जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 23 October 2026

विश्वकर्मा गुणवंत कामगार व कामगार भूषण पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

                                         20 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

            गोंदिया, दि. 23 : कामगारांच्या सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, क्रीडा तसेच संघटनात्मक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे सन २०२५ च्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया २१ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली असून, पात्र कामगार व कर्मचाऱ्यांनी २० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

           महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम, १९५३ अंतर्गत मंडळाकडे नोंदणीकृत आस्थापनांमध्ये किमान पाच वर्षे सेवा पूर्ण केलेल्या आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या कामगार व कर्मचाऱ्यांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

           सामाजिक कार्य, साहित्य, क्रीडा, शिक्षण आणि संघटनात्मक कार्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कामगारांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान केला जातो. तसेच, यापूर्वी गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार किंवा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त केल्यानंतर पुढील दहा वर्षांच्या कालावधीत साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कामगारांना त्यांच्या विशेष कार्याची दखल घेऊन कामगार भूषण पुरस्काराने गौरविण्यात येते.

           या पुरस्कारांसाठी कार्यरत कामगार व कर्मचाऱ्यांसह काही अडचणींमुळे सेवेतून निवृत्त झालेले, स्वेच्छानिवृत्ती घेतलेले तसेच आर्थिक अडचणींमुळे बंद पडलेल्या आस्थापनांतील पात्र कामगार व कर्मचारी अर्ज करू शकतात. याशिवाय, १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कामगार व कर्मचाऱ्यांनाही अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. तथापि, बंद पडलेल्या आस्थापनांतील कामगार तसेच निवृत्त कामगार व कर्मचाऱ्यांसाठी मंडळाच्या परिपत्रकात नमूद केलेल्या अटी व कालावधी लागू राहतील.

           इच्छुक व पात्र उमेदवारांनी मंडळाच्या www.public.mlwb.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेला अर्ज विहित पद्धतीने ऑनलाइन सादर करावा. कामगारांनी आपल्या कार्याची दखल घेणाऱ्या या पुरस्कारांसाठी निर्धारित मुदतीत अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे प्रभारी कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांनी केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment