गोंदिया, दि. 23 : जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची कार्यप्रणाली नव्याने विकसित करण्यात आली असून, ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन व पेपरलेस पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांना अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी किंवा अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नाही. अर्जदारांनी अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून आपल्या अर्जाची स्थिती नियमितपणे तपासावी, असे आवाहन उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य डॉ. देवसुदन धारगावे यांनी केले आहे.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या अर्जदारांनी त्याच अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून आपल्या प्रकरणाची सद्यस्थिती जाणून घ्यावी. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा अतिरिक्त कागदपत्रे व पुरावे सादर करण्याची आवश्यकता असल्यास, समितीकडून अर्जदारांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी किंवा व्हॉट्सॲप क्रमांकावर सूचना दिल्या जाऊ शकतात. अशा सूचना प्राप्त झाल्यानंतर अर्जदारांनी संकेतस्थळावर उपलब्ध सुविधेचा वापर करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि विहित मुदतीत त्रुटींची पूर्तता करावी.
*ऑनलाइन अर्ज व मदतीसाठी संपर्क*
जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता www.barti.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. ऑनलाइन अर्ज भरताना किंवा प्रक्रियेदरम्यान काही अडचणी आल्यास अर्जदारांनी पुढील संपर्क क्रमांकावर मदत घ्यावी.
• हेल्पलाईन क्रमांक : 020-26333339
• व्हॉट्सॲप क्रमांक : 9404999452
• ई-मेल : helpdesk@bartio.in
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण होत असल्याने अर्जदारांनी संकेतस्थळावर उपलब्ध सुविधांचा वापर करावा. केवळ अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी अथवा कागदपत्रांतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी समिती कार्यालयात प्रत्यक्ष भेट देणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000
No comments:
Post a Comment