जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 15 January 2018

लोकराज्य पोलीस विशेषांकाचे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते विमोचन

    शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचा जानेवारी 2018 चा अंक हा आपले पोलीस आपली अस्मिता यावर आधारीत पोलीस विशेषांक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आला आहे.
      पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांच्या कक्षात 15 जानेवारी रोजी लोकराज्य पोलीस विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा अग्रणी प्रबंधक दिलीप सिल्हारे, नाबार्ड जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      लोकराज्यचा हा पोलीस विशेषांक पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा आहे. अंकातील माहिती पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ज्ञानात भर घालणारी आहे. या अंकामधील माहितीमुळे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक सक्षमतेने काम करण्यास मदत होणार आहे. तसेच हा अंक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांनी विमोचनप्रसंगी व्यक्त केले.

    या लोकराज्य पोलीस विशेषांकात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात पोलिसांचा मोठा हातभार लागला असून कायदा व सुव्यवस्था उत्तमप्रकारे हाताळण्यात आली आहे. दहशतवाद, नक्षलवाद, सायबर गुन्हेगारी, आर्थिक गुन्हेगारी या प्रकारच्या आव्हानांचा सामना महाराष्ट्र पोलीस समर्थपणे करीत असल्याची माहिती असून सुरक्षीत सुव्यवस्थीत महाराष्ट्र यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रतिसाद आणि प्राधान्य यावर गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजीत पाटील यांनी या विषयावर विशेषांकाच्या माध्यमातून विचार व्यक्त केले आहे. महामार्गाचे रक्षक, फोर्स वन, तत्पर तपास आणि अपराधसिध्दीत वाढ, संवेदनशील कार्यक्षमता, पोलिसांना उच्च शिक्षणाची संधी, गुन्हेसिध्दीचे शास्त्रीय तंत्र, डिजीटल तपासाची स्मार्ट दिशा, सायबर युगाची आव्हाने, सायबर गुन्ह्यांचा पाठलाग, सागरी सुरक्षीततेची सज्जता, गृहरक्षक, संपर्कदूत दक्षता यासह गोंदिया जिल्ह्याच्या वनवैभव आणि निसर्ग पर्यटनावर लेख सुध्दा या अंकात आहे. या अंकाची किंमत केवळ 10 रुपये असून हा अंक विक्रीसाठी जिल्हा माहिती कार्यालय येथे उपलब्ध आहे.

Wednesday, 10 January 2018

मुद्रा बँक योजना मिशन मोडवर राबविणार - वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार

आतापर्यंत 50 लाख 38 हजार जणांना कर्जवाटप
देशातील आर्थिक विषमता दूर करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्र्यांनी सुरू केलेली मुद्रा बँक योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. योजनेतून मागील दोन वर्षात  50 लाख 38 हजार जणांना कर्ज वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यापुढील काळातही ही योजना प्रभावीपणे राबवून बेरोजगारांचे जीवनमान बदलण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुद्रा बँक योजनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, गोरगरिबांना विनातारण आणि विनाजामीन कर्ज मिळावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वाकांक्षी अशी मुद्रा बँक योजना सुरू केली आहे. मागील साधारण दोन वर्षात राज्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. योजनेतून 2016 - 17 मध्ये 16.9 हजार कोटी रुपयांचे तर 2017 - 18 मध्ये आतापर्यंत 8.8 हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. 2016 - 17 मधे 33 लाख 44 हजार तर 2017 - 18 मधे आतापर्यंत 16 लाख 93 हजार इतक्या बेरोजगारांना आपण या योजनेतून व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले आहे. यापुढील काळातही मिशन मोडवर ही योजना राबवून जास्तीत जास्त बेरोजगारांना कर्ज आणि कोशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याची जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यात यावी. याबरोबरच फक्त कर्ज वितरण न करता लाभार्थ्याला कौशल्य विकास प्रशिक्षणही देण्यात यावे, त्यामुळे मिळालेले कर्जाचे पैसे त्याला योग्य पद्धतीने वापरता येतील. प्रशिक्षण, कार्यशाळा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यावरही भर देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
मागील दोन वर्षांच्या काळात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक तर नंदुरबार आणि गडचिरोली जिल्ह्यात कमी कर्जवाटप झाल्याची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. त्यावर योजनेचा उद्देशच आर्थिक विषमता दूर करणे हा आहे, त्यामुळे राज्यातील विशेषतः मागास जिल्ह्यातही योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशा सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.
नोकरी मागणाऱ्या हातापेक्षा नोकरी देणाऱ्या हातांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. या धोरणातूनच पुढे आलेल्या या योजनेला अधिक प्रभावी करण्यासाठी त्याची कौशल्य विकास विभाग, स्टार्टअप योजना, बचतगट विषयक विविध योजना यांच्याशी सांगड घालून पुढील आर्थिक वर्षातही ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

बैठकीस आमदार अनिल सोले, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी. के. जैन, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, कौशल्य विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, आयटी सचिव श्रीनिवासन, एसएलबीसीचे समन्वयक श्री. मस्के, ग्रामीण जिवनोन्नती कार्यक्रमाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्यासह मुद्रा बँक योजनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीचे विविध सदस्य आदी उपस्थित होते. 

Saturday, 6 January 2018

गावे आजारमुक्त करण्यासाठी शोषखड्डे आवश्यक - अभिमन्यू काळे

                                 • डासमुक्त गावासाठी सभा

• माहूर पं.स.सभापतीने केले सादरीकरण
      अनेक आजार हे सांडपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या डासामुळे होतात. सांडपाण्याचा योग्य निचरा झाला पाहिजे. तरच भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. गावे डासमुक्त झाली तरच गावे आजारमुक्त होईल, यासाठी शोषखड्डे करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
      तिरोडा येथील अदानी वीज निर्मिती प्रकल्पातील सभागृहात 4 जानेवारी रोजी शोषखड्डे निर्मितीतून डासमुक्त गाव करण्यासाठी आयोजित कार्यशाळेत जिल्हाधिकारी काळे हे अध्यक्ष म्हणून बोलत होते. सभेला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मंताडा राजा दयानिधी, माहूर पं.स.सभापती मारुती रेकुलवार, अदानी प्रकल्पाचे स्टेशन हेड श्री.साहू यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री.काळे म्हणाले, यावर्षी दुष्काळ सदृश्यस्थिती आहे. त्यामुळे आतापासून नियोजन करुन शोषखड्डे तयार करण्याचे आणि छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संकलन मोठ्या प्रमाणात करावे लागणार आहे. दुष्काळ सदृष्य परिस्थितीमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन दयावा लागणार आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त रोजगाराची कामे उपलब्ध करुन देण्यासाठी 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी आतापासूनच खड्डे करावे. रब्बी हंगामात सुध्दा पाणी सिंचनासाठी उपलब्ध होणार नसल्यामुळे रोहयोतून मोठ्या प्रमाणात कामे घ्यावी असे त्यांनी सांगितले.
      ज्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे त्या गावांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आतापासूनच नियोजन करावे असे सांगून श्री.काळे म्हणाले, पिण्याच्या पाण्याच्या योजनांची दुरुस्ती करावी. सार्वजनिक विहिरीतील गाळ काढून घ्यावा. ज्या ठिकाणी विंधन विहिरीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी विंधन विहिरीसाठी मंजूरी घ्यावी. नादुरुस्त विंधन विहिरींची दुरुस्ती करावी. पाईप कमी पडत असतील तर बोअरसाठी पाईपची मागणी करावी. गावांसाठी ज्या ठिकाणावरुन पाणीपुरवठा करण्यात येतो तेथील पाण्याच्या स्त्रोतावर शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतीतील विहीर किंवा विंधन विहिरीचा परिणाम होत असेल तर अशांवर पाणी उपसा करण्यास बंदी घालावी व संभाव्य पाणीटंचाईवर मात करावी असे त्यांनी सांगितले.
      रोजगार हमी योजनेची कामे प्रत्येक तालुक्यातील 10 गावात येत्या 10 जानेवारीपासून सुरु करावी असे निर्देश देवून श्री.काळे म्हणाले, 26 जानेवारीपर्यंत 1 लाख मजूर रोहयोच्या कामावर असतील असे नियोजन करावे. पिण्याच्या पाण्याची टंचाई ज्या गावांना भासणार आहे त्या गावांचे प्रस्ताव पाठवावे असे ते म्हणाले.
      श्री.दयानिधी म्हणाले, शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल विभागाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यासाठी ज्यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र नाही अशांना जातीचे प्रमाणपत्र तातडीने मिळवून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी सहकार्य करावे. जिल्ह्यातील अनेक ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. जे ग्रामसेवक मुख्यालयी राहणार नाही त्यांचा घरभाडे भत्ता कपात करण्यात येईल. यापूर्वी देण्यात आलेला घरभाडे भत्ता देखील वसूल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      श्री.रेकुलवार यांनी आपल्या सादरीकरणातून माहूर तालुक्यातील लांजी या गावी तत्कालीन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.काळे यांच्या संकल्पनेतून गावे डासमुक्त करण्यासाठी मी सरपंच असतांना लांजीत प्रत्येक घरी सांडपाण्याचा जमिनीत योग्य निचरा व्हावा यासाठी शोषखड्डे केले. शोषखड्यामुळे गाव डासमुक्त तर झालेच सोबत या पाण्याचा जमिनीत चांगला निचरा होत असल्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. पूर्वी उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचे स्त्रोत कोरडे पडायचे मात्र शोषखड्डयामुळे पाण्याचा निचरा होवू लागल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात देखील विहीरी, विंधन विहिरींना देखील चांगले पाणी उपलब्ध झाले. 300 कुटूंबाच्या लांजीत दररोज दीड लाख लिटर पाणी इतरत्र वाहून न जाता भूगर्भात साठविले जाते. वर्षभरात 5 कोटी 40 लक्ष लिटर पाण्याचा निचरा होत असल्याचे सांगून श्री.रेकुलवार म्हणाले, शोषखड्डयामुळे संपूर्ण गाव डासमुक्त तर झालेच सोबत आजारमुक्त झाल्याचे सांगितले.
    जिल्हा डासमुक्त करण्यासाठी शोषखड्डे तयार करण्याच्या नियोजनाबाबतची माहिती सहायक प्रकल्प अधिकारी (रोहयो) यांनी तालुक्यातील गावनिहाय दिली. सभेला उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, गंगाराम तळपाडे, अदानी फाउंडेशनचे नितीन शिराळकर, सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी आणि सहायक प्रकल्प अधिकारी (रोहयो) यांची उपस्थिती होती.

Wednesday, 3 January 2018

आज संस्कारीत माणसांची गरज - हरिभाऊ बागडे

महागाव येथे पुरस्काराचे वितरण

      समाजातील गरजू लोकांना शामरावबापू कापगते यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. अशा समाजाच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले. दुष्काळाच्या काळात सुध्दा त्यांनी विदर्भ मराठवाड्यातील लोकांना मदत केली. ते संस्कारीत असल्यामुळेच त्यांनी समाजातील गरजवंतांना मदत केली. आज अशाप्रकारच्या संस्कारीत माणसाची गरज आहे. असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.
      3 जानेवारी रोजी अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील महागाव (शिरोली) येथील श्यामाप्रसाद कनिष्ठ महाविद्यालयात शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील व्यक्तींचा श्री.बागडे यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार हेमंत पटले होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय संघचालक दिनेशभाई पटेल, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, अर्जुनी/मोरगावच्या नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, कमल पाऊलझगडे, मंदा कुमरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.गजानन डोंगरवार, ऋषी शहारे यांची उपस्थिती होती.
      आणीबाणीच्या काळात शामरावबापूंनी कारावास भोगल्याचे सांगून श्री.बागडे म्हणाले, 1972 च्या दुष्काळात सुध्दा त्यांनी लोकांना मदत केली. समाजासाठी काम करीत असतांना त्यांनी वेळेचे नियोजन केले. विद्यार्थ्यांनी सुध्दा विद्यार्थी जीवनात वेळेचे नियोजन करुन यश संपादन करावे. स्वावलंबनासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्यविषयक शिक्षण घ्यावे. यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. आता उत्पन्नाची मर्यादा देखील वाढविण्यात आली आहे. अपघात विमा योजना, अटल पेंशन योजना याचा जास्तीत जास्त फायदा नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
      श्री.पटेल म्हणाले, प्रत्येकजन आज यश संपादन करण्यासाठी कार्य करीत आहे. शामरावबापूंनी आपले संपूर्ण जीवन समाजकार्यासाठी वाहून घेतले. गरजवंतांना त्यांनी मदत केली. सामाजिक उत्तरदायित्वाची भावना त्यांच्याठिकाणी होती असे ते म्हणाले.
      श्रीमती गहाणे म्हणाल्या, प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत आहेत. समाज व निसर्गाप्रती आपली जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. आज समाज कोणत्या दिशेने वाटचाल करतो आहे हे बघण्याची वेळ आहे. समाजाला काहीतरी आपले देणे आहे या भूमिकेतून शामरावबापूंनी काम केल्याचे त्यांनी सांगितले.
      यावेळी विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्या हस्ते सेवाव्रती पुरस्कार डॉ.देवाशिष चॅटर्जी (गोंदिया), गोरक्षा पुरस्कार नमुदेव ठाकरे (माहुरकूडा), संभा पंधरे (शिरोली), श्रमिक पुरस्कार किसन सूर्यवंशी (शिरोली), ल.वा.भोयर (मडेघाट), युवा पुरस्कार माधुरी वैद्य (दिघोरी/मोठी), वनश्री पुरस्कार शरद भुजाडे (पिंडकेपार), शिक्षक पुरस्कार अंगेश बेहलपांडे (लाखोरी), हेमराज हेमने, रामकृष्ण परशुरामकर, पंढरी दुधबरे, कला पुरस्कार मुलचंद गहाणे, कृष्णा किरसान, साहित्य पुरस्कार बंडोपंत बोडेकर (चंद्रपूर), डॉ.चंद्रकांत लेनगुरे (गडचिरोली), पत्रकारिता पुरस्कार अमरचंद ठवरे (बोंडगाव/देवी), आत्माराम मस्के (शिरोली), जीवन गौरव पुरस्कार डॉ.विलास डांगरे (नागपूर), मातोश्री पुरस्कार विशाखा गुप्ते (भंडारा), खेळाडू पुरस्कार शशीकला आगाशे, शेती पुरस्कार राजेंद्र सांभारे व अलका दुधबरे यांना पीएचडी मिळाल्याबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवून सन्मानीत करण्यात आले.
      यावेळी डॉ.हेमकृष्ण यांनी लिहिलेल्या ‘हाती घे मशाल’ या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, मलखांब कवायती, दोरीवरच्या कवायती, शेतकरी समुह नृत्य सादर करुन उपस्थितांची प्रशंसा मिळविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार ॲड.मनीष कापगते यांनी मानले. कार्यक्रमाला महागाव (शिरोली) परिसरातील ग्रामस्थ, शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त माविमद्वारे महिलांची मोटरसायकल रॅली

• 8 महिलांना मायक्रो एटीएमचे वाटप

                                  • लोकसंचालीत केंद्रांना धनादेश वाटप


     महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयच्या वतीने 3 जानेवारी रोजी नेहरु चौक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 187 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, नागपूर विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मतांदा राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक नीरज जागरे, समाज कल्याणचे सेवानिवृत्त प्रादेशिक उपायुक्त अनिल देशमुख, जि.प.माजी सभापती सविता पुराम, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
      जिल्हाधिकारी काळे यांनी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या. बचतगटाच्या माध्यमातून माविम मोठ्या प्रमाणात महिला सक्षमीकरणावर सातत्याने भर देत आहे. जिल्ह्यातील महिलांना बचतगटाच्या माध्यमातून व्यवसाय वाढीसाठी सहकार्य करणार असल्याचे श्री.काळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.
     श्री.ठाकरे यावेळी म्हणाले, महिलांच्या सक्षमीकरणात सावित्रीबाई फुलेंचा मोलाचा वाटा आहे. महिला त्यांच्या आदर्शावरच वाटचाल करुन स्वावलंबी बनत आहे.
     श्री.दयानिधी म्हणाले, महिलांनी सर्वांगीण विकासासाठी संघटीत होवून काम करावे. सामाजिक विकासात महिलांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिला आज सक्षम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
     डॉ.भूजबळ म्हणाले, महिलांना सामाजिक सुरक्षा पोलीस विभागामार्फत पुरवून कायदेशीर मदत दिली जाईल. जिल्ह्यात माविमच्या माध्यमातून ग्रामीण भागात महिलांचे चांगले संघटन असून अनेक महिला आज उद्योग व्यवसाय करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
     प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महिलांच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी बचतगटातील तुलसी चौधरी, भिमा पटले, शाहिस्ता शेख, अनिता चिखलोंडे, दुर्गा रंगारी, शोभा तावाडे, सुनिता शिवणकर, सत्यशिला भगत या 8 महिलांना मायक्रो एटीएमचे वाटप करण्यात आले.  उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्र गोंदिया व स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगाव यांना आर्थिक मध्यस्थता उपक्रमाकरीता प्रत्येकी 24 लाख रुपयाचे धनादेश देण्यात आले.
     पंडीत नेहरु यांच्या पुतळ्याजवळ माविमच्या बचतगटातील महिला तसेच शहरातील महिला व युवतींच्या मोटरसायकल रॅलीला मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. ही रॅली शहरातील मुख्य मार्गावरुन फिरुन नेहरु चौक येथ विसर्जीत झाली. या रॅलीमध्ये ई-व्हेईकलचा सुध्दा समावेश होता. रॅलीतील आकर्षक चित्ररथात सावित्रीबाईच्या वेशभुषेत अनिता बडगे होत्या. कार्यक्रमस्थळी विविध वस्तूंचे विक्री स्टॉल लावण्यात आले होते.
      कार्यक्रम व रॅलीच्या यशस्वीतेसाठी सहायक जिल्हा समन्वयक अधिकारी सतीश मार्कंड, लेखाधिकारी योगेश वैरागडे, सहायक नियंत्रण अधिकारी प्रदिप कुकडकर, उपजिविका सल्लागार श्री.बांगरे, श्री.पंचभाई, धनराज बनकर, श्रीमती बिसेन, मोनिता चौधरी, आशिष बारापात्रे यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी केले. संचालन शालु साखरे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रिया बेलेकर यांनी मानले. कार्यक्रम व रॅलीत मोठ्या संख्येने महिला व युवतींचा सहभाग होता.

विद्यार्थ्यांनो ! बौध्दीक क्षमता वाढविण्यासाठी कष्ट करा - हरिभाऊ बागडे

      सावित्रीबाई फुलेंनी पावनेदोनशे वर्षापूर्वी शिक्षणाचा विळा उचलला. त्या काळी मुलींनी शिक्षण घेवू नये अशी मानसिकता होती. आज मुली सावित्रीबाईंचा आदर्श पुढे ठेवून अनेक क्षेत्रात पुढे आल्या आहेत. आता विद्यार्थ्यांनी बौध्दीक क्षमता वाढविण्यासाठी कष्ट करण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.
     अर्जुनी/मोरगाव येथील शिवप्रसाद जायस्वाल महाविद्यालयात 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारंभाचे उदघाटक म्हणून श्री.बागडे बोलत होते. अध्यक्षस्थानी लुणकरण चितलांगे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, बद्रीप्रसाद जायस्वाल, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य मंदा कुमरे, नामदेव कापगते, शिवनारायण पालीवाल, लायकराम भेंडारकर यांची उपस्थिती होती.
       श्री.बागडे यावेळी म्हणाले, पुर्वी कमी शिक्षण असणाऱ्यांना नोकरी लागत होती. आज चित्र बदलले आहे. सर्व परीक्षा हया ऑनलाईन झाल्या आहे. स्पर्धेत टिकून यश संपादन करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. दर्जेदार गुणवत्तेच्या आधारावर आज पुढे जाण्याची गरज आहे. शिक्षण हे अधिक दर्जेदार झाले पाहिजे. शाळेतील विद्यार्थी कसा टिकेल याचा विचार शिक्षकांनी केला पाहिजे. दुसऱ्यांशी स्पर्धा करतांना स्वत:मधील उणिवा शोधाव्या लागतील असे ते म्हणाले.
      पुढच्या पिढ्या अधिक घडवायच्या असतील तर शिक्षकांनी चांगले ज्ञानदान करणे गरजेचे आहे असे सांगून श्री.बागडे म्हणाले, कोणताही पाल्य हा शिक्षणापासून वंचित राहू नये याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. मागे असलेल्या समाजाला पुढे गेलेल्या समाजाच्या बरोबर आणण्याचे काम डॉ.आंबेडकरांनी केले. गाडगेबाबांना देखील शिक्षणाची तळमळ होती. मुलींनी सावित्रीबाईचा विचार पुढे नेण्याचे काम करावे असेही त्यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष चितलांगे यांनीही समायोचित मार्गदर्शन केले.

       प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थीनींनी विद्यापीठ गीताने केली. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, बचतगटातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.संजीव पाटणकर यांनी केले. संचालन श्री.काकडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ.भरत राठोड यांनी मानले.

Tuesday, 2 January 2018

राज्याच्या नवनिर्मितीसाठी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे विकासाला गती - अभिमन्यू काळे

सिध्दी 2017 ते संकल्प 2018 उपक्रमाची पत्रपरिषेत माहिती
   राज्याच्या नवनिर्मितीसाठी दुष्काळापासून मुक्ती, शेतकऱ्यांना कर्जापासून मुक्ती, प्रदुषणापासून मुक्ती, अस्वच्छतेपासून मुक्ती, करंजजाळापासून मुक्ती, बिल्डरांच्या मनमानीपासून मुक्ती आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती असा सप्तमुक्तीचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या संकल्पपुर्तीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु असल्यामुळे विकासाला गती मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली.
     2 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सिध्दी 2017 ते संकल्प 2018 या उपक्रमाअंतर्गत आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी काळे बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, बार्टीच्या स्वरोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळाव्यात 9 हजार युवक-युवतींनी सहभाग घेतला. यात 605 युवक-युवतींची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. सन 2016-17 या वर्षात रमाई घरकुल योजनेतून 903 आणि चालू वर्षात 5 हजार घरकुले मंजूर करण्यात आली. सन 2019 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे नियोजन आहे. मागील तीन वर्षात आंतरजातीय विवाह करणाऱ्या 225 जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये याप्रमाणे 1 कोटी 25 लक्ष 35 हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीची 662 कामे मंजूर असून यासाठी 23 कोटी 39 लक्ष रुपये मंजूर करण्यात आली असून अनेक कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.
      गोंदिया हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम जिल्ह्यात सुरु असल्याचे सांगून श्री.काळे पुढे म्हणाले, पहिल्या टप्प्यात 347 तलावांच्या कामांना सुरुवात करण्यात आली. त्यापैकी 155 तलावांची कामे पूर्ण करण्यात आली. या तलावातून 6 लाख 69 हजार 587 घनमीटर गाळ काढण्यात आल्यामुळे त्या तलावांची मुळ सिंचन क्षमता पुनर्स्थापित होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील 72 शेतकऱ्यांना सौर कृषिपंप योजनेचा लाभ देण्यात आला असून उर्वरित 73 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी यासाठी जिल्ह्यातील सर्व 997 स्वस्त धान्य दुकानात ई-पॉस मशीनच्या माध्यमातून धान्य वितरण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
    श्री.काळे म्हणाले, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यातील 290 तलावांची निवड करण्यात आली असून 49 तलावातून 24 हजार 93 घनमीटर गाळ काढण्यात आला. धडक सिंचन विहिर कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्याला 2 हजार विहिरींची उद्दिष्ट देण्यात आले, त्यापैकी 1578 कामे सुरु करण्यात आली. 1041 विहिरी पूर्ण झाल्या असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे. विहिरींच्या सुविधेमुळे शेतकऱ्यांना संरक्षीत सिंचनाची बारमाही व्यवस्था उपलब्ध होणार आहे. व्याघ्र प्रकल्पा लगतच्या बफर क्षेत्रातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून 6864 कुटूंबांना गॅस कनेक्शन, 246 कुटूंबांना दुधाळ जनावरांचे वाटप, 369 विहिरींना संरक्षीत कठडे, 1152 कुटूंबांना शौचालये, 2837 कुटूंबांना गॅस किचन ओटे, 3189 कुटूंबांना स्वयंपाकासाठी निर्धुर चुली, 79 युवकांना वाहन चालकाचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
       जिल्ह्यातील 82 हजार 295 शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्याचे सांगून श्री.काळे म्हणाले, आतापर्यंत शासनाकडून 4 ग्रीन लिस्ट प्राप्त झाल्या. त्यामध्ये 54 हजार 233 शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी 42 हजार 893 शेतकऱ्यांच्या खात्यात 86 कोटी 24 लक्ष 44 हजार रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे. आदिवासी भागातील माता व बालकांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी 284 गावातील 479 अंगणवाड्याच्या माध्यमातून 2034 गरोदर स्त्रिया व 1585 स्तनदा मातांना एकवेळचा चौरस आहार डॉ.एपीजे अब्दूल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. मागील दोन वर्षात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 115 कोटींची कामे मंजूर करण्यात आली असून काही कामांना सुरुवात झाली आहे. पुढील दोन वर्षात प्रत्येकी 157 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नतीची कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पर्यटन विकासाला चालना देण्यात येत असल्याचे सांगून श्री.काळे म्हणाले, मागील तीन वर्षात 14 कोटी 41 लक्ष रुपये जिल्ह्यातील पर्यटन व तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी खर्च करण्यात आले असून चालू वर्षात 4 कोटी 36 लक्ष रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक येण्यास मदत होईल. तलाव तेथे मासोळी अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील 69 तलावात 15 लाख 23 हजार बोटूकली आकाराची मासे टाकण्यात आल्यामुळे यातून 420 मे.टन मत्स्योत्पादन मिळणे अपेक्षीत आहे. त्यामुळे पारंपारीक मासेमारी करणाऱ्या ढिवर बांधवांची आर्थिकस्थिती सुधारण्यास हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. लोकसहभागातून जिल्ह्यातील सर्व 1969 शाळा डिजीटल झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
     जलयुक्त शिवार अभियानात सन 2015-16 मध्ये 1939 कामे पूर्ण झाली. या कामातून 19 हजार 642 हेक्टर संरक्षीत सिंचन क्षेत्र निर्माण झाल्याचे सांगून श्री.काळे म्हणाले, सन 2016-17 या वर्षात 2490 कामे पूर्ण झाली. यामधून 14 हजार 462 हेक्टर संरक्षीत सिंचन क्षेत्र निर्माण झाले. तर चालू वर्षात 426 कामे पूर्ण झाली तर उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून जिल्ह्यातील 40 गावात 21 कोटी 59 लक्ष रुपयांची कामे सुरु होणार असल्यामुळे संबंधित ग्रामस्थांना शुध्द व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे. नादुरुस्त शौचालयाचे बांधकाम करुन त्याचा वापर करण्यात येत आहे. डिसेंबर 2017 अखरे 2109 कुटूंबांकडे शौचालय बांधकामे पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
       जिल्ह्यातील पुरातन वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून वृक्ष संरक्षण योजना राबविण्यात येत असल्याचे सांगून श्री.काळे म्हणाले, जिल्ह्यात 6847 वृक्षांची नोंद करण्यात आली असून 2040 वृक्षांसाठी 20 लक्ष 40 हजार रुपये आर्थिक सहाय्य 2508 शेतकऱ्यांना वाटप केले आहे. रोजगार हमी योजनेतून सुध्दा जिल्ह्यातील मजूरांना मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध करुन देवून रोजगार देण्यात आला आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुध्दा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा हप्ता भरला. जिल्ह्यात सेंद्रीय शेतीची चळवळ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. नागरिकांना सेंद्रीय भाताची चव चाखता यावी यासाठी 2800 लोकांना सेंद्रीय तांदूळाचा भात खावू घालण्यात आला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करुन उत्पन्न घ्यावे व जास्त किंमत मिळण्यास सुध्दा ही शेती उपयुक्त असल्याचे श्री.काळे यांनी सांगितले.