जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday 1 September 2018

मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे


राजकीय पक्षांची बैठक

     भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेलेली नाहीत अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती - सुधारणा करावयाच्या असल्यास अशा मतदारांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करता येईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे याबाबत राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती.  या कार्यक्रमात नागरीक व राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीस उपजिल्हाधिकारी (निवडणुक) शुभांगी आंधळे व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
  मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे –प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध -शनिवार, दि. 1 सप्टेंबर 2018; दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी -शनिवार, दि. 1 सप्टेंबर ते बुधवार, दि.31 ऑक्टोबर 2018 दावे व हरकती निकालात काढणे - शुक्रवार, दि. 30 नाव्हेंबर 2018 पूर्वी; डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई -गुरुवार, दि. 3 जानेवारी 2019 पूर्वी;अंतिम मतदार यादी प्रसिद्ध -शुक्रवार, दि. 4 जानेवारी 2019  दि.1 जानेवारी  2019  रोजी ज्या भारतीय नागरिकाचे वय 18  वर्षापेक्षा कमी नाही म्हणजेच ज्यांची जन्मतारीख दि.1  जानेवारी 2001  वा त्यापूर्वीची आहे व जो सामान्य रहिवाशी आहे, अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र राहील.
           दि. 1  सप्टेंबर 2018 रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेलेली नाही अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती/सुधारणा करावयाच्या असल्यास अशा मतदारांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. हे अर्ज दि.1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी (Electoral Registration Officer) (ERO) यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येतील.
लोकप्रतिनिधत्व अधिनियम, 1950 अन्यये विहित कार्यपद्धतीचे अनुपालन करुन पूर्वीच्या मतदार यादीतील मयत झालेल्या, अन्यत्र स्थलांतरीत झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत अशा वगळण्यात आलेल्या नावांची यादी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.
याद्वारे सर्व राजकीय पक्षांना विनंती करण्यात येते की, त्यांनी प्रत्येक मतदार केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (Booth Level Agent) (BLA) नेमणूक करावी शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officer) (BLO) यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे. मतदारांच्या सुलभतेसाठी www.nvsp.in या संकेतस्थावर ऑनलाईन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. उपरोक्त सर्व माहिती दि. 1 सप्टेंबर 2018 पासून संकेतस्थळावर उपलब्ध राहील, अशी माहिती याबैठकीत देण्यात आली

No comments:

Post a Comment