसेच इतर खाद्यपदार्थ आकर्षक दिसावेत म्हणून प्रतिबंधित किंवा अनधिकृत रंगांचा वापर करू नये. अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि गुणवत्ता यांना प्राधान्य देऊन, लागू नियमांनुसारच अन्न रंगद्रव्यांचा वापर करावा. ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही, याची प्रत्येक अन्न व्यवसाय चालकाने दक्षता घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
*अन्न व्यवसायासाठी परवाना किंवा नोंदणी बंधनकारक*
हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, मेस, मिठाई दुकाने, फास्टफूड केंद्रे, पाणीपुरी विक्रेते, चहा-नाश्ता विक्रेते, इडली-डोसा विक्रेते आणि इतर सर्व अन्न व्यवसाय चालकांनी व्यवसायाच्या स्वरूपानुसार भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाकडून (FSSAI) आवश्यक परवाना प्राप्त करावा किंवा नियमानुसार नोंदणी करून घ्यावी. व्यवसायाच्या ठिकाणी लागू असलेले परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध ठेवून त्यातील अटींचे पालन करावे.
*नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई*
आवश्यक परवाना किंवा नोंदणीशिवाय अन्न व्यवसाय करणे, परवान्यातील अटींचे उल्लंघन करणे, अस्वच्छ परिस्थितीत अन्नपदार्थ तयार करणे अथवा अन्न सुरक्षा व मानदे कायदा, 2006 मधील तरतुदींचे पालन न करणे, अशा प्रकरणांत संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार दंडात्मक व अन्य कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते.
नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि अन्नपदार्थांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी सर्व अन्न व्यवसाय चालकांनी स्वच्छता, सुरक्षितता, कच्च्या मालाची गुणवत्ता, परवाना व नोंदणी तसेच रंगद्रव्यांच्या वापरासंबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व्यवसाय चालकांनी अन्न व औषध प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
0000000
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment