जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 23 November 2017

कोडेबर्राला गवसला विकासाचा मार्ग



       कोडेबर्रा... नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या नागझिरा अभयारण्यालगत असलेले गाव. तिरोडा तालुक्यातील कोडेबर्रा या आदिवासी बहुल गावात 109 कुटूंबाची वस्ती. 413 लोकसंख्या असलेल्या या गावात गोंड समाजाची संख्या जास्त आहे. या गावात ढिवर, लोहार आणि पोवार समाजाची 20 घरे आहेत. जंगलाच्या कुशीत वसलेल्या कोडेबर्रातील सर्वच कुटूंबाकडे थोडीफार शेती देखील आहे. जवळपास गावातील सर्वच शेतकरी हे अल्पभूधारक. केवळ धान हे एकमेव पीक ते घेतात. पावसाच्या पाण्यावर अवलंबून शेती करीत असल्यामुळे उत्पन्नही कमीच. शेती ही जंगलाला लागून असल्यामुळे वन्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसानही इथल्या शेतकऱ्यांचे व्हायचे. व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात येणाऱ्या या गावातील कुटूंब हे स्वयंपाकासाठी जळावू लाकूड, शेतीसाठी लागणारी लाकडी अवजारे, पाळीव जनावरांना चारा व रोजगार या दैनंदिन गरजासाठी वनांवर अवलंबून असायचे. व्याघ्र प्रकल्पालगत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना सुरु झाली आणि कोडेबर्राला विकासाचा मार्गच गवसला.
      या योजनेअंतर्गत कोडेबर्रात स्थापन करण्यात आलेल्या ग्राम परिस्थितीकी विकास समितीच्या माध्यमातून गावाच्या विकासाला दिशा मिळाली. ग्राम परिस्थितीकी विकास समितीचे अध्यक्ष बंडू मरसकोल्हे व सचिव तथा वनरक्षक श्री.कापसे तसेच सातपुडा फाउंडेशनचे संरक्षण अधिकारी मुकूंद धुर्वे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन वनावरील अवलंबीत्व कमी करण्यासाठी गावातील जन-जल-जंगल-जमीन या संसाधनाचा शाश्वत विकास साधून शेतीपुरक जोडधंदे निर्मिती करणे, पर्यायी रोजगार उपलब्ध करुन देणे, मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासोबतच ग्रामस्थांच्या माध्यमातून वन आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जबाबदारी जाणीव करुन देण्यात आली.
         वनाचे व वन्यजीवांचे महत्व कोडेबर्राच्या ग्रामस्थांना समजले. डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेतून आपल्या विकासाला गती मिळेल याची खात्री त्यांना पटली. ग्राम परिस्थितीकी विकास समिती या योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आल्यामुळे या समितीच्या माध्यमातून वैयक्तीक व सामुहिक लाभाच्या योजना कोणकोणत्या द्याव्यात याबाबत नियोजन करण्यात आले. सर्वप्रथम निर्णय घेण्यात आला की, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनासाठी आता जंगलात न जाता प्रत्येक घरी गॅस कनेक्शन असले पाहिजे. स्वयंपाकासाठी जळावू लाकडे जंगलातून आणणे म्हणजे जीव धोक्यात घालणे होय असे गावातील कुटूंबांना वाटले. स्वयंपाकासाठी लाकडे जंगलातून आणतांना वन्यप्राण्याने हल्ला केला तर जीव गमावून बसण्याची वेळ येईल. गाव बफर क्षेत्रात येत असल्यामुळे वनातून लाकडे गोळा करण्यावर सुध्दा वन्यजीव विभागाने निर्बंध आणल्यामुळे आता प्रत्येक कुटूंबाला गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय समितीने घेतला. जनवन योजनेतून कोडेबर्रातील 109 कुटूंबापैकी 100 कुटूंबाकडे गॅस कनेक्शन देण्यात आले. उर्वरीत 9 जणांना सुध्दा लवकरच हे कनेक्शन देण्यात येणार आहे.
      उघड्यावर शौचास बसण्याच्या दुष्परिणामाची जाणीव कोडेबर्राच्या ग्रामस्थांना झाली. जन-वन योजनेतून 27 कुटूंबांना शौचालये बांधून देण्यात आली. उर्वरीत कुटूंब सुध्दा लवकरच शौचालयाचे काम पूर्ण होणार आहे. गावातील 27 कुटूंबांना शेतीपुरक व्यवसाय उपलब्ध व्हावा यासाठी सन 2014-15 या वर्षात प्रत्येकी एक दुधाळ जर्सी गाईचे वाटप करण्यात आले. दररोज 250 ते 300 लिटर दुधाचे संकलन होते. हे कुटूंब दिनशा व खाजगी दूध डेअरीला 23 रुपये प्रती लिटर याप्रमाणे दुधाची विक्री करीत आहे. त्यामुळे या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. रोजगारानिमीत्त या कुटूंबांचे वनावरील अवलंबित्व दुधाळ जनावरांमुळे कमी झाले आहे.
       गावातील 100 कुटूंबांना गॅस ओटे बांधून देण्यात आले आहे. जंगलालगतच्या कोडेबर्रात पाऊस व वादळामुळे कधी कधी वीज पुरवठा खंडीत होतो तर कधी वीज भारनियमन होते. अशावेळी घरी शिक्षण घेणाऱ्या मुलांना रात्रीच्या वेळी अभ्यास करतांना अडचण जावू नये म्हणून 100 कुटूंबांना सौर कंदील वाटप केले आहे. 15 शेतकऱ्यांच्या शेतीला सौर कुंपन मंजूर झाले आहे. त्यामुळे जंगलालगत असलेल्या शेतीतील पिकाची वन्यप्राण्यामुळे नुकसान होणार नाही. शेतातील पीक सौर कुंपनामुळे सुरक्षीत राहण्यास मदत होणार आहे. 109 कुटूंबांना स्वयंपाकासाठी निर्धुर चुलीचे वाटप करण्यात आल्यामुळे महिलांची स्वयंपाक करतांना धुरामुळे डोळ्यांना होणारा त्रास बंद झाला आहे. जंगलालगतच कोडेबर्रातील शेतकऱ्यांची शेती आहे. जंगलातून येणारे वन्यप्राणी त्यांचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू होवू नये यासाठी 13 शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीला सुरक्षीत कठडे लावण्यात आले आहे.
       गावाच्या जवळच्या असलेल्या छोट्या तलाव खोलीकरणाचे काम व माती बंधाऱ्याचे काम करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे जंगलातून येणारे पावसाचे पाणी तलावात अडवून सिंचनासाठी तर या पाण्याचा वापर होईलच सोबतच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असल्याचे समितीचे अध्यक्ष बंडू मरसकोल्हे यांनी सांगितले. गावातील महिलांचे 6 बचतगट असून बचतगटातील महिला हया आर्थिक अडचणीच्या वेळी बचतगटातील पैसा उपयोगात आणतात तसेच अर्थोत्पादनात पतीला देखील हया महिला सहकार्य करीत आहे. माविमच्या सहयोगीनीच्या मार्गदर्शनामुळे त्या आता आत्मनिर्भर होत आहे.
        शारदाबाई मडावी म्हणाली की, पूर्वी आम्ही स्वयंपाकासाठी लागणारे लाकडे गोळा करण्यासाठी जंगलात जात होतो. परंतू आता जनवन योजनेतून गॅस कनेक्शन देण्यात आल्यामुळे आम्ही इंधनासाठी होणारी भटकंती तर थांबलीच सोबत धुरमुक्त स्वयंपाक आम्ही करीत आहो. स्वयंपाक पण लवकरच होतो. कुटूंबातील चारही व्यक्ती आता गॅस उपलब्ध झाल्यामुळे आनंदी आहोत.
       डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेतून गावातील कुटूंबाच्या तसेच सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे. या योजनेमुळे वनावरील अवलंबीत्व कमी होवून पर्यायी रोजगार सुध्दा उपलब्ध होत आहे. या योजनेमुळे मानव-वन्यजीव यांचे सहसंबंध वाढीला लागत आहे.

Tuesday, 21 November 2017

सशक्त समाज निर्मितीसाठी जादूटोणा विरोधी कायदा उपयुक्त - पालकमंत्री बडोले

   समाजातील अनिष्ट परंपरा, वाईट चालीरिती, अंधश्रध्दा, शोषण व बुवाबाजीच्या नावावर होणारी लुटमार थांबविण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा शासनाने केला आहे. या कायदयाची जनजागृती करण्याचे काम सामाजिक न्याय विभाग करीत आहे. अंधश्रध्देचे निर्मुलन करुन सशक्त समाज निर्माण करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा अत्यंत उपुयक्त असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती शाखा गोंदिया व जादूटोणा विरोधी कायदा प्रचार-प्रसार अंमलबजावणी समितीच्या वतीने अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक संघटक प्रा.श्याम मानव यांचे 19 नोव्हेंबर रोजी गोंदिया येथील संथागार येथे आयोजित वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया आणि जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी प्रा.श्याम मानव, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, अनिसचे जिल्हा संघटक प्रा.डॉ.प्रकाश धोटे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे, तहसिलदार कल्याण डहाट, निशा भूरे, संजय झुरमूरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      पालकमंत्री बडोले म्हणाले, समाजातील अंधश्रध्देचे निर्मुलन व्हावे यासाठी प्रा.श्याम मानव हे अत्यंत चांगले काम करीत आहे. पाहिजे त्या प्रमाणात या कायदयाचा प्रचार-प्रसार होत नाही. मोठ्या प्रमाणात या कायदयाचा प्रचार-प्रसार होणे गरजेचे आहे. भोळ्याभाबळ्या लोकांना फसविण्याचे काम बुवाबाबा मंडळी करीत आहे. त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. गाव पातळीपर्यंत या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
      जादूटोणा विरोधी कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, देवाधर्माच्या नावाने सामान्य माणसाची होणारी लुट थांबली पाहिजे. सामाजिक न्याय विभाग हा कायदा प्रभावीपणे राबविण्यासाठी वचनबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
      पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ म्हणाले, शिक्षीत सुशिक्षीत मंडळीसुध्दा आज श्रध्देमुळे अंधश्रध्देला बळी पडत आहे. सुशिक्षीत आणि सुसंस्कृत समाज अंधश्रध्देला बळी पडणे म्हणजे समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब धोकादायक आहे. जिल्ह्यात जादूटोणा विरोधी कायदयाची माहिती पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्हावी यासाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेमुळे कायदयाच्या तरतुदीची माहिती कशाप्रकारे गुन्हे दाखल करावे याची माहिती मिळण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

      व्याख्यानामुळे कायदा प्रभावीपणे राबविण्यास उर्जा मिळणार असल्याचे सांगून डॉ.भूजबळ म्हणाले, जिल्ह्यात या कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सुध्दा मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा.डॉ.प्रकाश धोटे यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार अमर वऱ्हाडे यांनी मानले.

जादूटोणा विरोधी कायदयाने प्रत्येक व्यक्ती विज्ञानवादी होईल - प्रा.श्याम मानव


       स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात शोषण करणारी यंत्रणा वर्षानुवर्षे सुरु आहे. जादूटोणा विरोधी कायदयाची प्रभावी अंमलबजावणी केली तर प्रत्येक व्यक्ती हा विज्ञानवादी होईल. असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक संघटक तथा राज्य जादूटोणा विरोधी कायदयाची अंमलबजावणी करणाऱ्या समितीचे सहअध्यक्ष प्रा.श्याम मानव यांनी केले.
        गोंदिया येथील संथागार येथे 19 नोव्हेंबर रोजी वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया आणि जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर जाहीर व्याख्यान देतांना प्रा.मानव बोलत होते. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा संघटक प्रा.डॉ.प्रकाश धोटे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे, निशा भूरे, संजय झुरमूरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
        प्रा.मानव पुढे म्हणाले, आमचा देवाधर्माला विरोध नाही. देवाधर्माच्या नावाखाली सामान्य माणसाच्या फसवणूकीला आमचा विरोध आहे. वारकरी संप्रदायाने समाजाचे प्रबोधन करण्याचे काम केले. या प्रबोधनातून त्यांनी लोकांमधील अंधश्रध्दा दूर केल्या. अस्पृश्यता माणसाबाबत पाळली जायची, जातीयतेची दरी कमी करण्याचे काम सुधारकांनी केले. सुधारकीय मनोवृत्तीतून सामान्य माणसाला जागृत केले. संत परंपरा आणि बुवाबाजी ही वेगळी आहे. लहानपणी शिकविल्या जाते की, श्रध्दा ठेवली पाहिजे. ज्याच्यावर श्रध्दा ठेवायची त्याच्याबद्दल शंका ठेवू नये. श्रध्देचे रुपांतर केव्हा अंधश्रध्देमध्ये होते हे कळत नाही. त्यामुळे श्रध्दा ही डोळस असली पाहिजे, ती आंधळी नसावी. तिची चिकित्सा करता आली पाहिजे, यासाठी जादूटोणा विरोधी कायदा असल्याचे त्यांनी सांगितले.
         जादूटोणा विरोधी कायदयानुसार गुन्हा घडत असेल तर पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे असे सांगून प्रा.मानव म्हणाले, मंत्राने साधा पापळ मोडता येत नाही. पापळ मोडणाऱ्या बाबाला 25 लक्ष रुपये बक्षीस म्हणून देण्यात येईल. मंत्राने माणूस मेला असता तर कट्यार बाळगता आली नसती. जगात कुणालाही करणी करता येत नाही. मानसिक रुग्णाचा वापर बाबा म्हणून कुणी करीत असेल तर तो गुन्हा आहे. नवसाने मुले झाली असती तर पती करण्याची गरज नसती असे तुकारामांनी अभंगात लिहिले आहे. गाडगेबाबांनी बुध्दीप्रामाण्यवाद कसा वापरायचा हे शिकविले असल्याचे त्यांनी सांगितले.
          वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया या विषयावर प्रकाश टाकतांना प्रा.मानव म्हणाले, डेरा सच्चा सौदाचा नायक बाबा राम रहीम हा एका रात्रीतून खलनायक कसा झाला. प्रसारमाध्यमांनी गुरुमीत राम रहिमच्या अनेक गोष्टी जगापुढे आणून खळबळ माजविली. स्त्रीयांचे शोषण करणाऱ्या गुरुमीत राम रहीम, पुण्याजवळच्या नारायणगाव परिसरातील केडगावकर महाराज, काटोलचे गुलाबबाबा, स्वामी विद्यानंद, स्वामी विद्यानंदचे वर्धेतील किस्से, आसारामबापूच्या रासक्रीडांची माहिती, आसारामबापूचा मुलगा नारायणसाईनेही मुलींचा कसा उपभोग घेतला याची माहिती, कृपाळू महाराज, रामस्नेही पंथाचा सुंदरदास महाराज, बंगलोरचा स्वामी नित्यानंद, हिवरा आश्रमचे शुकदास महाराज, स्वामी दत्तानंद निश्चल स्वामी, पाटीलबाबा यांनी केलेल्या महिला व मुलींच्या शोषणाचा लेखाजोखाच प्रा.मानवांनी मांडला. शेकडो मुलीचे व स्त्रीयांचे शोषण करणाऱ्या या बाबांना नेस्तनाबूत करण्याची ताकद या कायदयात असल्याचे दाखवून दिले आहे. अनेक बुवा-बाबा आज गजाआड असल्याचे त्यांनी सांगितले. काही धर्मातील पुरोहित, मौलवी, बाबा, पादरी हे धार्मिक तरतूदीचा वापर आपल्या फायदयासाठी करुन घेवून त्यातून स्त्री शोषणाचा मार्ग शोधून काढत असल्याचे सांगितले.
         प्रा.मानव म्हणाले, या कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री आहेत, तर सहअध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाल्याचे त्यांनी सांगितले. या कायदयाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

         वृक्ष तेथे छाया ! बुवा तेथे बाया हे अतिशय महत्वाचे वाक्य आचार्य प्र.के.अत्रे यांनी वापरल्याचे सांगून प्रा.मानव म्हणाले, जसा वृक्ष छायेशिवाय असू शकत नाही तसाच कोणताही बुवा बायकांशिवाय असू शकत नाही. पुण्याजवळच्या नारायणगाव परिसरातील केडगावकर हा उच्चभ्रू बाबा उच्चभ्रू सुशिक्षीत स्त्रीयांमध्ये अतिशय प्रसिध्द होता. तो महिलांचे शोषण कशाप्रकारे करायचा त्याच्या रासलिलांचा भांडाफोड आचार्य अत्रे यांनी केल्याचे प्रा.मानव यांनी सांगितले यावेळी त्यांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या सर्व 12 कलमांची माहिती दिली. कार्यक्रमाला विद्याथी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन व उपस्थितांचे आभार अमर वऱ्हाडे यांनी मानले.

Monday, 20 November 2017

युवावर्गाने देशसेवेसाठी पुढे यावे - राजकुमार बडोले

गोंगले येथे सुरक्षा दौड

        आदिवासी व ग्रामीण भागातील मुले शारिरीकदृष्ट्या अत्यंत काटक असतात. मैदानी खेळात देखील ते सरस असतात. आदिवासी मुले नक्षल प्रवाहात न जाता विकासाच्या प्रवाहात यावी यासाठी पोलीस विभाग व प्रशासन तत्पर आहे. युवावर्गाने मैदानी खेळात आपले कौशल्य दाखवून पोलीस व सैन्य भरतीत सहभागी होवून देशसेवेसाठी पुढे यावे. असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       सडक/अर्जुनी तालुक्यातील गोंगले येथे 19 नोव्हेंबर रोजी शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून नक्षलग्रस्त क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांचे खेळांमधील करिअर घडविण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने आयोजित सुरक्षा दौड कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, जि.प.सदस्य शिला चव्हाण, पं.स.सदस्य प्रमिला भोयर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, सांख्यिकी अधिकारी तुलसीदास झंझाड, अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे सचिव दुलीचंद बुध्दे, सरपंच डि.यु.रहांगडाले, माजी सरपंच श्री.रहांगडाले, डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर पर्वते यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री.बडोले यावेळी म्हणाले, बिरसा मुंडा यांनी आदिवासींवरील अत्याचाराविरुध्द ब्रिटिशांशी लढा दिला. आज आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. हा समाज दारिद्रयरेषेखाली मोठ्या प्रमाणात असून यांच्याकडे शेती देखील कमी आहे. पोलीस विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुरक्षा दौड म्हणून जिल्हास्तरीय स्पर्धेतून इथले आदिवासी व ग्रामीण भागातील युवक-युवती राज्य व राष्ट्रीय पातळीवर जाण्यास मदत होईल. राष्ट्रीय पातळीवर आपल्या क्रीडा कौशल्यातून जिल्ह्याचे नाव निश्चित उज्वल करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
       डॉ.भूजबळ म्हणाले, जिल्हा हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. नक्षलविरोधी अभियानाअंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मुला-मुलींचे क्रीडा क्षेत्रात चांगले करिअर घडावे यासाठी सुरक्षा दौड आयोजित करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय दौड स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून यशस्वी ठरणाऱ्या मुला-मुलींना प्रशिक्षणासाठी नागपूर, पुणे, अमरावती येथे पाठविण्यात येईल. पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र गोंगले येथे स्थापन करण्यात येणार असून या भागातील युवक-युवतींना प्रशिक्षण मिळण्यास मदत होईल. जीवनात काहीतरी करायचे आहे या प्रेरणेतून दौडमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
      सरपंच श्री.रहांगडाले म्हणाले, या भागातील मुला-मुलींचे करिअर घडविण्याचे स्वप्न पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र सुरु झाल्यानंतर पूर्ण होण्यास मदत होणार आहे. गावातील बेरोजगार युवक-युवती यांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येईल. शासनाच्या विविध योजनांची गावात प्रभावी अंमलबजावणी करुन गावाच्या विकासाला गती देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
      यावेळी मुला-मुलींच्या 100 मीटर, 300 मीटर, 500 मीटर धावण्याच्या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार विजय बिसेन यांनी मानले.

रस्त्यातील खड्डयाच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता नाही - चंद्रकांत पाटील

अभियंत्यासोबत साधला संवाद
           जिल्ह्यातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांची दुरुस्ती 15 डिसेंबरपर्यंत करण्यात यावी. खड्डयांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी व वाहतूक करणाऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील रस्त्यांच्या खड्डयांच्या दुरुस्तीची कामे करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 19 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतांना श्री.पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार गोपालदास अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव एफ.एस.मेश्राम, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधिक्षक अभियंता प्रशांत नवघरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        श्री.पाटील म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धोरणातून येत्या 6 महिन्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात येतील. सार्वजनिक बांधकाम विभागातील अनुकंपाची भरती लवकरच करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. खड्डे भरण्याच्या पलिकडचे रस्ते आहेत त्या रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करुन मंत्रालयात पाठवावे. विशेष कार्य अधिकारी व मंत्रालयातील संबंधित यांच्याशी समन्वय साधून ही कामे गतीने करावी असे सांगितले.
         विभागीय पातळीवर विशिष्ट रक्कमेच्या कामाचे अधिकार देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री.पाटील म्हणाले, राज्यातील स्थापत्य क्षेत्रातील अभियंत्यांचा एकमेकांशी संवाद साधणे आवश्यक असून त्यामधून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विकासाला दिशा मिळण्यास मदत होईल. रस्ते कोणतेही असले तरी त्या रस्त्यावरील खड्डे भरले गेले पाहिजे. अभियंत्यांनी काम करतांना जीव ओतून काम करावे. तसेच कामे करतांना सामाजिक बांधिलकी देखील जोपासावी असे आवाहन देखील त्यांनी केले.
          पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्यातून जे राष्ट्रीय महामार्ग जातात त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. काही महामार्गावर खड्डे पडले असून रस्ते खराब झाले आहे. या रस्त्यांच्या साईडिंग व्यवस्थित भरण्यात न आल्यामुळे अशा ठिकाणी अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणांची तातडीने राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुरुस्ती करावी असे सांगितले.
        सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.1 च्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांनी सादरीकरणातून कामाची माहिती दिली. 173 कि.मी. लांबीची 11 कामे 5054 या अंतर्गत करण्यात येणार आहे. मागील तीन वर्षात पूर्ण करण्यात आलेल्या पुलांच्या, इमारतीच्या बांधकामाची तसेच प्रगतीपथावर असलेल्या कामाची माहिती त्यांनी यावेळी दिली.
           सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.2 चे कार्यकारी अभियंता हेमंत गाणार यांनी आपल्या सादरीकरणातून माहिती देतांना सांगितले की, अड्याळ-दिघोरी-बोंडगाव-नवेगावबांध ते चिचगड रस्त्याचे काम केंद्रीय मार्ग निधीतून 90 टक्के पूर्ण झाले आहे. द्विवार्षिक रस्ते दुरुस्तीची कामे व कामाच्या प्रगतीबाबत तसेच रिक्त पदांबाबतची माहिती दिली.
         यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांनी उपस्थित काही अधिकाऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. तणावातून काम न करता कुटूंबाला सुध्दा वेळ दिला पाहिजे असे सांगितले.
          सभेला राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती साखरवाडे, उपकार्यकारी अभियंता श्री.भोपे, उपविभागीय अभियंता सर्वश्री प्रकाश लांजेवार, विजय सोनुने, रुपचंद वासनिक, दिनेश नंदनवार, श्री.गणगे, प्रविण सुमंत, श्री.साहू, श्री.माटे तसेच दोन्ही सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंते व सहायक अभियंते यावेळी उपस्थित होते.

Saturday, 18 November 2017

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील - राजकुमार बडोले

चक्रीवादळ बाधितांना धनादेश वाटप
        यावर्षी पाऊस कमी आल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी धान रोवणी केली नाही. ज्या शेतकऱ्यांनी धान रोवणी केली त्यांना पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे पीक पाहिजे त्या प्रमाणात आले नाही. अलिकडेच धानावर तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे दुष्काळाची स्थिती व दुसरीकडे तुडतुड्याचे संकट अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      गोरेगाव तालुक्यातील तेढा येथे 17 नोव्हेंबर रोजी तहसिल कार्यालय गोरेगावच्या वतीने चक्रीवादळामुळे बाधित आपदग्रस्तांना धनादेशाचे वाटप पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती दिलीप चौधरी, जि.प.सदस्य ज्योती वालदे, जि.प.माजी समाजकल्याण समिती सभापती कुसन घासले, संजय गांधी निराधर योजनेचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मण भगत, उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपाडे, तहसिलदार कल्याणकुमार डहाट, माजी जि.प.सदस्य जितेंद्र शेंडे, तेढा सरपंच रत्नकला भेंडारकर, उपसरपंच डॉ.विवेक शेंडे यांची उपस्थिती होती.
      श्री.बडोले म्हणाले, पाऊस कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणी देता येणार नाही. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची लागवड करावी. यासाठी 3 हजार क्विंटल हरभरा अनुदानावर जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. उपग्रहाच्या आधारे यावर्षी दुष्काळाचे मोजमाप करण्यात आल्यामुळे तीनच तालुके मध्यम दुष्काळाचे घोषित करण्यात आले आहे. सडक/अर्जुनी व अर्जुनी/मोरगाव तालुक्यासह इतर तालुकेसुध्दा दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अशी मागणीही आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
     ज्यांनी रोवणी केली नाही त्यांना मोबदला देण्यासाठी शासन मदत करेल असे सांगून श्री.बडोले म्हणाले, गोरेगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्यामुळे या तालुक्याला शासनाच्या निकषानुसार दुष्काळाच्या सवलती मिळणार आहे. या भागातील रस्त्यांच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे सांगून ते म्हणाले, दळणवळणाची चांगली रस्ते त्यामुळे निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्र ऑनलाईन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही. धान उत्पादक शेतकऱ्यांना शासन प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
      यावेळी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.सदस्य ज्योती वालदे व सरपंच रत्नकला भेंडारकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. गोरेगाव तालुक्यातील 1165 घरांचे एप्रिल व मे 2016 मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे नुकसान झाले असून त्यासाठी 31 लक्ष 6 हजार 50 रुपये निधी उपलब्ध झाला आहे. बाधितांना धनादेशाचे वाटप उर्वरित गावात सुध्दा करण्यात येणार आहे. तेढा येथील 161 घरांचे नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाई म्हणून 168 कुटूंबांना 5 लक्ष 15 हजार रुपये धनादेशाचे वितरण यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बाधितांना करण्यात आले.
     तेढा व बाधित गावातील रामचंद्र भेंडारकर, छबीलाल अंबादे, सुमन टेंभूर्णेकर, डिगांबर खरोले, शांताबाई आस्वले, पुरणलाल पटले, छबीलाल पटले, बाबुलाल मेश्राम, हिरामन पटले, भागीरथा पंचभाई, देवलाबाई घासले, पार्बताबाई राऊत, रामचंद्र राऊत, बिजू भंडारी, झेलनबाई कोहळे, नंदलाल गाथे, दुलीचंद राऊत, प्रेमलाल वरकडे, अशोक पटले आदी बाधितांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. तेढा ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनो ! मोठी स्वप्ने बघा - पालकमंत्री बडोले

आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण
    राज्यातील 61 टक्के आदिवासी समाज हा आजही दारिद्रयरेषेखाली जीवन जगत आहे. समाजात शिक्षणाचे प्रमाणही कमी आहे. शिक्षणाच्या कमी प्रमाणामुळे विविध क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये आदिवासी बांधव कमी आहेत. शासन आदिवासी बांधवांच्या विकासासाठी विविध योजना राबवित आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक योजना असून विद्यार्थ्यांनी प्रगती साधण्यासाठी मोठी स्वप्ने बघावी व त्यासाठी कठोर परिश्रम करावे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      सडक/अर्जुनी येथे 17 नोव्हेंबर रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी कार्यालयाच्या वतीने बांधण्यात आलेल्या आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे लोकार्पण व विविध योजनांच्या साहित्याचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती कविता रंगारी, भाजपा जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, जि.प.माजी समाजकल्याण सभापती श्रावण राणा, माजी पं.स.सभापती संतोष मडावी, लक्ष्मीकांत धानगाये, आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त दिपक हेडावू, उपविभागीय अभियंता प्रकाश लांजेवार, शाखा अभियंता श्री.ताकसांडे, श्री.वासनिक, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी श्री.घुले, प्राचार्य जाधव यांची उपस्थिती होती.
      श्री.बडोले म्हणाले, आदिवासी मुले ही शरीराने काटक असतात. खेळाच्या मैदानात ते आपली कर्तबगारी सिध्द करतात. त्यांना जर ॲथलेटिक्ससारख्या क्रीडा प्रकारात चांगले मार्गदर्शन मिळाले तर ते मोठी झेप घेवू शकतात. घरची परिस्थिती चांगली नाही त्यामुळे शिक्षण घेता येत नाही ही मानसिकता दूर झाली पाहिजे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे तरच प्रगती होईल, सोबतच बेरोजगारी कमी होण्यास सुध्दा मदत होईल. विदेशात सुध्दा आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा आदिवासी विकास विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. अनेक आदिवासी बांधवांच्या पिढ्या दारिद्रयरेषेखाली जगल्या, पण येणाऱ्या पिढ्यांनी चांगले शिक्षण घेवून आपली प्रगती करावी असे आवाहनही त्यांनी केले.
      आमदार पुराम म्हणाले, वसतिगृहाच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात नवचैतन्य निर्माण झाले आहे. अनेक मोठ्या व्यक्ती वसतिगृहात शिक्षण घेवून मोठ्या पदावर गेले आहेत. वसतिगृहात राहतांना विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी आपल्या शिक्षणाकडे लक्ष दयावे. चांगले शिक्षण घेवून शिक्षणाच्या माध्यमातून वसतिगृहाचा नावलौकीक करावा. विद्यार्थ्यांनी थोर पुरुषांच्या चरित्रांचे वाचन करुन त्यांचा आदर्श पुढे ठेवून शिक्षण घ्यावे असेही ते म्हणाले.
      श्रीमती गहाणे म्हणाल्या रस्ते, इमारती हा विकास नसून आदिवासींची मुले-मुली शिक्षीत झाली तरच विकास झाला असे म्हणता येईल. सर्वसामान्य लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या तर त्यांच्या विकासाला गती मिळेल. आदिवासी विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण मिळाले पाहिजे असे त्या म्हणाल्या.
      प्रारंभी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते नव्यानेच बांधण्यात आलेल्या आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. नाविण्यपूर्ण योजनेतून क्रीडा विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांना स्पोर्ट गणवेश व कीट देण्यात आली. तसेच आदिवासी लाभार्थ्यांना विविध योजनांच्या साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
        कार्यक्रमाला आदिवासी वसतिगृहातील मुले-मुली त्यांचे पालक व विविध आदिवासी योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार जव्हार गाढवे यांनी मानले.