जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 23 October 2026

खरीप पणन हंगामासाठी धान विक्रीकरिता ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू

 

           गोंदिया, दि. 23 : शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2026-27 मध्ये धान विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अधिकृत BEAM पोर्टलवर ऑनलाईन नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या असून, जिल्ह्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी मनोज बाजपेयी यांनी केले आहे.

          धान विक्रीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी करताना शेतकऱ्यांनी खरीप पणन हंगाम 2026-27 मधील पीकपेरा नोंद असलेला ऑनलाईन सातबारा उतारा (7/12), नमुना 8, आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक ही आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.

          तसेच, सामुहिक सातबारा उतारा असल्यास त्यावरील इतर संबंधित व्यक्तींचे संमतीपत्र आणि त्यांची आधार कार्डे सादर करणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नजीकच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी.

          शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

                                                               0000000

No comments:

Post a Comment