गोंदिया, दि.29 : यंदाच्या खरीप हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. पावसाच्या अनियमिततेचा आणि पाणीटंचाईचा परिणाम शेतीवर झाला असून, जिल्ह्यातील 1 लाख 21 हजार 484 शेतकऱ्यांचे एकूण 39 हजार 984.27 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाकडे 57 कोटी 87 लाख 96 हजार 295 रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून, पुढील हंगामाच्या तयारीसाठीही त्यांना आर्थिक आधाराची गरज आहे.
*गोंदिया आणि तिरोडा तालुक्यांत सर्वाधिक बाधित क्षेत्र आहेत :*
तालुकानिहाय आकडेवारीनुसार गोंदिया तालुक्यात 54 हजार 798 शेतकऱ्यांचे 16 हजार 671.21 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी 28 कोटी 34 लाख 10 हजार 570 रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे.
तिरोडा तालुक्यातील 33 हजार 9777 शेतकऱ्यांचे 12 हजार 228.09 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, 20 कोटी 78 लाख 89 हजार 430 रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. या दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांची संख्या आणि बाधित क्षेत्र लक्षात घेता, जिल्ह्यातील पीक नुकसानीचा मोठा भार या भागांवर पडल्याचे स्पष्ट होते.
आमगाव तालुक्यात 19 हजार 334 शेतकऱ्यांचे 4 हजार 598.60 हेक्टर, तर देवरी तालुक्यात 8 हजार 994 शेतकऱ्यांचे 4 हजार 105.08 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सालेकसा, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव आणि गोरेगाव तालुक्यांतील नुकसानीचाही अहवालात समावेश आहे.
*खरीप हंगामातील नुकसान, आगामी रब्बी हंगामाची तयारी आणि पशुधनाच्या संगोपनाचा खर्च अशा अनेक बाबींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने मदतीची मागणी करणारा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. आता या मागणीवर शासनाकडून निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा होत आहे *:जिल्हाधिकारी मंदार पत्की*
00000000
No comments:
Post a Comment