ग्रामीण भागातील जनतेला अनेकदा
पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाकडून अनेक
उपाययोजना करण्यात येतात. ग्रामीणांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबून
त्यांना शुध्द व स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्प, आपलं
पाणी, नळपाणी पुरवठा योजना, विंधन विहिरवरील योजना, लघु नळपाणी पुरवठा योजना
यासारख्या योजना राबविण्यात येतात. या माध्यमातून ग्रामीण भागातील पिण्याच्या
पाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडविण्यात आले आहे.
गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जात
असताना धान या मुख्य पिकासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत आहे. पाण्याच्या
अतिउपशामुळे भूजल पातळी घटत आहे. पावसाचे कमी होत असलेले प्रमाण, वाढत्या
लोकसंख्येमुळे पाण्याची वाढती मागणी यासारख्या कारणामुळे ग्रामीण पाणी पुरवठ्यांवर
देखील प्रचंड ताण येत आहे. या बाबींचा राज्य शासनाने विचार करुन ग्रामीण भागातील
दीर्घकालीन गरजांचा व आरोग्याचा विचार करुन ग्रामीण जनतेला पुरेसे व शुध्द
पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम ही
योजना जिल्ह्यातील 40 गावांसाठी राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सात तालुक्यातील 40 गावात मुख्यमंत्री
ग्रामीण पेयजल कार्यक्रम ही योजना राबविण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. यामध्ये
आमगाव तालुक्यातील दहेगाव. देवरी तालुका-
शिरपूरबांध, भर्रेगाव, सावली, पिंडकेपार. गोंदिया तालुका- चंगेरा, गुदमा,
नवनगाव/खुर्द, पांजरा, पोवारीटोला, रापेवाडा, सहेशपूर, लोहारा, सतोना, लोधीटोला,
मोगर्रा. गोरेगाव तालुका- दवडीपार, कलपाथरी, मुरदोली, पिंडकेपार, पुरगाव,
शहारवाणी, सोनेगाव. सडक/अर्जुनी तालुका- घाटबोरी/तेली, घटेगाव, गिरोला, डव्वा,
डोंगरगाव, कनेरी/राम, खजरी, कोहळीटोला, वडेगाव. सालेकसा तालुका- निंबा. तिरोडा
तालुका- नवेगाव, डब्बेटोला, गुमाधावडा, खैरलांजी, कोडेलोहारा, मुरपाडी व खुरकुडी
आदी गावांसाठी ही योजना सुरु होणार आहे. एकूण 40 गावांसाठी सुरु होणाऱ्या या
योजनेवर 21 कोटी 59 लक्ष 68 हजार रुपये खर्च होणार आहे. भविष्यात लवकरच या 40
गावातील ग्रामस्थांना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेतून काम पूर्ण
झाल्यानंतर पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या
योजनेच्या मदतीमुळे संबंधित गावातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण
झाले आहे.

No comments:
Post a Comment