शेतकरी समृध्द व्हावा यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. कृषिविषयक विविध योजनांसोबतच शेतकऱ्यांसाठी संरक्षीत सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी सिंचन विहिरीचा कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे. पूर्व विदर्भातील जास्तीत जास्त शेती संरक्षीत सिंचनाखाली यावी यासाठी शासनाने 11 हजार धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्य मार्गदर्शक असलेल्या अनुलोम या संघटनेने सरकारी प्रयत्नांना जनसहभागाची साथ या ब्रीदवाक्याला सार्थकी ठरवून काम केले आहे. अनुलोमच्या मोबाईल अप्लीकेशनमुळे गोंदिया तालुक्यातील घिवारी येथील शेतकरी जानकीबाई चंद्रकुमार हनवते यांना धडक सिंचन विहिरीचा सन 2016-17 या वर्षात लाभ मिळाला.
जानकीबाई हनवते यांच्या नावाची घिवारी येथे 3 एकर धानशेती आहे. शेतात सिंचनासाठी कुठलीही व्यवस्था यापूर्वी नव्हती. मुलगा अजय याच्या स्मार्टफोनवर अनुलोम ॲप्स डाऊनलोड केल्यामुळे त्या ॲप्सवर अजयला धडक सिंचन विहिरीची माहिती मिळाली. या योजनेची माहिती ॲप्सवरुन मिळाल्यानंतर अजयने गोंदिया येथील एका सायबर कॅफेमधून आईच्या नावावर असलेल्या शेतीत धडक सिंचन विहीर मिळावी यासाठी ऑनलाईन अर्ज भरला. या अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे म्हणजे शेतीचा सातबारा, गाव नमूना-8, लाभार्थ्याचे आधारकार्ड, बँकेचे पासबुक व इतर आवश्यक कागदपत्रे या अर्जासोबत जोडले. ऑनलाईन अर्ज भरतांना कुठलाही त्रास झाला नाही. राजकीय हस्तक्षेप, अधिकारी-कर्मचाऱ्यांची अडवणूक ही सुध्दा झाली नाही.
जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अर्जातील त्रुटींची छाननी झाली. आवश्यक असलेली कागदपत्रे जोडल्यामुळे अर्ज त्रुटीत जाणार नाही याची जानकीबाईच्या मुलाला खात्री होती. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असतांना अर्ज भरला. दहा दिवसानंतर यादी प्रसिध्द झाली. अर्ज केल्यानंतर महिन्याभरातच पहिल्याच यादीत जानकीबाईचे नाव आले. आता आपल्या शेतात सिंचनासाठी विहीर खोदून मिळणार असल्याचा आनंद जानकीबाई व परिवारातील सदस्यांना झाला. तालुका समितीने पात्र लाभार्थी म्हणून जानकीबाई हनवतेची निवड केली. जानकीबाईच्या मुलाच्या मोबाईलवर विहीर मंजूर झाल्याचा लघु पाटबंधारे कार्यालयातून संदेश आला. काही दिवसातच विहीर मंजूरीचे पत्र देखील पंचायत समितीच्या लघु पाटबंधारे विभागाच्या उपअभियंत्याकडून मिळाले. अभियंत्याने शेतीची पाहणी करुन विहीर खोदण्याची जागा निश्चित केली. लघु पाटबंधारे विभागाने विहीर खोदण्याचा कार्यारंभ आदेश देवून विहीरीच्या कामाला सुरुवात केली. विहीर 20 फुट खोदल्यानंतर कामाची पाहणी करुन केलेल्या कामाची रक्कम जानकीबाईच्या खात्यात जमा करण्यात आली. टप्याटप्याने विहिरीचे काम करण्यात आले. 40 फुट खोल विहीर खोदण्यात आल्यानंतर विहिरीत 150 फुट खोल बोअर करण्यात आली. त्यामुळे विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी लागले. 13 फुट व्यास असलेल्या विहिरीचे काँक्रीटचे काम पूर्ण झाल्यानंतर केलेल्या कामाचे 2 लक्ष 50 हजार रुपये जानकीबाईच्या बँक खात्यात जमा झाले.
पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करणाऱ्या जानकीबाईच्या चेहऱ्यावर विहीर मिळाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. आता शेतात संरक्षीत सिंचनाची व्यवस्था विहिरीमुळे झाली. भविष्यात कुटूंबाची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी आता धान पिकाव्यतिरिक्त भाजीपाला व इतर पिके घेण्याचा संकल्पही जानकीबाईने केला. ज्या 3 एकर शेतात विहीर बांधण्यात आली त्या शेतात पूर्वी 25 ते 30 हजार रुपयांचा जवळपास 20 क्विंटल धान व्हायचा. मात्र विहिरीमुळे संरक्षीत सिंचनाची व्यवस्था झाल्यामुळे धानाला यंदा मुबलक पाणी मिळाले. यावर्षी जवळपास 60 ते 65 क्विंटल धान होईल असा विश्वास जानकीबाईने व्यक्त केला. धडक सिंचन विहिर योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेतून अर्ज मागविण्यात आल्याने पारदर्शकता आली. कुणालाही वशीला लावण्याचे काम पडले नाही. गतिमानता व पारदर्शकतेमुळे या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे जानकीबाईने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

No comments:
Post a Comment