छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यशाली इतिहास आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाबद्दल जनजागृती करण्याचा उद्देश
गोंदिया, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी शासनामार्फत ‘दुर्गोत्सव’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम, स्वराज्यनिर्मितीची प्रेरणा तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाबद्दल अभिमान आणि जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश आहे.
सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती तयार कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या इतिहासाची ओळख होण्यासोबतच गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व, त्यांची स्थापत्यशैली आणि स्वराज्याच्या निर्मितीतील त्यांचे योगदान समजून घेण्याची संधी मिळणार आहे.
गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करताना पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्याचा वापर करावा. प्रतिकृती तयार करताना किल्ल्यांचे ऐतिहासिक संदर्भ आणि मूळ रचनेचे महत्त्व लक्षात घ्यावे. तसेच परिसरात स्वच्छता राखावी. सार्वजनिक ठिकाणी ये-जा करण्यास अडथळा निर्माण होणार नाही आणि पर्यावरणाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
दुर्गोत्सव उपक्रमासंदर्भातील शासनाच्या मार्गदर्शक सूचना, नियम आणि निर्धारित वेळापत्रक यांची माहिती जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. अधिक माहितीकरीता जिल्हा व्यवस्थापक (अमृत) कार्तिक तिवारी (मो.9112228776) यांचेशी संपर्क साधावा.
00000000

No comments:
Post a Comment