जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday 21 October 2018

सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करावे - ना.गिरीश बापट




 रेशन दुकानदारांनी आपल्या कर्तव्याची जाणिव ठेवून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून प्रत्येक रेशन कार्डधारकाला धान्य वितरणाचा लाभ देण्याचे काम करावे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी केले.
        जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 21 ऑक्टोंबर रोजी पुरवठा विभागाचा संगणकीकरण कामाचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार गोपालदास अग्रवाल, मंत्रालयीन पुरवठा विभागाचे सहसचिव अभिमन्यू काळे, उपसचिव श्री.सुपे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, उपायुक्त रमेश आडे, जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के.सवई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       श्री.बापट पुढे म्हणाले, जिल्ह्याचे काम समाधानकारक आहे. प्रत्येकाला आपल्या कामकाजाप्रती दक्षता घेवून कर्तव्याची जाणिव असायला पाहिजे. कामकाज करतांना नियमात राहून मनमोकळेपणे काम करावे. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून योग्य नियोजनातून आदर्श जिल्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करा. गरीब आणि सामान्य जनतेकरीता रेशनींग सिस्टीम आहे. त्यामुळे सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम केले पाहिजे. दुकानदार हा अन्नधान्य देण्याबाबत शेवटचा घटक आहे. त्यामुळे दुकानदार देखील जगला पाहिजे यासाठी दुकानदारांना जवळ घेवून काम करावे. बँक मित्र म्हणून ई-पॉस मशिनचा उपयोग होतो. कोणतेही काम करतांना लोकप्रतिनिधी आणि अधिकारी  यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. ग्राम दक्षता समित्यांच्या नियमीत बैठका घेण्यात यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्यात उत्पादन होणारा सेंद्रीय तांदूळ प्रयेक रेशन दुकानदारांपर्यंत पोहोचवावे तसेच यावर्षी धान्याची साठवणूक करण्याकरीता गोडावूनबाबत अडचणी येणार नाहीत यावडे विशेष लक्ष्य देण्यात यावे असे त्यांनी सांगितले.
       आमदार अग्रवाल म्हणाले, जिल्ह्यातील रेशन दुकानदारांची तपासणी होत नाही. रेशन दुकानातून रॉकेलचा व धान्याचा काळाबाजार होत असल्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक रेशन दुकानदारांची योग्य ती तपासणी करण्यात यावी, जेणेकरुन रेशन दुकानातून काळाबाजार करण्यावर आळा बसेल असे त्यांनी सांगितले.
       प्रास्ताविकातून जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.सवई म्हणाले, जिल्ह्यात एकूण 998 रेशन दुकाने आहेत. त्याचे कामकाज ई-पॉस मशिनद्वारे होत असून मिशन मोडवर काम सुरु आहे असे सांगितले.
       यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील काही रेशन दुकानदारांनी आपले कर्तव्य समजून चांगले काम केल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
        बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी हरिश धार्मिक, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व पुरवठा निरीक्षक तसेच रेशन दुकानदार बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के.सवई यांनी केले व सर्व उपस्थितांचे आभार मानले.   
                                                             000000

No comments:

Post a Comment