जिल्हास्तरीय कार्यशाळेत आरोग्यदायी गावांसाठी नियोजन, समन्वय व लोकसहभागावर भर
गोंदिया, दि. 22 : ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर आरोग्यविषयक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. लोकसहभाग आणि विविध विभागांमधील समन्वयातून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान यशस्वी करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित चंद्रा दोंतुला यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्वश्री फरेंद्र कुतीरकर, मधुकर वासनिक, विजय लोंढे, कीर्तीकुमार कटरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे, कार्यक्रम मूल्यमापन अधिकारी सविता गजभिये व रजनी गजभिये, कुष्ठरोग सहायक संचालक डॉ. महेंद्र धनविजय, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश बेलमकर, सहायक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पवन राऊत, शल्यविशारद डॉ. अजय घोरमोरे आणि उपजिल्हा रुग्णालय, तिरोडाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल शेंडे उपस्थित होते.
श्री. दोंतुला पुढे म्हणाले, ग्रामीण भागात निरोगी, सक्षम, जागरूक आणि सशक्त समुदाय निर्माण करण्यासाठी आरोग्यविषयक उपक्रमांचे नियोजनबद्ध पद्धतीने कार्यान्वयन करणे आवश्यक आहे. प्रत्येक गावाच्या आरोग्यस्थितीचे प्राथमिक मूल्यांकन करून तेथील प्रमुख आरोग्यविषयक समस्या निश्चित कराव्यात. त्यानुसार गावनिहाय कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. या प्रक्रियेत ग्रामस्थ, महिला बचतगट, शाळा, अंगणवाड्या आणि युवकांचा सक्रिय सहभाग वाढवावा.
आरोग्यविषयक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय राखणे, नियमित देखरेख व मूल्यमापन करणे आणि अहवाल प्रणाली अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. गावातील स्वच्छता, आरोग्यविषयक जागरूकता आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांचा विकास यांना प्राधान्य देऊन सामूहिक कृतीतून आरोग्यसंपन्न गावांची निर्मिती करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
*अभियानातून लोकचळवळ उभी करण्याचे आवाहन*
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा शाश्वत विकास, अभियानाची उद्दिष्टे आणि त्याच्या अंमलबजावणीविषयी सविस्तर माहिती दिली. ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान जिल्ह्यात १ एप्रिल २०२६ पासून राबविण्यात येत असून ते ३१ मार्च २०२७ पर्यंत सुरू राहणार आहे. अभियानाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ग्रामस्तरावर व्यापक जनसहभागातून लोकचळवळ निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, मधुकर वासनिक, कीर्तीकुमार कटरे आणि कार्यक्रम मूल्यमापन अधिकारी सविता गजभिये यांनीही नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी संबंधित विभागांनी करावयाच्या उपाययोजना, विभागीय समन्वय आणि अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल यांनी केले. या कार्यशाळेला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, गटविकास अधिकारी, आरोग्य सेवक व सेविका, आरोग्य सहायक, तालुका विस्तार अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
0000000




No comments:
Post a Comment