जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday 26 September 2019

बचतगटातील महिलांनी मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहीत करावे - श्री हाश्मी



       देश उभारणीत मतदारांची भूमिका महत्वाची आहे. धर्मनिरपेक्ष भावनेने मतदान करण्यासाठी मतदारांनी पुढे आले पाहिजे. जिल्हयातील बचतगटातील महिलांनी जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहीत करावे असे प्रतिपादन मतदार जागृती अभियानाचे नोडल अधिकारी एस.ई.ए.हाश्मी यांनी केले.
          26  सप्टेंबर रोजी प्रशासकीय इमारतीतील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात मतदार जनजागृती अभियानाच्या निमित्ताने तालुका, शहर व्यवस्थापक व क्षेत्रीय समन्वयक यांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री हाश्मी पुढे म्हणाले, मागील निवडणूकीत शहरी भागात कमी मतदान झाले होते. यावेळी जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी बचत गटांच्या महिलांनी पुढाकार घ्यावा. मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करुन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनवर मतदानाचे जास्तीत जास्त प्रात्यक्षिक मतदारांकडून करुन घ्यावे. बचतगटांनी शहरी व ग्रामीण भागात मतदाराला मतदानासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करावे. 21 ऑक्टोबर रोजी जिल्हयात जास्तीत जास्त मतदार मतदानाचा हक्क कसा बजावतील यादृष्टीने नियोजन करावे. जिल्हयातील बचतगटातील 2 लाख महिलांनी मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा व राष्ट्र उभारणीसाठी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
           श्री खडसे म्हणाले, जिल्हयात बचतगटातील प्रत्येक महिलेने एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेवून मतदार जनजागृती अभियानात आपले योगदान दयावे. लोकशाही प्रक्रीयेत मतदार हा राजा असल्यामुळे मतदानाचे महत्व त्यांना पटवून दयावे. राज्यात जास्तीत जास्त मतदान गोंदिया जिल्हयातील चारही मतदारसंघात कसे होईल यासाठी बचतगटातील महिलांनी पुढाकार घ्यावा. असे सांगितले.
          श्री चौबे म्हणाले, माविमच्या माध्यमातून मोठया प्रमाणात मतदार जनजागृती करण्यास मदत होणार आहे. मतदार जागृत झाला तर 100 टक्के मतदान होण्यास मदत होईल. मागील निवडणूकीत ज्या ठिकाणी कमी मतदान झाले आहे त्या ठिकाणी बचत गटांच्या महिलांनी जास्तीत जास्त जनजागृती करुन मोठया प्रमाणात मतदान कसे होईल यासाठी नियोजन करावे. असे ते म्हणाले.
        प्रास्ताविकातून माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री  सोसे यांनी सांगितले की, 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान आयोजित सप्ताहा दरम्यान स्वयंसहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून मतदार जागृती अभियानाअंतर्गत स्वीप संवादपर्व, संकल्प पत्र वाचन, नवीन मतदार अभिनंदन कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, चालता बोलता कार्यक्रमामध्ये प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मतदार जागृती तसेच निबंध स्पर्धा, पर्यावरणपुरक रांगोळी स्पर्धा, बचतगट, अंगणवाडी व शाळांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मतदार जागृतीसाठी सर्व गावात रॅली काढण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थितांना श्री सोसे यांनी संकल्प पत्राचे वाचन करुन शपथ दिली.

No comments:

Post a Comment