जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 14 August 2026

नवीन सेवार्थ प्रणालीचे कामकाज पूर्ण करण्यासाठी सर्व कोषागार कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरु

 


         गोंदिया, दि.14 : वेतनाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून वित्त विभागाचे दि.1 जुलै 2026 चे शासन निर्णयानुसार नवीन सेवार्थ प्रणाली लागु केली आहे. या नवीन सेवार्थ प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जुन्या सेवार्थ प्रणालीमधील सर्व कर्मचाऱ्यांची माहिती आणि सेवा तपशील नवीन पोर्टलवर स्थलांतरित (Data Migration) करण्याची प्रक्रिया सध्या कोषागार कार्यालय स्तरावर युद्ध पातळीवर सुरु असून विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना जुन्या सेवार्थ प्रणालीमध्ये कोणतेही नवीन कामकाज किंवा बील निर्मिती दि.20 ऑगस्ट 2026 नंतर करता येणार नाही.

          गोंदिया जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी, कार्यालय प्रमुख आणि कर्मचारी यांनी याची गांभिर्यानी नोंद घ्यावी व Data Migration ची प्रक्रिया आणि नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये माहे जुलै 2026 चे वेतन देयक तयार करणे (Pilot Bill Generate) इत्यादी कामकाज दि.20 ऑगस्ट 2026 पूर्वी पूर्ण करावे. याबाबत कोणालाही मुदतवाढ मिळणार नाही असे संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई यांनी निर्देश दिले आहे.

          तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी नवीन सेवार्थ प्रणाली मध्ये Data Migration व Pilot देयक तयार करण्याबाबत विहीत कालावधीत कामकाज पूर्ण करण्याबाबत कोषागारास सहकार्य करावे. सदर कामकाज विहित कालावधीत पूर्ण करण्याकरिता सर्व कोषागार/उपकोषागार कार्यालय सुट्टीच्या दिवशी सुरु राहतील, असे जिल्हा कोषागार अधिकारी तौसीफ हसीन यांनी कळविले आहे.

                                                                        00000000

विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनविणे बंधनकारक

 


           गोंदिया, दि.14 : शासकीय आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2026-27 मधील शेतकरी नाव नोंदणी बाबत शासनाकडून सूचना प्राप्त झालेल्या आहेत. सदर शासन निर्णयात ऑनलाईन नाव नोंदणीकरीता कृषि विभागाकडून लागु करण्यात आलेल्या ॲग्रीस्टॅक (AgriStak) या संकेतस्थळावर नोंदणी करुन फार्मर (Farmer) आयडी बनविणे बंधनकारक केलेले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या ॲग्रीस्टॅक (AgriStak) या संकेतस्थळावर आपले आधार क्रमांक, मोबाईल नंबर व पीक पेरा नोंद असलेले 7/12 उतारे घेऊन नोंदणी करावी व फार्मर आयडी (Farmer ID) तयार करुन घ्यावी. असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी मनोज बाजपेयी यांनी केले आहे.

                                                 0000000

जलसंधारण सप्ताह 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान : तालुका स्तरावर राबविण्यात येणार विविध उपक्रम

 


           गोंदिया, दि.14 : स्व. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्रातील जलसंधारणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले असून पाणी अडवा, पाणी जिरवा  या विचारातून पाणलोट विकास, भूजल पुनर्भरण तसेच लघु जलसंधारणाच्या कामांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या जलसंधारणातील उल्लेखनीय कामांमुळे त्यांचा जन्मदिवस 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करणेबाबत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची संकल्पना असून मंत्री, मृद व जलसंधारण विभाग यांच्या निर्देशानुसार 21 ऑगस्ट 2026 हा स्व. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीदिनी जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यानिमित्ताने दि.15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह साजरा करण्याचे शासनाचे धोरण आहे.

           गोंदिया जिल्ह्यात सुध्दा जलसंधारण सप्ताह 15 ते 21 ऑगस्ट 2026 पर्यंत तालुका स्तरावर उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानुसार दि.15 ऑगस्ट रोजी जलसंधारणाची शपथ घेणे. दिनांक 16 ते 20 ऑगस्ट 2026 पर्यंत जलसंधारण विषयक निबंध, चित्रकला, घोषवाक्य व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे. विद्यार्थ्यांसाठी जलसंधारण व पाणी बचतीबाबत व्याख्याने/मार्गदर्शन सत्रे आयोजित करणे. स्थानिक जलस्त्रोत, तलाव, बंधारे इत्यादींच्या संवर्धनाबाबत जनजागृती करणे. विद्यार्थ्यांना जलदूत/जलसंधारण दूत म्हणून सहभागी करुन घेऊन जलसंधारणाचा संदेश कुटुंब व समाजापर्यंत पोहोचविणे. पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेवर आधारित जनजागृती करणे. पावसाचे पाणी साठवणूक, भूजल पुनर्भरण व पाणी बचतीच्या उपाययोजनांची माहिती विद्यार्थ्यांना देणे. दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी सर्व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर (Maha Walkathon-Walk for Water) उपक्रम राबविण्यात येणार आहे.

                                              0000000

माती व पाणी संवर्धनासाठी 'रील स्पर्धा'; 15 ते 30 वयोगटातील तरुणांना सहभागाचे आवाहन

 


       गोंदिया, दि.14 : मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने माती व पाणी वाचवा, भविष्य सुरक्षित करा ("Save Soil, Save Water, Secure Tomorrow )" या विषयावर राज्यस्तरीय इन्स्टाग्राम रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ते 30 वयोगटातील तरुणांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

          स्पर्धेसाठी 30 ते 60 सेकंदांची रील तयार करून ती 15 ते 19 ऑगस्ट 2026 या कालावधीत स्वतःच्या सार्वजनिक इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करावी लागेल. रील पोस्ट करताना #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरणे तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग करणे अनिवार्य आहे.

         सहभागासाठी QR कोड स्कॅन करून नोंदणी Reel Link Submit जिल्हा निवड Verification सहभाग प्रमाणपत्र अशी सोपी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. इन्स्टाग्रामवरील पोस्टसोबत स्वतंत्र डिजिटल नोंदणी केल्यामुळे शासनाकडे प्रत्येक सहभागीची अधिकृत नोंद उपलब्ध राहणार आहे.

        प्रत्येक सहभागीला जास्तीत जास्त तीन रील अपलोड करता येणार असून, उत्कृष्ट ठरणाऱ्या तीन रीलना शासनाकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिकाधिक तरुणांनी या उपक्रमात सहभागी होऊन माती व पाणी संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 0000000

गोंदिया जिल्ह्यातील विकासकामांचा पालक सचिवांकडून आढावा; मुलींसाठी शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश

 





       गोंदिया, दि.14 : शाळेतील मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी शासकीय तसेच अशासकीय शाळांमध्ये मुलींसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव रणजीत सिंह देओल यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत दिले. यासह जिल्ह्यातील  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (घरकुल योजना), जलजीवन मिशन, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM), जलयुक्त शिवार, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, वन विभागाची माहिती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-2026, पावसाची माहिती, कृषी विभागाची माहिती- पिक परिस्थीती, खते, पीएम श्री शाळा, शिक्षण विभाग या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात झाली.

          जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी श्री. देओल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या बैठकीस जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी झेनिथ दोंतुला, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग, अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील यांच्यासह इतर विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

          मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दोन्तुला यांनी जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (घरकुल योजना) योजनेविषयी माहिती देत सांगितले की, याअंतर्गत जिल्ह्यात एकूण 1,37,203 सर्वेक्षणे पूर्ण करण्यात आलेली आहेत. 15 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित ग्रामसभेत कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी (Priority Waiting List) अंतिम करण्याच्या सूचना देण्यात आलेले असल्याची माहिती यावेळी दिली. जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू असून वर्ष 2026-27 साठी जिल्ह्यातील एकूण घरगुती नळ जोडणी 54110 करणे असल्याची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत होत असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि यावर्षीच्या मिळालेल्या उद्दिष्टाची पूर्तता करावी, अशा सूचना श्री. देओल यांनी यावेळी केल्या. जलयुक्त शिवार टप्पा 2 अंतर्गत विशेष निधीतून 99.91% आणि अभिसरणातून 98.90% कामे झाली असल्याची माहिती दिली. कुडवा येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू असून सदर महाविद्यालयाला 2013 मध्ये मंजुरी मिळालेली असून आतापर्यंत बांधकाम पूर्ण झाले नसल्याचे सांगण्यात आले असून सदर महाविद्यालयात 60:40 याप्रमाणे केंद्र शासन आणि राज्य शासनाचा हिस्सा आहे. केंद्र शासनाकडून निधीची उपलब्धता नसल्याने कामात अडथळा येत आहे असे श्री. देओल यांना सांगण्यात आले.

           जिल्ह्यात वनसंपदा मोठ्या प्रमाणात असून येथे पर्यटनास भरपूर वाव असल्याचे सांगितले. हाजरा फॉल आणि बोदलकसा पर्यटन वाढीला प्रचंड संधी असून वन विभाग याप्रमाणे पावले उचलत असल्याचे श्री. जोंग यांनी सांगितले. यासह वन्य जीव मानव संघर्ष अंतर्गत अपघात झालेल्या व्यक्तींना शासनाच्या ठरवून दिलेल्या मानकानुसार मदत केली जात असल्याचेही सांगितले. यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जनजागृतीचा शिबिरही वन विभागाकडून आयोजित केले जात असल्याचे श्री. जोंग यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात सध्या 32 सारस पक्षांच्या जोड्या असून यांचे सर्वेक्षण शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत असून त्यांनाही आर्थिक पाठबळ देण्याचे काम केले जात असल्याचे यावेळी सांगितले.

          पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-2026 बाबतची जनजागृती शेतकऱ्यांमध्ये करण्यात आलेली असून जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राष्ट्रीयकृत बँकेमध्ये शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम बऱ्यापैकी झालेले असल्याची माहिती दिली आणि प्रथम टप्प्यात 12000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 75 कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा झाली असल्याचीही माहिती जिल्हाधिकारी श्री. पत्की यांनी दिली.

          यावर्षी अलनिनोचे सावट असताना सुद्धा गोंदिया जिल्ह्याचे पर्जन्यमान चांगले असून पेरणी वेळेवर झाली आहे. खतांचा तुटवडा जिल्ह्यात नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. कानवडे यांनी सांगितले. सुरुवातीच्या काळात पाऊस थोडा उशिरा आला, मात्र जिल्ह्यात 96.7% आतापर्यंत पाऊस आलेला आहे. पावसामुळे आतापर्यंत किरकोळ नुकसान झालेले असून नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू आहे.

          जिल्ह्यात 21 पीएम श्री शाळा असून या शाळेमध्ये देण्यात येणाऱ्या विशेष सोयी सुविधांमुळे या शाळेतील विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेत मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण झाले असल्याची माहिती देण्यात आली. तसेच या शाळांमध्ये मूलभूत सुविधा चांगल्या असाव्यात याकडे कटाक्षाने लक्ष देण्यासंदर्भात श्री. देओल यांनी यावेळी निर्देशित केले.

         केंद्र सरकारशी निगडीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोडून अन्य कुठलाही विषय नसल्याचे सांगण्यात आले. समृद्धी महामार्ग संदर्भातील अधिक्रमण पूर्ण झालेले असल्याची माहिती देण्यात आली. आपले सरकार आणि प्रगती पोर्टलवर येणाऱ्या समस्यांचे निराकरण झपाट्याने होत असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्री. पत्की यांनी दिली.

         केंद्र शासनाच्या आकांक्षीत जिल्ह्याच्या यादीत गोंदिया जिल्ह्याचे नाव नसून राज्य शासनाच्या यादीत जिल्ह्यातील सालेकसा, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी व देवरी या तालुक्यातील काही भाग असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे आणि मूल्यमापनाप्रमाणे या ठिकाणी कामे सुरू आहेत.

         नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पाच विभागाकडून काम होत असून याबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला.

00000000

Thursday, 13 August 2026

पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते होणार मुख्य कार्यक्रमाचे ध्वजारोहण

 

 

         गोंदिया, दि.13 : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस मुख्यालय मैदान, कारंजा (गोंदिया) येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे.

        याप्रसंगी उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

         येथील नविन प्रशासकीय इमारतीत उविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्या हस्ते सकाळी 7.30 वाजता आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते सकाळी 8.15 वाजता ध्वजारोहण होणार आहे.

        सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत कोणतेही बॅग किंवा तत्सम वस्तू आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था आदींनी त्यांचे ध्वजारोहणाचे समारंभ सकाळी 8.35 वाजेपूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0000000

पालकमंत्री इंद्रनील नाईक दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 


           गोंदिया, दि.13 : उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांचे दिनांक 14 ऑगस्ट रोजी सोईनुसार शासकीय विश्रामगृह रविभवन, नागपूर येथून मोटारीने गोंदियाकडे प्रयाण. सोईनुसार शासकीय विश्रामगृह, गोंदिया येथे आगमन व राखीव.

          15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह, गोंदिया येथून मोटारीने पोलीस मुख्यालय मैदान, कारंजाकडे प्रयाण. सकाळी 9.00 वाजता पोलीस मुख्यालय मैदान, कारंजा येथे आगमन. सकाळी 9.05 वाजता पोलीस मुख्यालय मैदान कारंजा (गोंदिया) येथे भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहण समारंभास उपस्थिती. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व राखीव. सोईनुसार गोंदिया येथून मोटारीने पुसद जि.यवतमाळकडे प्रयाण करतील.

0000000