जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 22 October 2026

गोंदिया जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि वॉटर मध्ये सामंजस्य करार

 


एचडीएफसी  बँकेकडून निधी; जलसुरक्षा, पाणलोट विकास, हवामानपूरक शेती व उपजीविका वृद्धीवर भर

 गोंदिया, दि. 22 : गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासन, गोंदिया आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. जिल्हाधिकारी मंदार पत्की आणि वॉटर चे कार्यकारी संचालक प्रकाश केसकर यांनी या सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या सहकार्यांतर्गत जिल्ह्यात विविध विकास प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी एचडीएफसी (HDFC) बँकेमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पांची अंमलबजावणी (WOTR) च्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत जलसुरक्षा, एकात्मिक पाणलोट विकास, नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन, हवामान बदलास अनुकूल शेती, उपजीविका वृद्धी आणि स्थानिक संस्थांचे बळकटीकरण यावर विशेष भर दिला जाणार आहे.

गोंदिया जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध नैसर्गिक संसाधने आणि स्थानिक समुदायांच्या गरजा लक्षात घेऊन विविध विकास उपक्रमांचे नियोजन केले जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांशी या उपक्रमांची सांगड घालून उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करण्यावर भर राहणार आहे.

लोकसहभागातून विकासाला चालना जल व नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, ग्रामस्तरावरील संस्थांची क्षमता वाढविणे, हवामानपूरक शेतीपद्धतींचा प्रसार आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यासाठी स्थानिक समुदायांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाचा समन्वय, एचडीएफसी (HDFC) बँकेचे आर्थिक सहकार्य आणि वॉटरचे तांत्रिक ज्ञान व अंमलबजावणीचा अनुभव यांच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यात शाश्वत विकासाच्या विविध उपक्रमांना गती देण्याचा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.

याप्रसंगी जिल्हा मृदा व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता भूमेश दामहे तसेच एचडीएफसी बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

                                                     0000000

No comments:

Post a Comment