जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 16 October 2019

गोंदिया व तिरोडात सकाळी 7 ते सायं 6 तर अर्जुनी/मोर व आमगावात सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत मतदान

     येत्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. जिल्हयात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये 63- अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघ, 64- तिरोडा विधानसभा मतदारसंघ,65- गोंदिया विधानसभा मतदारसंघ, 66-आमगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. जिल्हयातील 63- अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघ आणि 66- आमगाव विधानसभा मतदारसंघ हे नक्क्षलग्रस्त भागामध्ये येत असल्यामुळे या मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजतापर्यंत आहे. तर 64- तिरोडा विधानसभा मतदारसंघ आणि 65- गोंदिया विधानसभा मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत आहेया चारही विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी त्यांच्या मतदारसंघातील मतदानाच्या वेळेची  नोंद घ्यावी. जास्तीत जास्त संख्येने 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे.

21 ऑक्टोबर रोजी चार विधानसभा मतदारसंघात 10 लक्ष 98 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क


                                                विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019


      विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या 21 ऑक्टोबर रोजी जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहेजिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघातील 10 लक्ष 98 हजार मतदार या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये 5 लाख 45 हजार 404 पुरुष, 5 लाख 52 हजार 862 स्त्री आणि 4 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

            अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघात 1 लाख 27 हजार 102 पुरुष,  1 लाख 25 हजार 488 स्त्री आणि 1 तृतीयपंथी असे एकुण 2 लाख 52 हजार 591 मतदार, तिरोडा विधानसभा क्षेत्रात 1 लाख 27 हजार 291 पुरुष, 1 लाख 30 हजार 57 स्त्री आणि 3 तृतीयपंथी असे एकुण 2 लाख 57 हजार 351 मतदार, गोंदिया विधानसभा क्षेत्रात 1 लाख 57 हजार 614 पुरुष, 1 लाख 64 हजार 187 स्त्री असे एकुण 3 लाख 21 हजार 798 मतदार आणि आमगाव विधानसभा क्षेत्रात 1 लाख  33 हजार 397 पुरुष आणि 1 लाख 33 हजार 133 स्त्री मतदार असे एकुण 2 लाख 66 हजार 530 मतदारांचा समावेश आहे.              
          जिल्हयातील  दोन  विधानसभा मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत 9 हजार 339 स्त्री मतदारांची संख्या जास्त आहे. यामध्ये तिरोडा विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा 2 हजार 766 स्त्री मतदार आणि गोंदिया विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा 6 हजार 573 स्त्री मतदारांची संख्या अधिक आहे.
           जिल्हयात 31 ऑगस्टपर्यंत 10 लाख 96 हजार 441 मतदार होते. 1 सप्टेंबर 2019 ते 4 ऑक्टोबर 2019 या कालावधीत आयोजित मतदार नोंदणी अभियानात 1 हजार 829 मतदारांची वाढ झाली. आता एकुण मतदारांची संख्या 10 लाख 98 हजार 270 इतकी आहे

मानवी श्रृंखलेच्या माध्यमातुन विद्यार्थी, महिला व नागरीकांनी केली मतदार जागृती

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 
                                                     




         येत्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. जिल्हयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदार जागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम व नाविण्यपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणुन आज 16 ऑक्टोबर रोजी गोंदिया येथील पतंगा मैदानापासून ते काटी या गावापर्यंत मानवी श्रृंखला तयार करण्यात आली. ही मानवी श्रृंखला जवळपास 29 कि.मी. अंतराची होती. यामध्ये गावोगावी विद्यार्थीनागरीक, बचतगटांच्या महीला व ग्रामस्थ् तेथे सहभागी झाले होते.
        जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पतंगा मैदान येथे मानवी श्रृंखलेला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी गोंदिया विधानसााभाभाभा मतदारसंघाचे निवडणूक निरिक्षक शौकत अहमद परे, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, स्वीपचे नोडल अधिकारी एस... हाश्मी, स्वीपचे सहायक नोडल अधिकारी राजकुमार हिवारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मानवीय श्रृंखलेमध्ये गोंदिया शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, बचतगटातील महिला व नागरीक मोठ्या संख्येने उत्तम प्रतिसाद देऊन सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी यावेळी मतदार जागृती करणाऱ्या विविध घोषणा दिल्या. अनेक विद्यार्थ्यांच्या हाती मतदार जागृती करणारे संदेश फलक होते. येत्या 21 ऑक्टोबर रोजी सर्व मतदारांनी मतदान करावे हा बालहट्ट घेऊन विद्यार्थ्यांनी या मानवी श्रृंखलेतून मतदार जागृती केली. जिल्हाधिकारी  डॉ. बलकवडे यांनी या मानवी श्रृंखलेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधून आपल्या पालकांना व शेजाऱ्यांना येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदान करण्यास आग्रह धरावा असे आवाहन केले.
          पतंगा मैदान येथून सुरु झालेली मानवी श्रृंखला फुलचुर नाका, मनोहर चौक, जयस्तंभ चौक, नेहरु चौक, कालेखॉ चौक, पाल चौक, नमाद महाविद्यालय, कुडवा नाका, गुंडीटोला, जब्बार टोला, पांढराबोडी, लईटोला, गिरोला, झिटाबोडी, निलज, दासगाव, तेढवा, मरारटोला ते काटी अशी 29 कि.मी. ची मानवी श्रृंखला तयार करण्यात आली होती. या मार्गावरील अनेक गावातील शाळा,महाविद्यालय, बचतगटांच्या महिला व नागरीक या श्रृंखलेमध्ये गावाच्या मार्गावर सहभागी झाले होते. अनेकांनी या श्रृंखलेकडे कुतुहलाने बघुन मतदार जागृतीमुळे निश्चितच आता येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदान करण्याचा संकल्प केला. मानवी श्रृंखलेदरम्यान जयस्तंभ चौक आणि  गुजराती विद्यालयाजवळ विद्यार्थ्यांना झालेल्या गैरसोयीबद्ल  जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश स्वीपचे नोडल अधिकारी यांना देण्यात आले.
            मानवी श्रृंखलेच्या यशस्वितेसाठी मतदार जागृती कार्यक्रमाचे काम करणारे अधिकारी व कर्मचारी तसेच मानवी श्रृंखलेमध्ये सहभागी शाळा,महाविद्यालयांचे शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच गावोगावातील बचतगटातील महिला व नागरीक यांनी पुढाकार घेतला.


Saturday, 12 October 2019

महिलांनी मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा - शौकत अहमद परे

कुंभारेनगर येथे महिला मतदार जागृत मेळावा
* रांगोळी व पोस्टर्स प्रदर्शन



        देशात 50 टक्के महिला आहेत. महिला आणि पुरुषांच्या समस्या वेगळया आहेत. कुटूंबाच्या अर्थाजनाची जबाबदारी महिला यशस्वीपणे पार पाडतात. येत्या 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत जिल्हयात मतदानाचे प्रमाण कसे वाढेल यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन गोंदिया विधानसभा क्षेत्राचे सामान्य निवडणूक निरीक्षक शौकत अहमद परे यांनी केले.
            11 ऑक्टोबर रोजी गोंदिया येथील कुंभारेनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने महिला जागृती मेळाव्यात विशेष अतिथी म्हणून श्री परे बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, कार्यकारी अभियंता श्री विश्वकर्मा, माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
            श्री परे पुढे म्हणाले, जिल्हयात 6 हजार बचतगटाच्या माध्यमातून 70 हजार महिलांचे संघटन आहे. या संघटनामुळे महिलांची एक शक्ती दिसून येत आहे. त्यामुळे या शक्तीचा वापर जिल्हयात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी होईल. गोंदिया विधानसभा क्षेत्राच्या निवडणूकती आज एकही महिला उमेदवार निवडणूक लढवित असल्याचे दिसत नाही. महिलांनी आपली शक्ती दाखविली पाहिजे. महिलांनी स्वत: मतदान करुन अन्य मतदारांना येत्या 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणूकीत जास्तीत जास्त मतदानासाठी प्रोत्साहीत करावे असे सांगितले.
श्री हिवरे म्हणाले माविमच्या माध्यमातून जिल्हयात मोठया प्रमाणात मतदानासाठी जनजागृती करण्यात येत आहे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदान वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. विद्यार्थ्यानी येत्या 21 ऑक्टोबरला पालकांकडे मतदानाचा आग्रह धरावा व आपल्या पालकांना मतदानासाठी प्रवृत्त करावे. यासाठी हा दिवस आग्रह दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक व त्यांच्या कुटूंबातील मतदार व्यक्ती मतदानासाठी प्रोत्साहीत होवून निश्चितपणे मतदान करतील. असे ते म्हणाले.
श्री खडसे म्हणाले, 25 ऑक्टोबरपासून आपण दिवाळीचा सण साजरा करणार आहोत तत्पूर्वी 21 ऑक्टोबर रोजी आपल्याला लोकशाहीचा उत्सव साजरा करावयाचा आहे. या उत्सवात प्रत्येक मतदाराने स्वयंप्रेरणेने सहभागी होवून आपला मतदानाचा हक्क बजावावा. जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतीय संविधानामुळे आपल्याला मिळालेली आहे. आपल्याला आपला उमेदवार निवडण्याचा हक्क संविधानाने दिला आहे. तरी 21 ऑक्टोबर रोजी सर्व मतदारांनी मतदान करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
प्रास्ताविकातून श्री सोसे म्हणाले, महिलांनी संघटीत करण्याचे काम आणि त्या माध्यमातून त्यांना स्वावलंब होण्याचे काम करण्यात येत आहे. महिला आता संघटीत झाल्या आहेत. बचतगटाच्या माध्यमातून शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी काम करण्यात येत आहे. जिल्हयात महिलांच्या माध्यमातून मतदान जागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महिलांनी काढलेल्या मतदार जागृती करणाऱ्या पर्यावरणपुरक रांगोळ्या  व पोस्टर्सची मान्यवरांनी पाहणी केली. महिलांनी त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रांगोळ्या व पोस्टर्सचे मान्यवरांनी कौतूक केले. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनवर उपस्थित महिलांनी मतदार करण्याची प्रात्यक्षिके केली. यावेळी उपस्थित महिलांनी मतदान करण्यासाठी संकल्प शपथ पत्राचे वाचन केले. अनेक महिलांनी सेल्फीस्टॅन्डीजवळ आपली सेल्फी काढली व या माध्यमातून मतदार जागृती केली. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मोनिता चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला शहरी भागातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी कुंजलता भुरकुंडे, पुनम साखरे, राम सोनवाने, प्रफुल अवघड, एकांत वरघने, गीता भोयर, पल्लवी बनकर, शालू मेश्राम यांचेसह अन्य सहयोगीनी यांनी पुढाकार घेतला.

मतदारांनो ! स्वयंप्रेरणेने मतदान करा - डॉ. कादंबरी बलकवडे


दिव्यांग मतदार रॅली






          येत्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. जिल्हयात जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी  स्वयंप्रेरणेने मतदान करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.

दि. 11 ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी स्टेडियम येथे दिव्यांग मतदार बांधवांच्या रॅलीला हिरवी झेंडी दाखविताना आयोजित कार्यक्रमात डॉ. बलकवडे बोलत होत्या. यावेळी सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, समाजकल्याण सहायक आयुक्त अनिल वाळके, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, गटविकास अधिकारी श्री ईनामदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, ज्येष्ठ नागरिक मुन्ना यादव यांची उपस्थिती होती.
श्री घुगे म्हणाले, केवळ दिव्यांग मतदारांनाच नाही तर इतर मतदारांना सुध्दा या कार्यक्रमाची प्रेरणा मिळणार आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करुन जिल्हा मतदानात राज्यात अव्वल कसा राहील यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. रॅलीमध्ये स्विकार मतीमंद स्कुल गोंदिया व मंगलम मुक बधीर स्कुल गोंदिया, मनोहर मुन्सीपल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, दिव्यांग मतदार बांधव सहभागी होते. इंदिरा गांधी स्टेडिअम येथून निघालेल्या रॅलीचे विसर्जन नवीन प्रशासकीय इमारतीतील परिसरात करण्यात आले. समारोप प्रसंगी शौकत अहमद परे यांनी आपली उपस्थिती दर्शवून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार विस्तार अधिकारी मनोज दिक्षीत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समितीचे सुधाकर खोब्रागडे, विनोद परतेकी, अनिता ठेंगडी, कविता नागपूरे, श्रीमती मंगला बडवाईक, दिनेश उके, वशिष्ठ खोब्रागडे, डी.डी. रामटेके, राजेश मते, विजय ठोकणे, श्री सोनकांबळे व इतर दिव्यांग कर्मचारी तसेच दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी यांनी पुढाकार घेतला.
                                              000000000000    

Monday, 7 October 2019

जिल्हयात 47 उमेदवार निवडणूक रिंगणात 24 उमेदवारांची माघार

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
       येत्या 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हयातील चार मतदारसंघात मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज छाननीनंतर 71 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. आज 7 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 24 उमेदवारांनी निवडणूकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. आता निवडणूक रिंगणात 47 उमेदवार आपले भाग्य आजमावणार आहेत. यामध्ये 63- अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून 8 उमेदवार, 64 तिरोडा मतदारसंघातून 12 उमेदवार, 65- गोंदिया विधानसभा क्षेत्रातून 18 उमेदवार आणि  66- आमगांव विधानसभा क्षेत्रातून 9 उमेदवार असे एकूण 47 उमेदवार आपले भाग्य आजमावणार आहे. यामध्ये 26 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
            जिल्हयातील ज्या उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे आणि निवडणूक लढवित आहे असे उमेदवार पक्षनिहाय पुढीलप्रमाणे - 63- अर्जुनी/मोरगाव - माघार घेतलेले उमेदवार - आनंदकुमार जांभूळकर, अंजली जांभूळकर, कैलाश डोंगरे, जगन गडपाल, नितीन भालेराव, निशांत राऊत, राजेश नंदागवळी, ॲड. पोमेश  रामटेके, माणिक घनाडे, रत्नदिप दहीवले, रिता लांजेवार, ॲड. विशाल शेन्डे, रिंगणात असलेले उमेदवार मनोहर चंद्रीकापूरे (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी ), राजकुमार बडोले (भारतीय जनता पार्टी ), शिवदास साखरे (बहूजन समाज पार्टी ), अजय लांजेवार (वंचित बहूजन आघाडी), इंजि. दिलीप वालदे (बहूजन विकास आघाडी), अजय बडोले(अपक्ष), प्रमोद गजभिये (अपक्ष), प्रितम साखरे (अपक्ष), 64 तिरोडा - माघार घेतलेले उमेदवार झामसिंग रहांगडाले, डॉ. नामदेव किरसान, जगदिश बावनथडे, सुरेंद्रकुमार रहांगडाले, रिंगणात असलेले उमेदवार कमल हटवार (बहूजन समाज पार्टी), रविकांत बोपचे (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी), विजय रहांगडाले (भारतीय जनता पार्टी ), संदिप तिलगामे(वंचित बहूजन आघाडी), धनजंय टेकाम(अपक्ष), दिलीप नारनवरे (अपक्ष), दिलीप बन्सोड (अपक्ष), रामविलास मसकरे(अपक्ष), राजेशकुमार तायवाडे(अपक्ष), राजेंद्र बोंदरे(अपक्ष), विजय तिडके(अपक्ष),  विलास नागदेवे(अपक्ष), 65 गोंदिया - माघार घेतलेले उमेदवार पुढीप्रमाणे रामेश्वर शेन्डे, नामदेव बोरकर, प्रफुल भालेराव, विलास राऊत, प्रदीप वासनिक, बबन शेन्डे व इर फान शिद्दीकी, रिंगणात असलेले उमेदवार गोपालदास अग्रवाल (भारतीय जनता पार्टी ), अमर वराडे(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), धूरवास भोयर(बहूजन समाज पार्टी), अतुल हलमारे(बळीराजा पार्टी), चनीराम मेश्राम(भारतीय शेतकरी कामगार पक्ष) , जनार्दन बनकर(वंचित बहूजन आघाडी), पुरुषोत्तम मोदी(आम आदमी पार्टी), अरुणकुमार चौहान(अपक्ष), कमलेश उके(अपक्ष), कमलेश बावनकुळे(अपक्ष), प्रमोद गजभिये (अपक्ष), जावेद पठाण(अपक्ष), जितेश राणे (अपक्ष), प्रल्हाद महंत (अपक्ष), भूनेश्वर भारद्वाज(अपक्ष), लक्ष्मण मेश्राम(अपक्ष), विनोद अग्रवाल(अपक्ष), विष्णू नागरीकर(अपक्ष),  66- आमगांव - माघार घेतलेले उमेदवार निकेश गावड, रिंगणात असलेले उमेदवार अमर पंधरे (बहूजन समाज पार्टी), सहसराम कोरोटे(भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस), संजय पुराम (भारतीय जनता पार्टी ) , उमेशकूमार सरोटे (गोंडवाना गणतंत्र पार्टी) , सुभाष रामरामे ( वंचित बहूजन आघाडी), ईश्वरदास कोल्हारे (अपक्ष), उर्मिला टेकाम (अपक्ष), निकेश गावड (अपक्ष), रामरतन बापू राऊत (अपक्ष) यांचा समावेश आहे.
                                

Saturday, 5 October 2019

निवडणूक निरीक्षक जिल्हयात दाखल

       विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता भारत निवडणूक आयोगाने जिल्हयातील चार विधानसभा मतदारसंघाकरीता नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक जिल्हयात दाखल झाले आहे.
       जिल्हयातील 63- अर्जुनी/मोरगांव विधानसभा मतदारसंघाकरीता सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून श्री मंजूर अली (7820879236), 64- तिरोडा विधानसभा मतदारसंघाकरीता श्री. राजीव मेहता (7820877981), 65- गोंदिया विधानसभा संघाकरीता श्री शौकत अहमद प्यारे (7820890970), 66- आमगांव विधानसभा मतदारसंघाकरीता श्री धनजंयसिंग भदोरीया (7620752181), पोलीस निवडणूक निरीक्षक म्हणून 63- अर्जुनी/मोरगांव विधानसभा मतदारसंघाकरीता श्री धर्मवीर (9454401662),64- तिरोडा विधानसभा मतदारसंघाकरीता श्री. सुधीर कुमार पोरीका (8344428152), 65- गोंदिया विधानसभा संघाकरीता श्री जी.जी.पांडे (9425060369), 66- आमगांव विधानसभा मतदारसंघाकरीता श्री टी. इक्का (9479190820) यांची नियुक्ती केली . सामान्य निवडणूक निरीक्षक हे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात उपस्थित असणार आहेत. निवडणूकीसंबंधी असलेल्या तक्रारी व समस्यांच्या निराकरणासाठी संबंधित मतदारसंघातील नागरिकांनी संपर्क साधावा.