सामाजिक न्याय भवनात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा
गोंदिया, दि.16 : आजचे युग स्पर्धेचे असून, या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासून नियोजनबद्ध अभ्यासावर भर द्यावा. वाचनाला योग्य दिशा देत ज्ञान, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर उपलब्ध संधींचे सोने करावे, असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी केले.
‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे थोर वैज्ञानिक तथा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘वाचन प्रेरणा दिन’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. रुपेशकुमार राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी अंजु निमसरकर आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे उपस्थित होते.
श्री. भोयर पुढे म्हणाले, विद्यार्थी जीवनात वाचनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नियमित वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारांना दिशा मिळते आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दररोज काहीतरी नवीन वाचण्याची सवय लावून घ्यावी. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनप्रवासातून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती प्रत्यक्षात साकार करण्यासाठी अथक परिश्रम करावेत. नियोजनपूर्वक अभ्यास, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर जीवनात निश्चितच यश मिळविता येते. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करून समाजाप्रती असलेले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ. राऊत यांनी डिजिटल युगात वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. उत्तम पुस्तके ही चांगल्या मित्रांप्रमाणे मार्गदर्शन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड निर्माण करून विविध विषयांतील ज्ञान आत्मसात करावे. विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांख्यिकीविषयक माहिती, स्वतःच्या क्षमता व मर्यादांचे विश्लेषण आणि अभ्यासाचे योग्य नियोजन यावर भर द्यावा. निश्चित उद्दिष्ट ठरवून त्याच्या पूर्ततेसाठी सातत्याने प्रयत्न केल्यास यशाचा मार्ग सुकर होतो, असे त्यांनी सांगितले.
श्रीमती निमसरकर यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाची माहिती दिली. डॉ. कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे झाला. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असूनही त्यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी लहान वयातच वर्तमानपत्र विकण्याचे काम केले. नवीन गोष्टी शिकण्याची आवड, गणिताविषयीची रुची आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांच्या बळावर त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले.
डॉ. कलाम यांनी पाहिलेले स्वप्न, त्यासाठी घेतलेले कष्ट आणि देशाच्या विकासासाठी दिलेले योगदान प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन स्वतःची उद्दिष्टे निश्चित करावीत. देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान काय असू शकते, याचा विचार करून त्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी केले. त्यांनी डॉ. कलाम यांच्या वैज्ञानिक कारकिर्दीचा आणि साहित्यिक योगदानाचा आढावा घेतला. ‘मिसाईल मॅन’ म्हणून जगभर ओळख असलेल्या डॉ. कलाम यांनी अग्निपंख, प्रज्वलित मन, माझा प्रवास, टर्निंग पॉइंट्स यांसारख्या पुस्तकांतून युवकांना प्रेरणा दिली. सकारात्मक विचार, जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर जीवनात यश संपादन करता येते, असे त्यांनी नमूद केले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाज कल्याण निरीक्षक स्वाती कापसे यांनी केले, तर आशिष जांभुळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समाज कल्याण निरीक्षक राजेश मुधोळकर, प्रमोद गणवीर, ओम नेमाडे यांच्यासह लक्ष्मण खेडकर, निशांत वाघमारे, निवेदिता बघेले, गिरीधर गोबाडे, रोहिणी रामटेके, जयश्री क्षिरसागर, दीपक मेश्राम, प्रकाश मेश्राम, मिनाक्षी बागडे, मुस्कान बिसेन, निवास शहारे, लक्ष्मण राऊत, सुरेंद्र बडोले, विद्या मेश्राम, क्रिस्टल कंपनीचे बाह्यस्रोत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
00000000




No comments:
Post a Comment