सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागाच्या विविध योजनांची माहिती संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा
माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संकल्प समतेचा या घडिपुस्तिकेचे विमोचन
पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते नवेगावबांध येथे 3 नोव्हेंबर रोजी एका
कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे,
जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, उपवनसंरक्षक एस.युवराज, जिल्हा माहिती अधिकारी
विवेक खडसे, अर्जुनी/मोरगाव पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य मंदा कुमरे,
पं.स.सदस्य सर्वश्री होमराज कोरेटी, रामलाल मुंगनकर, प्रेमलाल गेडाम, श्रीमती
अर्चना राऊत, तहसिलदार देवदास बोंबार्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, तालुका
कृषि अधिकारी श्री.तुमडाम, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.खान, श्री.रहांगडाले, नवेगावबांधचे
सरपंच अनिरुध्द शहारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
संकल्प समतेचा या घडिपुस्तिकेमध्ये भारत
सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, कन्यादान योजना, अनुसूचित जाती-जमाती
अत्याचार प्रतिबंधक कायदा, मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे, मागेल त्याला
प्रशिक्षण योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, सावित्रीबाई फुले
शिष्यवृत्ती योजना, रमाई घरकुल योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या
बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड
सबळीकरण स्वाभिमान योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींसाठी निवासी शाळा या
योजनांच्या माहितीसह राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने तीन
वर्षात घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची थोडक्यात माहिती दिली आहे. ही पुस्तिका
संबंधित घटकाच्या लाभार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार असून त्यांना योजनांचा लाभ
मिळण्यास मदत होणार आहे.

No comments:
Post a Comment