जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 20 November 2017

रस्त्यातील खड्डयाच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता नाही - चंद्रकांत पाटील

अभियंत्यासोबत साधला संवाद
           जिल्ह्यातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांची दुरुस्ती 15 डिसेंबरपर्यंत करण्यात यावी. खड्डयांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी व वाहतूक करणाऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील रस्त्यांच्या खड्डयांच्या दुरुस्तीची कामे करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 19 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतांना श्री.पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार गोपालदास अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव एफ.एस.मेश्राम, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधिक्षक अभियंता प्रशांत नवघरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        श्री.पाटील म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धोरणातून येत्या 6 महिन्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात येतील. सार्वजनिक बांधकाम विभागातील अनुकंपाची भरती लवकरच करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. खड्डे भरण्याच्या पलिकडचे रस्ते आहेत त्या रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करुन मंत्रालयात पाठवावे. विशेष कार्य अधिकारी व मंत्रालयातील संबंधित यांच्याशी समन्वय साधून ही कामे गतीने करावी असे सांगितले.
         विभागीय पातळीवर विशिष्ट रक्कमेच्या कामाचे अधिकार देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री.पाटील म्हणाले, राज्यातील स्थापत्य क्षेत्रातील अभियंत्यांचा एकमेकांशी संवाद साधणे आवश्यक असून त्यामधून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विकासाला दिशा मिळण्यास मदत होईल. रस्ते कोणतेही असले तरी त्या रस्त्यावरील खड्डे भरले गेले पाहिजे. अभियंत्यांनी काम करतांना जीव ओतून काम करावे. तसेच कामे करतांना सामाजिक बांधिलकी देखील जोपासावी असे आवाहन देखील त्यांनी केले.
          पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्यातून जे राष्ट्रीय महामार्ग जातात त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. काही महामार्गावर खड्डे पडले असून रस्ते खराब झाले आहे. या रस्त्यांच्या साईडिंग व्यवस्थित भरण्यात न आल्यामुळे अशा ठिकाणी अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणांची तातडीने राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुरुस्ती करावी असे सांगितले.
        सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.1 च्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांनी सादरीकरणातून कामाची माहिती दिली. 173 कि.मी. लांबीची 11 कामे 5054 या अंतर्गत करण्यात येणार आहे. मागील तीन वर्षात पूर्ण करण्यात आलेल्या पुलांच्या, इमारतीच्या बांधकामाची तसेच प्रगतीपथावर असलेल्या कामाची माहिती त्यांनी यावेळी दिली.
           सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.2 चे कार्यकारी अभियंता हेमंत गाणार यांनी आपल्या सादरीकरणातून माहिती देतांना सांगितले की, अड्याळ-दिघोरी-बोंडगाव-नवेगावबांध ते चिचगड रस्त्याचे काम केंद्रीय मार्ग निधीतून 90 टक्के पूर्ण झाले आहे. द्विवार्षिक रस्ते दुरुस्तीची कामे व कामाच्या प्रगतीबाबत तसेच रिक्त पदांबाबतची माहिती दिली.
         यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांनी उपस्थित काही अधिकाऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. तणावातून काम न करता कुटूंबाला सुध्दा वेळ दिला पाहिजे असे सांगितले.
          सभेला राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती साखरवाडे, उपकार्यकारी अभियंता श्री.भोपे, उपविभागीय अभियंता सर्वश्री प्रकाश लांजेवार, विजय सोनुने, रुपचंद वासनिक, दिनेश नंदनवार, श्री.गणगे, प्रविण सुमंत, श्री.साहू, श्री.माटे तसेच दोन्ही सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंते व सहायक अभियंते यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment