जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 24 February 2020

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019

कट्टीपार व मुंडीपार येथे आधार प्रमाणिकरणास प्रारंभ


                       जिल्ह्यातील 29053 खातेदार शेतकरी तात्पुरते पात्र
      महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्राथमिक प्रमाणिकरणाचा प्रारंभ 24 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार आणि आमगाव तालुक्यातील कट्टीपार येथे करण्यात आला. या दोन्ही गावातील 156 तात्पुरते पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 29 हजार 53 तात्पुरत्या पात्र खातेदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून अंतिम यादी 28 फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध होणार आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक शुध्दोधन कांबळे यांनी दिली.
          महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार आणि आमगाव तालुक्यातील कट्टीपार येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा उपनिबंधक शुध्दोधन कांबळे, प्रभारी तहसिलदार नरेश वेदी, सहायक निबंधक नानासाहेब कदम, आपले सरकार पोर्टलचे जिल्हा व्यवस्थापक मयुर टप्पे हे मुंडीपार येथे तर सहायक निबंधक अनिल गोस्वामी हे कट्टीपार येथे उपस्थित होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तसेच राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी देखील उपस्थित होते. आज या दोन्ही गावातील 156 शेतकऱ्यांची प्राथमिक यादी पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. ही यादी संबंधीत बँक व ग्रामपंचायत येथे प्रसिध्द करण्यात आली आहे. या दोन्ही गावातील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरणाचे काम युध्दपातळीवर करण्यात आले. आधार प्रमाणिकरण नोंदणीचे करण्याचे काम आपले सरकार केंद्रावर व संबंधीत बँक शाखेत करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांचे आज आधार प्रमाणिकरण केले त्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर कर्जमाफीची कार्यवाही सुरु झाल्याचे संदेश येत आहे.
          आपली कर्जमाफी झाल्याबद्दल काही शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या. यामध्ये कट्टीपार येथील युवा शेतकरी देवदत्त रहांगडाले म्हणाला, माझ्यावर 27 हजार रुपये कर्ज होते. माझ्याकडे दोन एकर शेती आहे. काही कारणामुळे मी कर्ज भरु शकलो नाही. महाविकास आघाडी सरकारने 2 लाख रुपयेपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला, त्यामुळे याचा फायदा मला झाला आहे. कर्जमुक्ती झाल्यामुळे मी आता चिंतामुक्त झालो आहे. नव्या जोशाने मी पुन्हा चांगली शेती करणार आहे, याबद्दल त्याने सरकारचे आभार मानले.
          कट्टीपार येथील भिमराव शेंडे म्हणाले, माझ्याकडे दोन एकर शेती आहे. कॅनरा बँकेचे माझ्याकडे 17 हजार 700 रुपये कर्ज होते. परंतू मागील काही वर्षापासून शेती साथ न देत असल्यामुळे हे कर्ज मी भरु शकलो नाही. सरकारने 2 लाख रुपयेपर्यंतचे कर्जमाफी करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मी आता कर्जमुक्त झालो आहे. आता नव्याने चांगली शेती करुन मुलांना देखील चांगले शिक्षण देणार असल्याचे ते म्हणाले.
         कट्टीपार येथील विरेंद्र तिरेले यांच्याकडे तीन एक शेती असून 58 हजार 450 रुपये कर्ज घेतले होते. परंतू मागील खरीप हंगामातील नापिकीमुळे कर्जाची परतफेड करता आली नाही. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माझ्यावर असलेले कर्ज माफ करण्यात आल्यामुळे पुढे शेती करणे सोईचे होणार आहे. कर्ज माफ झाल्यामुळे मी आनंदी आहे. मुलांचे शिक्षण व शेती करणे सोईचे होईल. याबद्दल सरकारचे विरेंद्र तिरेले यांनी सरकारचे आभार मानले.
         कट्टीपारचे सरपंच सुरेश चुटे हे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत बोलतांना म्हणाले, गावातील 57 शेतकऱ्यांची पहिल्याच यादीत कर्जमाफी होत असल्याचा मला आनंद आहे. जिल्ह्यात या योजनेची सुरुवात माझ्या गावापासून झालेली आहे. कर्जमुक्त झालेले गावातील शेतकरी देखील आनंदी असून कर्जमुक्तीमुळे ते तणावमुक्त झाले आहे. त्यामुळे ते मुलांना चांगले शिक्षण देण्यासोबतच चांगले पीक घेण्यास या योजनेचा त्यांना हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Sunday, 16 February 2020

महाशिबिरातून योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीस मदत - नाना पटोले

नवेगावबांध येथे महाशिबीरा 20 हजार नागरिकांची उपस्थिती
                                         25 हजार लाभार्थ्यांना मिळणार लाभ
                                             विविध विभागांचे 70 स्टॉल






         महाराष्ट्र हे फुले-शाहू-आंबेडकरांचे राज्य आहे. राज्यातील न्यायव्यवस्था ही देशात चांगल्या प्रकारे काम करीत आहे. अर्जुनी/मोरगावसारख्या दुर्गम भागातील व जिल्ह्यातील नागरिकांना योजनांचा लाभ देण्यासाठी या शिबीरातुन योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी मदत होत आहे. असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
           16 फेब्रुवारी रोजी नवेगावबांध येथील हेलिपॅड मैदानावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,जिल्हा वकील संघ,जिल्हा न्यायालय,जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्व तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाशिबिराचे उद्घाटक म्हणुन श्री पटोले बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एम.जी. गिरडकर, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधि,जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड टी.बी. कटरे तर अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने उपस्थित होते.
           श्री पटोले म्हणाले, देशात माहितीचा अधिकार कायदा लागू झाला. त्याची सर्वप्रथम अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू झाली. या कायद्यामुळे मोठ्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची माहिती मागण्याचा अधिकार देखिल सर्वसामान्य व्यक्तीला प्राप्त झाला. जनतेच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य आहे. विविध क्षेत्रात देखील महाराष्ट्र आघाडीवर आहे. स्वातंत्र्यानंतर सुराज्य मिळण्याचे काम भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून होत आहे. वनालगतच्या गावातील शेतीची वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पर्यटनाच्या माध्यमातून वनालगतच्या गावातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
            दिल्लीसारख्या शहरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे तेथील नागरिकांना आता ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ आली असल्याचे सांगून श्री.पटोले म्हणाले, पूर्वी पाणी विकत घेण्यात येत होते आता मात्र ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ येईल असे वाटत नव्हते. ग्रामीण भागातील शुद्ध हवा घेण्यासाठी पर्यटक म्हणून शहरातील लोक भविष्यात मोठ्या प्रमाणात या भागात येतील असे त्यांनी सांगितले.
           न्यायमूर्ती गिरडकर म्हणाले, शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे यासाठी न्याय आपल्या दारी ही संकल्पना विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून या शिबिराच्या आयोजनातून करण्यात येत आहे. ग्रामीण भागात आज अनेक अडचणी आहेत. शेतकऱ्यांच्या विकासासाठी जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न झाले पाहिजे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे. गाव आणि शेतकरी समृद्ध झाला पाहिजे याचे नियोजन झाले पाहिजे. असे त्यांनी सांगितले.
           नाईलाजास्तव कोणीही न्यायालयाची पायरी चढू नये असे सांगून न्या. गिरटकर म्हणाले, घरातील भांडणे घरात सोडली गेली पाहिजे. तंटामुक्त गाव समिती, तालुका विधी सेवा समिती किंवा लोकअदालतीमधुन आपले भांडण सोडविले पाहिजे. प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे, असे ते म्हणाले.
          डॉ. बलकवडे म्हणाल्या, या महाशिबिरातून कायदेविषयक माहिती देण्यासोबतच विविध शासकीय योजनांची माहिती व त्या योजनांचा लाभ घेण्यास मदत होईल. 20 फेब्रुवारीपर्यंत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित ग्रामपंचायत,तहसील कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात येतील. या यादीमध्ये आपले नाव असल्याची शेतकऱ्यांनी खात्री करावी. त्यानंतर देखिल शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात येतील. पात्र लाभार्थ्यांना वनहक्क पट्टे देण्यासाठी पुराव्याकरीता मोहीम हाती घेण्यात येईल. त्यामुळे भविष्यात संबंधितांवर वनहक्क पट्ट मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
          न्या. श्री माने म्हणाले, योजनांचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना देण्यासाठी व विविध योजनांची माहिती संबंधित लाभार्थ्यांना मिळावी यासाठी या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विभागाचे 70 स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना योजनांची माहिती मिळण्यासोबतच लाभ देखील मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
          या महाशिबिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पोलीस विभागाच्या सायबर सेल,नक्षल सेल, महिला सेल, जिल्हा माहिती कार्यालयाच्या लोकराज्य स्टॉल, कृषी विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत अभियान, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभाग, वन विभाग, समाज कल्याण विभाग, स्टेट बँक ऑफ इंडिया, कौशल विकास विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ, बँक ऑफ इंडिया, महावितरण, कामगार विभाग, महसूल विभाग, भुमिअभिलेख, जिल्हा रेशीम कार्यालय, लघुपाटबंधारे विभाग यासह 70 स्टॉल लावण्यात आले होते.
          प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या स्टॉलचे फित कापुन उद्घाटन  करण्यात आले. यावेळी विविध योजनेच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश, साहित्य  वस्तूंचे वितरण करण्यात आले. मान्यवरांनी विविध स्टॉलला भेटी दिल्या. कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायालयातील तसेच तालुका न्यायालयातील न्यायीक अधिकारी, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील जवळपास  20 हजार नागरिकांची उपस्थिती होती. यामध्ये बचतगटांच्या महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या महाशिबीराचा लाभ जवळपास 25 हजार लाभार्थ्यांना मिळणार आहे. नवेगावबांध येथिल नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थांनी प्रारंभी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन न्या. व्ही. के. पुरी, न्या. एन. आर. वानखेडे व न्या. श्रीमती व्हि. आर. मालोदे यांनी केले. उपस्थितांचे आभार न्या. पी.एस. सोनकांबळे यांनी मानले.

Sunday, 26 January 2020

70 व्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यासह विविध क्षेत्रातील व्यक्ती, संस्था सन्मानीत





भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापन दिन 26 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. मुख्य शासकीय राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रम कारंजा येथील पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वाजता संपन्न झाला. राष्ट्रध्वजारोहणानंतर पालकमंत्री अनिल देशमुख यांनी परेडचे निरीक्षण करुन उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यासह विविध क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांना सन्मानीत केले. यावेळी त्यांनी प्रेरणा सभागृह येथे समग्र शिक्षा अभियानाच्या जिल्हा समन्वयक कुलदिपीका बोरकर यांनी काढलेल्या विविध प्रकारच्या चित्रांची भेट देवून पाहणी केली.

        जिल्ह्यास ध्वज दिन निधी गोळा करण्याकरीता दिलेले उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांचा पालकमंत्री देशमुख यांनी सत्कार केला.
        जिल्हा पोलीस दलातील आंतरीक सुरक्षेबाबत उत्कृष्ट कामगिरी करणारे किशोर टेंभूर्णीकर, संदेश शिरसाट, प्रतापशाह सलामे, राकेश भूरे, रुपेंद्र गौतम, ईश्वरदास जनबंधू, शितल भांडारकर, अमोल राठोड, अमित नागदेवे, पुरुषोत्तम देशमुख, मनोज केवट, प्रकाश मेश्राम यांचा, 9 सप्टेबर 2019 रोजी वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदिलगतच्या गावातील 110 लोकांना सुखरुप सुरक्षीतस्थळी हलविण्याचे काम केले व 15 जानेवारी 2020 रोजी बिरसोला घाट येथे संक्रांतीनिमीत्त भरलेल्या यात्रेत घाटावर आंघोळीसाठी गेलेल्या तीन व्यक्तींना पाण्यात बुडत असतांना त्यांचे प्राण वाचविल्याबद्दल आपत्ती व्यवस्थापन चमूतील ज्ञानेश्वर धनवे, किशोर टेंभूर्णे, सुभाष कश्यप, अजय खोब्रागडे, राजकुमार बोपचे, नरेश उईके, रविंद्र भांडारकर, जसवंत रहांगडाले, संदिप कराडे, रुपेंद्र गौतम, धिरज दुबे, इमरान सैय्यद, जावेद पठाण, गोपाल लोंधे, गिरीधारी पतेह, चुन्नीलाल मुटकूरे, इंद्रकुमार बिसेन, जबरान चिखलोंढे, चिंतामन गिरेपुंजे, अनिल नागपुरे, चंद्रशेखर बिसेन, संदिप गजभिये, निलेश बाभरे, मुरलीधर मुधोडकर, दुर्गेश लंजे यांचा, नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय काम करणारे पोलीस हवालदार राजेंद्र भेंडारकर यांना, आरोग्य विभागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल उपजिल्हा रुग्णालय तिरोडाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम, समाजसेवक नरेश लालवानी, आदर्श शर्मा यांना, गोंदिया ॲथलॅटीक्स संघटनेचे धावपटू सुभाष लिल्हारे, गुरुदेव दमाहे, दिनेश दाऊदशरे, वैशाली माटे, संदिप चौधरी, वर्षा पंधरे, अनमोल चचाणे, सीमा टेंभरे, लोकचंद मारबदे यांनी टाटा स्टील मॅराथॉन 2020 मध्ये सहभाग घेवून पारितोषिक मिळविल्याबद्दल, ज्येष्ठ नागरिक देवेंद्र शर्मा यांनी केरळ येथे झालेल्या 40 व्या नॅशनल मास्टर्स ॲथलॅटिक्स चॅम्पीयनशीप स्पर्धेत 5 हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत चवथा क्रमांक आणि 10 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल, तिरोडा तालुक्यातील लिटिल फ्लावर ॲकाडमी तिरोडा येथील विद्यार्थ्यांनी नाशिक येथील स्पर्धेत जिल्ह्याचा नावलौकीक केल्याबद्दल मुख्याध्यापक रोहितकुमार तिरपुडे, प्रशिक्षक निखील शेंडे, दिपक घरजारे, विद्यार्थीनी ओजस्वी हटवार, आराध्या चंद्रोल, पहेल ग्यानचंदानी, साक्षी जयस्वाल, धानी गुनेरिया, आरोही तिवडे, मृणाली वासनिक, वेदांत पटले, विहान रामटेके, अरायना तोमर, सोनाली लिल्हारे, चांदनी वत्यानी, कृतिका मेश्राम, तुलसी ठाकूर, ओजस्वी महादूले, अन्वेषा जगने, शगुन रोहिले यांना, गोंदिया पब्लिक स्कूलचे विद्यार्थी व शिक्षक पर्यावरण जागृतीचे काम करीत असल्याबद्दल वर्षा भांडारकर यांना, स्मार्ट ग्राम योजनेत तालुक्यातील प्रथम क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींना तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार देवून सरपंच व सचिव यांना सन्मानीत करण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत सोनपुरी ता.गोंदिया, ग्रामपंचायत अर्जुनी ता.तिरोडा, ग्रामपंचायत पाउलदौना ता.आमगाव, ग्रामपंचायत दरबडा ता.सालेकसा, ग्रामपंचायत बोरगाव/बाजार ता.देवरी, ग्रामपंचयत घोटी ता.सडक/अर्जुनी, ग्रामपंचायत कानोली ता.अर्जुनी/मोरगाव यांचा समावेश आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने राबविलेल्या लोकराज्य घरोघरी मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत तिरोडा तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने यांनी 762 शेतकऱ्यांना या वर्षात लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार केल्याबद्दल, जिल्ह्यात सिकलसेल व थेलेसेमीयाच्या रुग्णांना रक्त पुरवठा करण्यास मदत करणारे विनोद चांदवानी, गोंदिया ते वाघा बॉर्डरपर्यंत सायकलने प्रवास करुन पर्यावरण संरक्षण व शांतीचा संदेश देणारे गोंदिया येथील अशोक मेश्राम, रक्तदान कार्यात सक्रीय सहभाग देणारी सोच सेवा संस्था गोंदिया यांना, व्हॉटस्ॲप ग्रुपच्या माध्यमातून 1000 पेक्षा जास्त ग्रामीण डॉक्टरांना हृदयरोगाबाबत मार्गदर्शन करणारे हृदयरोग तज्ञ डॉ.प्रमेश गायधने यांना, मराठा लाईट इन्फ्रन्ट्री पुणे येथे शिपाई पदावर उत्कृष्ट व ईमानदारीने सेवा केलेले गोंदिया येथील कुंजीलाल बोपचे यांना, अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविणारे नैलेश शेंडे यांचा, यशोदा बहुउद्देशीय संस्था पदमपूर ता.आमगाव यांनी सामाजिक व युवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, सामाजिक व युवक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल देवरी येथील कुलदीप लांजेवार यांना जिल्हास्तरीय युवा पुरस्कार, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गोंदिया येथील विशाल डोडानी, तनुश्री गौतम व चेतक मानक यांना आणि रेल्वे प्रवास करतांना प्रवाशाला वाचविल्याबद्दल रेल्वे पोलीसचे योगेश कुंजाम व प्रशांत बर्वे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मानीत करण्यात आले.
00000

शिवभोजन केंद्राचे पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ




         गरीब आणि गरजू लोकांना 10 रुपयात भोजन देणाऱ्या शिवभोजन केंद्राचा शुभारंभ 26 जानेवारी रोजी पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते जयस्तंभ चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील प्रताप क्लब कॅन्टीन येथे करण्यात आला. यावेळी आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ.राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार राजेश भांडारकर, अप्पर तहसिलदार अनिल खडतकर, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, प्रताप क्लब कॅन्टीनचे संचालक केशव पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.
        पालकमंत्री देशमुख यांनी गरीब व्यक्तीला शिवभोजन थाली वाटून या योजनेचा शुभारंभ केला. प्रताप क्लब कॅन्टीन परिसरात केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच नवीन प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयात कामानिमीत्त येणाऱ्या गरीब व गरजू लोकांना या कॅन्टीनमधून शिवभोजनाचा 10 रुपये देवून आस्वाद घेता येणार असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000


लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्याला मिळवून देणार - पालकमंत्री अनिल देशमुख

70 वा प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन साजरा
                                 • राज्यात 8 हजार पोलिसांची भरती करणार
                                 • अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी कडक पाऊले उचलणार
                                 • 2 लाखावरील कर्जमाफीसाठी प्रयत्नशील
                                 • गोंदियात मॅरॉथॉन स्पर्धेचे आयोजन करणार





         जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढील काळात चांगले काम करावे. लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्याला मिळवून देण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
        26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापन दिन कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदान येथे साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री देशमुख बोलत होते.
        यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, आमदार विनोद अग्रवाल, माजी खासदार खुशाल बोपचे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक आर.एम.रामानुजम, उपवनसंरक्षक एस.युवराज व वन विकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती दिव्य भारती यांची प्रमुख उपस्थिती होती.
        पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले, राज्याच्या टोकावर असलेल्या गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना राबविण्यात येत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. या सरकारच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजुर, महिला, आदिवासी व दलित बांधवांसह सर्वांच्या विकासासाठी भविष्यात अनेक योजना राबविण्यात येतील. मधल्या काळात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत होता. अशा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शेतकऱ्यांवर असलेले कर्ज माफ झाले पाहिजे यासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच महत्वाचा निर्णय घेवून शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले. त्याचा मोठा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. पुढील काळात जे शेतकरी कर्जाची नियमीत परतफेड करतात त्या शेतकऱ्यांसाठी सुध्दा शासन योजना जाहीर करणार आहे. 2 लाखाच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा कसा देता येईल यादृष्टीने राज्य शासन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
          जिल्ह्यात शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे असे सांगून श्री देशमुख म्हणाले, रजेगाव/काटी, तेढवा, पिंडकेपार यासह अनेक उपसा सिंचन व सिंचन प्रकल्पाची कामे जवळपास पूर्ण झाली आहे. धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-2 पूर्ण करण्यासाठी पहिला हप्ता म्हणून 50 कोटी रुपये मंजूर झाले आहे. हा उपसा सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. या प्रकल्पाचा फायदा गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार आहे. आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात 20 लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना धान खरेदीचे 240 कोटी रुपये अदा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
          श्री देशमुख पुढे म्हणाले, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे केंद्र शासनाच्या व्यवस्थापन परिणामकारकता मुल्यमापनात या प्रकल्पाने राज्यात पहिला तर देशात बारावा क्रमांक मिळविला आहे. त्याबद्दल या प्रकल्पाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन श्री देशमुख यांनी केले. ही जिल्ह्यासाठी आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पोलीस विभागाकडून नक्षल कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी चांगले काम सुरु आहे. राज्यातील युवकांना पोलीस सेवेत येण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी 8 हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. लवकरच राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        राज्यात कायदा व सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे यासाठी पोलीस विभाग प्रभावी पध्दतीने काम करीत असल्याचे सांगून श्री देशमुख म्हणाले, तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर.पाटील यांनी अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी कायदा केला होता. त्यांच्यानंतर या कायदयाची अंमलबजावणी व्यवस्थीत झाली नाही. ग्रामीण भागात अवैध सावकारीचा त्रास मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होतो आणि त्यांची लुबाडणूक केली जाते. अशा या अवैध सावकारीवर कडक निर्बंध आणण्यासाठी पुढील काळात पोलीस विभागाच्या वतीने कठोर पाऊले उचलली जातील याची ग्वाही त्यांनी दिली.
        जिल्हा मागास, दुर्गम, नक्षलग्रस्त असला तरी जिल्ह्यातील 180 तरुण युवकांनी मागीलवर्षी व यावर्षीच्या मुंबई मॅरॉथॉन स्पर्धेत सहभाग घेवून चांगले यश मिळविले असल्याचे सांगून श्री देशमुख म्हणाले, या युवकांना पुढील काळात प्रोत्साहन देण्यासाठी गोंदिया येथे एका मोठ्या मॅरॉथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. मुंबई येथे पुढील मॅरॉथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, त्यांना तेथे मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        प्रारंभी पालकमंत्री देशमुख यांनी ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. परेडचे निरीक्षण केले. शालेय मुला-मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम बघून त्यांनी प्रशंसा केली. विविध अधिकारी-कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींचा व संस्थांचा पालकमंत्र्यांनी सत्कार केला.
        यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष संजय दैने, सचिव देवसूदन धारगावे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एसईए हाश्मी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री ढोणे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी श्री तारसेकर, युवराज कुंभलकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापिका मंजुश्री देशपांडे यांनी केले.
                       

Saturday, 25 January 2020

पालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या घडिपुस्तिकेचे व भित्तीपत्रकाचे प्रकाशन

                                   जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम

          जिल्हा नियोजन समितीच्या 24 जानेवारीच्या सभेत पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांवर आधारित जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या परिवर्तन या घडिपुस्तिकेचे आणि अकरा विविध योजनांच्या भित्तीपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, खासदार सुनिल मेंढे, आमदार सर्वश्री डॉ.परिणय फुके, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, विजय रहांगडाले, सहसराम कोरोटे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधि, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती संबंधीत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी व त्यामाध्यमातून त्यांना या योजनांचा लाभ घेणे सोईचे व्हावे यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने अनुसूचित जाती उपयोजना सन 2019-20 च्या निधीतून परिवर्तन ही घडिपुस्तिका तयार केली आहे. या घडिपुस्तिकेमध्ये भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कन्यादान योजना, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे, रमाई आवास योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे, अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींसाठी निवासी शाळा, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, सफाई कामगारांच्या मुला-मुलींसाठी पब्लिक स्कूल, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य आणि सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आदी योजनांच्या माहितीचा समावेश आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटी, लाभाचे स्वरुप, अर्ज करण्याची पध्दत आणि कोणाशी संपर्क साधावा याबाबतची माहिती घडिपुस्तिकेत देण्यात आली आहे.
         विविध शासकीय कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी लावण्यासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कन्यादान योजना, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, रमाई आवास योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, सफाई कामगारांच्या मुला-मुलींसाठी पब्लिक स्कूल, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य आदी योजनांची भित्तीपत्रके तयार करण्यात आली आहे. या भित्तीपत्रकावरील माहितीमुळे संबंधीत लाभार्थ्यांना शासनाच्या या योजनांची माहिती मिळून लाभ घेण्यास मदत होणार आहे.
         घडिपुस्तिका व भित्तीपत्रकांच्या प्रकाशनप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
                                 00000