मतपत्रिका वैध ठरण्यासाठी योग्य पसंतीक्रम नोंदविण्याचे आवाहन; मतदारांनी मतदार यादीतील नाव तपासावे
गोंदिया, दि. 18 : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक-2026 च्या अनुषंगाने पदवीधर मतदारांना मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी आणि मतदान करताना कोणतीही चूक होऊ नये, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज मतदान प्रक्रियेबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी तथा पदवीधर मतदारसंघाचे नोडल अधिकारी (प्रशिक्षण) चंद्रभान खंडाईत आणि उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजय अवधाने यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रशिक्षण पार पडले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान कशा पद्धतीने करावे, मतपत्रिकेवर उमेदवारांना पसंतीक्रम कसा द्यावा आणि कोणत्या चुका टाळाव्यात, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतपत्रिका वैध ठरण्यासाठी मतदानाच्या निर्धारित नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
*मतदान करताना जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा*
मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतपत्रिकेसोबत पुरविण्यात येणाऱ्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा. अन्य कोणतेही पेन, पेन्सिल किंवा लेखनाचे साधन वापरू नये. मतपत्रिकेवर प्रथम पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रमाच्या रकान्यात ‘1’ हा अंक लिहिणे अनिवार्य आहे. हा अंक केवळ एका उमेदवाराच्या नावासमोरच नोंदवावा.
मतदारांना त्यांच्या पसंतीनुसार इतर उमेदवारांसाठी ‘2’, ‘3’, ‘4’ असे पुढील पसंतीक्रम नोंदविता येतील. मात्र, पहिल्या पसंतीव्यतिरिक्त इतर पसंतीक्रम देणे ऐच्छिक आहे. प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर वेगळाच पसंतीक्रम नोंदवावा. एकच अंक एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर लिहू नये. पसंतीक्रम अंकांमध्येच दर्शवावा; शब्दांमध्ये लिहू नये.
मतपत्रिकेवर मतदाराने स्वतःचे नाव, स्वाक्षरी, आद्याक्षरे, अंगठ्याचा ठसा किंवा ओळख पटेल अशी कोणतीही खूण करू नये. पसंती दर्शविण्यासाठी उमेदवाराच्या नावासमोर ‘✓’ किंवा ‘X’ अशी खूण न करता केवळ निर्धारित अंकांचा वापर करावा.
*चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यास मतपत्रिका अवैध ठरण्याची शक्यता*
मतपत्रिकेवर प्रथम पसंतीचा ‘1’ हा अंक न लिहिणे, तो एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर लिहिणे किंवा कोणत्या उमेदवाराला प्रथम पसंती दिली आहे, याबाबत संदिग्धता निर्माण होईल अशा पद्धतीने अंक नोंदविणे, अशा परिस्थितीत मतपत्रिका अवैध ठरू शकते. तसेच एकाच उमेदवाराच्या नावासमोर ‘1’ सोबत इतर पसंतीक्रम लिहिणे, पसंतीक्रम शब्दांत नमूद करणे, मतदाराची ओळख पटविणारी खूण करणे किंवा निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या जांभळ्या स्केच पेनऐवजी अन्य साधनाचा वापर करणे, या बाबी टाळणे आवश्यक आहे.
*मतदार यादीतील नाव तपासण्याचे आवाहन*
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी. यासाठी https://mahaelection.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन मतदारांनी आपली नावे तपासून घ्यावीत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मतदारांनी मतदानाच्या नियमांची योग्य माहिती घेऊन, निर्धारित प्रक्रियेनुसार मतदान करावे आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशिक्षणादरम्यान करण्यात आले.
00000000
No comments:
Post a Comment