जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 30 November 2017

परिसंवादातील वक्त्यांचा सूर डिजीटल युगात ग्रंथांचे महत्व अनन्यसाधारण

गोंदिया ग्रंथोत्सव 2017

            आजचे युग हे संगणकाचे युग आहे. आजच्या या डिजीटल युगातही ग्रंथांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे मत परिसंवादातील वक्त्यांनी व्यक्त केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि श्री शारदा वाचनालयाच्या संयुक्तवतीने वाचनालयाच्या बजाज सभागृहात 29 नोव्हेंबर रोजी गोंदिया ग्रंथोत्सव-2017 च्या निमित्ताने डिजीटल युगात ग्रंथाचे महत्व या विषयावरील परिसंवाद वक्ते आपले विचार व्यक्त करतांना बोलत होते. या परिसंवादामध्ये राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष डॉ. रमेश जनबंधू, प्रा. कविता राजाभोज व प्रा. बबन मेश्राम यांनी सहभाग घेतला.
          डॉ. जनबंधू म्हणाले, आजचे ग्रंथालय हे आधुनिकतेकडे वळलेले असावे. डिजीटायझेशनच्या माध्यमातून ग्रंथ उपलब्ध झाले आहे. माहितीचे आदान प्रदान झाले पाहिजे. पुस्तकाच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचविण्याचे काम झाले पाहिजे. ग्रंथांच्या व्याख्या आज बदलत आहे. त्यानुसार ग्रंथालयाने बदल स्विकारले पाहिजे. डिजीटल युगातही ग्रंथालयाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी सांगितले.
          डिजीटायझेशनचे फायदे भरपूर असल्याचे सांगून डॉ. जनबंधू म्हणाले, ग्रंथालयांनी आता विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकले पाहिजे. संगणकाचा वापर करुन जास्तीत जास्त लोकांना संगणक साक्षर व सुसंस्कृत केले पाहिजे. असे ते म्हणाले.
           प्रा. श्रीमती राजाभोज म्हणाल्या, युगाची परिभाषा ही अष्मयुगापासून हळूहळू बदलत गेली आहे. माणसाची परिभाषा बदलत गेली. त्याचप्रकारे साहित्यही बदलत गेले. काळाप्रमाणे माणसानेही बदल स्विकारणे गरजेचे आहे. डिजीटल युगात आपण स्क्रीनवर वाचतो, पाहतो, पण लक्षात किती राहते हा महत्वाचा प्रश्न आहे. पण आपण ग्रंथाचे वाचन केले तर कायम लक्षात राहते. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांला मोबाईल घेऊन न देता वाचनासाठी पुस्तके घेवून दिली पाहिजे. वाचनाचे संस्कार आले नाही तर आपण आजच्या युगात जगू शकणार नाही. पूर्वी वाचन संस्कृती ही मार्यादित लोकांकडे होती, असे त्यांनी सांगितले.
           प्रा. मेश्राम म्हणाले की, आजची पिढी ही डिजीटल झाली आहे. ज्ञानाच्या कक्षा वाढल्या आहेत. डिजीटलमुळे सर्व जग जवळ आले आहे. जग कितीही बदलले असले तरी ग्रंथाचे महत्व कमी झालेले नाही. आजही वाचकांचा ग्रंथावर  100 टक्के विश्वास आहे. पण ई-बुकवर विश्वास ठेवणे आजही अवघड जाते. ग्रंथालयाचे स्वरुप आज बदलले आहे. ते आज ज्ञानाचे मंदिर झाले आहे. ज्ञानरुपी या मंदिराचे महत्व दिवसेंदिवस वाढतच आहे. ग्रंथालयातून ज्ञानदानाचे कार्य करण्यात येत आहे. 18 वे शतक हे क्रांतीचे होते. क्रांतीकारी विचाराचा प्रभाव समाजावर झाला त्यामुळे विचारसरणी प्रगल्भ झाल्याचे त्यांनी सांगितले.
         आज आपण 21 व्या शतकात वावरत असल्याचे सांगून प्रा. मेश्राम म्हणाले, ग्रंथ हे माहिती व ज्ञान देण्याचे काम करतात. व्यक्तीची आवड निवड निर्माण झाली पाहिजे. ग्रंथालये हे ज्ञानात भर घालण्याचे काम करतात. व्यक्तीला वाचनास प्रवृत्त करण्याचे काम ग्रंथालये करतात. मानवी समाजाचा विकास ग्रंथालयामुळे साधला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

           डिजीटल युगात ग्रंथांचे महत्व या विषयांवर प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी ग्रंथप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य विनायक अंजनकर यांनी मानले.

व्यक्तीमत्व घडविण्याचे सामर्थ्य ग्रंथात - प्रा.नरेंद्र आरेकर

                              गोंदिया ग्रंथोत्सव-2017 परिसंवाद
     प्रत्येकाने आध्यात्मीक ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. ग्रंथ हेच गुरु आहेत. मानवी जीवनाचे व्यक्तीमत्व घडविण्याचे सामर्थ्य ग्रंथात आहे, असे प्रतिपादन प्रा.नरेंद्र आरेकर यांनी केले.
    जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि श्री शारदा वाचनालयाच्या संयुक्त वतीने बजाज सभागृहात 30 नोव्हेंबर रोजी ग्रंथोत्सवा निमित्ताने आयोजित ‘ग्रंथाने काय दिले’ या परिसंवादात श्री.आरेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक लखनसिंह कटरे होते. प्रमुख अतिथी म्हणून कवी व साहित्यीक माणिक गेडाम, प्रा.डॉ.वर्षा गंगणे, प्रा.डॉ.सविता बेदरकर उपस्थित होत्या.
      श्री.आरेकर पुढे म्हणाले, पुस्तके माणसाला घडवितात. ग्रंथ ज्या स्वरुपाचे असतात त्याचप्रमाणे आपण घडत असतो. ग्रंथ माणसाला बहुश्रूत करतात. आपल्याला बोलण्याची शक्ती ग्रंथाने दिली आहे. चांगला वाचक असल्याशिवाय चांगला नेता होत नाही. ग्रंथांनी संतांचे अभंग दिले. ग्रंथ हे जगाकडे बघण्याची दृष्टी देतात. ग्रंथ हे आपल्याला प्रेरणा देतात. अन्यायाविरुध्द वाचा फोडण्याचे काम पुस्तके करतात. प्रत्येकाला आपल्या अधिकाराची जाणीव असली पाहिजे. अवांतर पुस्तके वाचल्याने आपल्या ज्ञानात भर पडते. वाचन अविरत सुरु ठेवावे. मानवी जीवनाला समृध्द करण्याचे काम ग्रंथ करीत असतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      श्री.गेडाम म्हणाले, ग्रंथांनी समाजाची वस्तुस्थिती मांडण्याचे काम केले आहे. निसर्ग हा सगळ्यात मोठा ग्रंथ आहे. विद्यार्थ्यांनी मृत्यूंजय कादंबरी एकदातरी वाचावी, त्यातून प्रेरणा मिळेल. क्रमीक पुस्तकांसोबतच इतर साहित्याचे सुध्दा वाचन केले पाहिजे. अवांतर वाचन केल्याने ज्ञान समृध्द होते. वाचन हे भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. आत्मचरित्र लिहिण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.
     प्रा.डॉ.गंगणे म्हणाल्या, सध्या वाचन संस्कृती लोप पावत आहे. आज पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे आज वाचक हरवल्याचे दिसून येत आहे. ग्रंथांचे जतन केले पाहिजे. ग्रंथांमध्ये व्यक्तीमत्व निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. आई-वडिलांनी मुलांमध्ये पुस्तके वाचनाची आवड निर्माण करावी. पुस्तके वाचल्याने ज्ञानात भर पडते, त्यामुळे प्रत्येकाने पुस्तकांचे वाचन करणे गरजेचे आहे. अनुकरणाची परंपरा जपल्या गेली तर वाचन संस्कृती जपली जाईल. ग्रंथांमध्ये मानवाचे भवितव्य निर्माण करण्याची शक्ती आहे. एखादया कार्यक्रमात आपल्याला भेट वस्तू दयायची असेल तर आपण पुस्तक भेट म्हणून दयावी असेही त्यांनी सांगितले.
      प्रा.बेदरकर म्हणाल्या, विचारांना प्रेरणा देण्याचे काम पुस्तके करतात. पुस्तके आपले जीवन घडवितात. देशाला जर महासत्ता बनवायचे असेल तर देवालयात जाण्यापेक्षा ग्रंथालयात जाण्याची आज खरी गरज आहे. ग्रंथांनी आपल्याला खुपकाही शिकवले आहे. सावित्रीबाई फुले यांची प्रेरणेमुळेच यापुढेही काम करीत राहीन. ग्रंथांनी मला समृध्द केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
      श्री.कटरे म्हणाले, मराठी ही आमची मायबोली आहे. झाडीबोली ही आपली मराठीची अमृत भाषा आहे. ग्रंथ हे माणसाला घडवितात. ग्रंथ वाचनाचा चांगला परिणाम होतो. ग्रंथ हे नेहमीच मदत करायला तयार असतात. वाचक घडवावा लागतो. विचारप्रवाह हे कधीही संपत नाही. जो संपतो तो वाद आणि जो प्रवाहीत राहतो तो विचारप्रवाह असतो. जीवनात प्रत्येकाला वाचणाची आवड असली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

      यावेळी मान्यवरांना भारतीय संविधान ग्रंथ म्हणून भेट देण्यात आले. शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार नागपूर, नाथे पब्लीकेशन नागपूर, हिमालय पब्लीकेशन, अभिमन्यू बुक स्टॉल साकोली व जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्य स्टॉल या ग्रंथोत्सव कार्यक्रमात लावण्यात आला होता. कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील विविध ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल, विद्यार्थी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शेषराव भिरडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे यांनी मानले.

Wednesday, 29 November 2017

वाचन संस्कृती वाढविण्यात वाचकांची भूमिका महत्वाची - डॉ.दिलीप पाटील-भूजबळ

                            गोंदिया ग्रंथोत्सव-2017 चे उदघाटन
                                      
    आज वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. तिचा ऱ्हास होतो की काय अशी भिती वाटत आहे. सोशल मिडियाचा वापर आज मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. ग्रंथ हेच गुरु असल्यामुळे वाचनाची सवय जोपासली पाहिजे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी वाचकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांनी केले.
      जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि श्री शारदा वाचनालयाच्या संयुक्त वतीने वाचनालयाच्या बजाज सभागृहात 29 नोव्हेंबर रोजी आयोजित गोंदिया ग्रंथोत्सव-2017 चे उदघाटन करतांना डॉ.भूजबळ बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून झाडीबोलीच्या बहिनाबाई अंजनाबाई खुणे, ज्येष्ठ कवी साहित्यिक युवराज गंगाराम, प्रा.डॉ.सविता बेदरकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, सहायक ग्रंथालय संचालक मिनाक्षी कांबळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिव शर्मा, श्री शारदा वाचनालयाचे सचिव जगदिश मिश्रा, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह डी.डी.रहांगडाले यांची उपस्थिती होती.
       नव्या पिढीला प्रेरणा देणारे अनेक पुस्तके आज बाजारपेठेत उपलब्ध असल्याचे सांगून डॉ.भूजबळ म्हणाले, या पुस्तकांचे वाचन नव्या पिढीने केले पाहिजे. मराठी साहित्य समृध्द आहे, या साहित्याचे वाचन झाले पाहिजे. समाजात असलेले वेगवेगळे विचारप्रवाह हे समाज सुधारणेसाठी एकत्र आले पाहिजे. ग्रंथाचे भांडार हे वैभव आहे. या वैभवापासून कोणीही वंचित नसावे. थोरामोठ्यांचे विचार ग्रंथातून लोकांपर्यंत गेले पाहिजे. भारतीय संविधान हा आपला राष्ट्रीय ग्रंथ असल्याचे सांगून डॉ.भूजबळ म्हणाले, या संविधानामुळे विविधतेने नटलेला आपला देश शक्तीशाली बनला आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढीसाठी प्रत्येकाने योगदान देण्याची आवश्यकता त्यांनी विशद केली.
       श्रीमती मेंढे म्हणाल्या, ग्रंथाचे महत्व अनन्यसाधारण आहे. ग्रंथ वाचण्यामुळे ज्ञान प्राप्ती होते. दररोज वाचनासाठी वेळ काढला पाहिजे. अनेक पुस्तके ही नव्या पिढ्यांसाठी महत्वपूर्ण आहे. वाचनाची सवय वाढली पाहिजे. वाचन हे प्रगतीचे लक्षण आहे. जिल्ह्यात असलेल्या अनेक ग्रंथालयात चांगली पुस्तके उपलब्ध आहेत, त्याचे वाचन झाले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
      श्रीमती कांबळे म्हणाल्या, वाचन चळवळ ही वाढली पाहिजे. ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी ग्रंथ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून झाला आहे. वाचनामुळे व्यक्तीचे व्यक्तीमत्व निर्माण होते. वाचन हे स्वत:पुरते मर्यादित न ठेवता ते इतरांनाही सांगितले पाहिजे. समाजात चांगले विचार रुजण्यासाठी ग्रंथांची भूमिका महत्वाची आहे. विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन केले पाहिजे. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी वाचनाचा छंद जास्तीत जास्त जोपासला पाहिजे असे त्या म्हणाल्या.
       श्री.सोसे म्हणाले, ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचकांमध्ये पुस्तके वाचण्याची आवड निर्माण झाली पाहिजे. ग्रंथ हे आपले मित्र आहे. अनेक ग्रंथ हे आपल्या जीवनात महत्वाची भूमिका पार पाडत असतात. जास्तीत जास्त वाचनामुळे विचारसरणी प्रगल्भ होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व अंजनाबाई खुणे यांनीही विचार व्यक्त केले.

       प्रारंभी डॉ.भूजबळ यांनी शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार विभागाच्या स्टॉलचे फित कापून उदघाटन केले. कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील विविध ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल, विद्यार्थी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे यांनी केले. संचालन मंजुश्री देशपांडे यांनी तर उपस्थितांचे आभार शिव शर्मा यांनी मानले.

Sunday, 26 November 2017

माणसाला माणूस म्हणून ओळख भारतीय संविधानामुळे - देवसुदन धारगावे

सामाजिक न्याय भवनात संविधान दिन साजरा

     स्वातंत्र्यपूर्व काळात देश विविध राज्यात व संस्थानात विखुरलेला होता. राजा बोले प्रजा चाले अशी परिस्थिती होती. जाती-जाती आणि धर्माधर्मामध्ये विभाजन झाले होते. पारंपारीक पध्दतीने जातीवर आधारीत व्यवसाय चालायचे. स्वातंत्र्यानंतर डॉ.आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे वंचित, दुर्बल घटक आज विकासाच्या प्रवाहात येवू लागला आहे. पात्रता असलेली व्यक्ती देखील देशाच्या सर्वोच्च ठिकाणी बसू शकते ही संविधानामुळे शक्य झाले आहे. माणसाला माणूस म्हणून ओळख देण्याचे काम भारतीय संविधानामुळे झाले असल्याचे मत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे यांनी केले.
     भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम 26 नोव्हेंबर रोजी सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्री.धारगावे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त डॉ.मंगेश वानखेडे, समाज कल्याण अधिकारी श्री.पोवार यांची उपस्थिती होती.
     श्री.धारगावे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देश एकसंघ चालावा यासाठी घटना समितीची स्थापना करण्यात आली. 2 वर्ष 11 महिने 17 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर भारतीय संविधान तयार झाले. भारतीय संविधानाचे महत्व अजरामर आहे. डॉ.आंबेडकरांनी जगातील अनेक राज्यघटनांचा अभ्यास केला. कोणावर अन्याय, अत्याचार होणार नाही त्याला न्याय मिळेल असे संविधान डॉ.आंबेडकरांनी तयार केले असल्याचे त्यांनी सांगितले.
      श्री.खडसे म्हणाले, भारतीय संविधान हा एक ऐतिहासिक दस्ताऐवज आहे. भारतीय संविधानातील प्रत्येक कलम हे प्रत्येक भारतीयांना उज्ज्वल भविष्याकडे नेणारे दिपस्तंभ आहे. राज्यघटनेतील कलमे ही केवळ कायदयाची कलमे नाहीत तर त्यांच्यात शेकडो वर्षापासून खितपत पडलेल्या सुस्त भारतीय समाजाला खडबडून जागे करण्याची व समतेच्या उज्ज्वल भवितव्याकडे नेण्याची ताकद आहे. बालवयात मुलांनी संविधानाचे वाचन केले तर चांगले संस्कार मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
     श्री.रामटेके म्हणाले, या देशात बाबासाहेब जन्माला आले नसते आणि त्यांनी भारतीय संविधान लिहिले नसते तर देशाची स्थिती कशी असती याचा विचार न केलेला बरा. आज मागासवर्गीय समाजांनी डॉ.आंबेडकरांचे विचार आत्मसात केले पाहिजे. इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम 340 वे कलम, अनुसूचित जमातीसाठी 341 वे कलम आणि अनुसूचित जातीसाठी 342 वे कलम लिहिले. या समाजासाठी तरतूद संविधानात केली नसती तर या समाजाची आज वाईट अवस्था असती. ज्या समाजांनी डॉ.आंबेडकरांचे विचार आजही आत्मसात केले नाही तो समाज आजही मागासच असल्याचे त्यांनी सांगितले.
     डॉ.सविता बेदरकर यांनी डॉ.आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाबद्दल आचार्य कृपलानी डॉ.आंबेडकरांना काय म्हणाले होते आणि त्यावर डॉ.आंबेडकरांनी त्यांना काय उत्तर दिले हे यावेळी सांगितले. उपस्थितांना त्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची शपथ दिली.
     प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्री.वानखेडे यांनी केले. संचालन प्रदीप ढवळे यांनी केले. उपस्थितांचे आभार समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी मानले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, नागरीक व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 25 November 2017

विकास कामे व महसूल वसुली उद्दिष्ट नियोजनातून वेळेत पूर्ण करा - विभागीय आयुक्त अनूप कुमार

     विविध यंत्रणांना लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी आणि विकास कामे करण्यासाठी निधी देण्यात येतो. महसूल विभागाला महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. यंत्रणांनी व महसूल विभागाने आपली कामे नियोजनातून निर्धारित वेळेत पूर्ण करावी. असे निर्देश विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी दिले.
     जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात 25 नोव्हेंबर रोजी विविध यंत्रणा व महसूल विभागाचा आढावा घेतांना श्री.अनूप कुमार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, उपवनसंरक्षक एस.युवराज, उपायुक्त सुधाकर तेलंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस.बी.मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
     श्री.अनूप कुमार म्हणाले, यावर्षी पाऊस कमी आल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. भविष्यात पाणी टंचाईचे संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे नियोजन आतापासूनच करावे. भूजल संरक्षण अधिनियम कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन दयावा. रेतीघाटामुळे ज्या गावाचे रस्ते खराब झाले आहे त्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खनिज विकास प्रतिष्ठानमधून निधी उपलब्ध करुन दयावा. जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात वाव असल्यामुळे पर्यटनस्थळांचा विकास करुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे मार्केटींग करावे. निसर्ग संवर्धनासोबतच पर्यटनाच्या दृष्टीने देखील संवर्धन झाले पाहिजे असे ते म्हणाले.
      जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करावा असे सांगून श्री.अनूप कुमार म्हणाले, धापेवाडा टप्पा-2, झाशीनगर उपसा सिंचन योजना, निमगाव प्रकल्प, पिंडकेपार/डांगुर्ली प्रकल्प, मानागड प्रकल्प या प्रकल्पाच्या पुर्णत्वाला देखील गती मिळाली पाहिजे. बिरसी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवावे. जिल्हा परिषदेतील वर्ग-2 चे रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा व त्याबाबत पाठपुरावा करावा. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत प्रत्येक कुटूंबातील व्यक्ती शौचालयाचा नियमीत वापर करतील यासाठी प्रवृत्त करावे. बँकेशी समन्वय साधून सहकार विभागाने पीक कर्ज योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात उपलब्ध होताच जमा करावे असे ते म्हणाले.
     धडक सिंचन विहिर कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षीत सिंचनाची व्यवस्था निर्माण होणार असल्याचे सांगून श्री.अनूप कुमार म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इतर पिके घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात यावे. रोहयोच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामे उपलब्ध झाल्यास मजुरांच्या हाताला काम मिळेल व त्या माध्यमातून विकास कामे करतांना जिल्हा राज्यात अव्वल कसा राहील याचे नियोजन करावे. कामात दिरंगाई करणाऱ्याची गय केली जाणार नसून टिम वर्क म्हणून काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी महसूल वसुलीचा आढावा घेतला.
      डिसेंबर अखेरपर्यंत पाणीटंचाई भासणाऱ्या गावांचे नियोजन करण्यात आल्याचे सांगून श्री.ठाकरे म्हणाले, यावेळी रब्बी पिकांना सिंचनासाठी पाणी देण्यात येणार नाही. अवैध रेती उत्खनन होणार नाही याकडे लक्ष दयावे. महसुली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून निर्धारित वेळेत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
     यावेळी डॉ.भूजबळ यांनी नक्षलग्रस्त भागातील रस्त्यांसाठी निधीची आवश्यकता विशद केली. तसेच पोलीस गृह निर्माण योजनेअंतर्गत पोलिसांच्या शासकीय निवासस्थान व पोलीस स्टेशन इमारतीबाबतची माहिती दिली. सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

क्रीडा स्पर्धेत यशस्वी व्हा - राजकुमार बडोले



तालुकास्तरीय सुरक्षा दौड स्पर्धा
    देशात लोकशाही व्यवस्था आहे. नक्षल्यांना बंदुकीच्या बळावर काहीही करता येत नाही. संविधानाने लोकांच्या मताला महत्व दिले आहे. मतदानाच्या पेटीतूनच राजा जन्माला येतो. जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील युवावर्गाने इतरत्र न भरकटता विकासाची कास धरावी. पोलीस विभागाच्या वतीने आयोजित सुरक्षा दौड स्पर्धेत सहभागी होवून यश संपादन करावे. असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
     सडक/अर्जुनी तालुक्यातील पांढरवाणी येथे नुकतेच गोंदिया जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने बिरसा मुंडा जयंती पंधरवाड्याच्या निमित्ताने नक्षलग्रस्त क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांचे खेळांमधील करीयर घडविण्यासाठी तालुकास्तरीय सुरक्षा दौड कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, पं.स.सभापती कविता रंगारी, अपर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पं.स.सदस्य राजेश कठाणे, शेषराव गिरेपुंजे, गोंगले सरपंच डी.यु.रहांगडाले यांची उपस्थिती होती.
     पालकमंत्री पुढे म्हणाले, लोकसहभागातून अनेक कामे यशस्वी होतात. पोलीस दलाच्या वतीने सुरक्षा दौडचे देखील लोकसहभागातून यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नक्षलग्रस्त भागातील युवावर्गात मोठ्या प्रमाणात क्रीडा गुण आहे. अशा प्रकारच्या धावण्याच्या स्पर्धेतून त्यांच्या अंगी असलेले सुप्त क्रीडागुण दिसून येण्यास मदत होते. येथूनच त्यांना जीवनाचा यशस्वी मार्ग मिळतो. रन फॉर सेक्युरिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.
      डॉ.श्री.भूजबळ म्हणाले, सुरक्षा दौडला आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 5 हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या दौडमध्ये सहभाग घेतला आहे. सडक/अर्जुनी तालुक्यातून 600 च्यावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. नक्षलविरोधी जनजागरण विद्यार्थ्यांमध्ये व्हावे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेतून यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना धावण्याचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      सुरक्षा दौड निमित्ताने आयोजित कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक व क्रीडा कौशल्य दिसून येत असल्याचे सांगून श्री.भूजबळ म्हणाले, सुरक्षा दौड हा समाज जागृती व प्रबोधन करणारा कार्यक्रम आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम करावे. त्यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      सुरक्षा दौडमध्ये सडक/अर्जुनी तालुक्यातील 36 शाळा व वसतिगृहांच्या 600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तालुकास्तरीय दौड स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. तालुक्यातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी नृत्य व प्रबोधनपर कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर पर्वते यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्ग व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन व उपस्थितांचे आभार श्री.मेश्राम यांनी मानले.

Friday, 24 November 2017

ग्रामीण विकासासाठी जिल्हा परिषदेच्या प्रश्नांच्या सोडवणूकीला प्राधान्य - राजकुमार बडोले



जिल्हा परिषदेच्या विभागांचा आढावा


      ग्रामीण भागातील लाभार्थी व विकास कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेची भूमिका महत्वाची आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांना लाभ मिळावा व विकास कामे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासावी. जिल्हा परिषदेच्या विविध प्रश्नांच्या सोडवणूकीला प्राधान्य देण्यात येणार असून लवकरच मंत्रालय स्तरावर या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बैठक घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा 23 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉल येथे आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपाध्यक्ष रचना गहाणे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, महिला व बालकल्याण समिती सभापती विमल नागपूरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       श्री.बडोले यावेळी म्हणाले, ग्रामीण भागातील ज्या भागात पाणीटंचाईची स्थिती आहे अशा गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन करावे व त्यानुसार वेळेत पाणीटंचाईवर मात करावी. जिल्ह्यातील ज्या दलित वस्त्यामध्ये पथदिवे, रस्ते, समाज मंदिरे नाही ती कामे प्राधान्याने घेतांना बृहत आराखडा तयार करावा. दलित वस्त्यांमध्ये मुला-मुलींना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी अभ्यासिका सुरु कराव्यात. बार्टीमार्फत अभ्यासिकेसाठी पुस्तके पुरविण्यात येईल असे ते म्हणाले.
      दलित वस्तींच्या विकासासाठी नाविण्यपूर्ण योजना कुणाला सूचविता येत असेल तर त्या सांगाव्यात असे सांगून श्री.बडोले म्हणाले, ही कामे करतांना ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथिल करण्यात येईल. कृषि विभागाने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी नाविण्यपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. 2022 पर्यंत सर्वांना घरे दयावयाचे असल्यामुळे शासनाकडून घरकुलाचे उद्दिष्ट वाढवून घेतले पाहिजे असेही ते म्हणाले.
      श्री.बडोले म्हणाले, नैसर्गीक आपत्तीत पडलेल्या घरांसाठी तातडीने मदत करावी. रमाई घरकूल योजनेमध्ये लाभार्थ्यांची निवड करतांना अशाच लाभार्थ्यांची निवड प्राधान्याने करावी की ज्यांना घरेच नाही. 2019 पर्यंत जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. ग्रामीण भागातील बचतगटातील विकासासाठी यंत्रणांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले पाहिजे. बचतगटाच्या विकासासाठी नियोजनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी विशद केले.
      जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाने नियोजन करावे असे सांगून श्री.बडोले म्हणाले, जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घ्यावी. तलाव दुरुस्तीचा विशेष प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. धडक सिंचन विहिरीची कामे तातडीने पूर्ण करावी. शेळीपालनाचे तंत्रशुध्द प्रशिक्षण बेरोजगार युवकांना दयावे. त्यांना शेळीगट वाटप करुन योग्य पध्दतीने ते शेळीपालनाचा व्यवसाय करतील.
      ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी गैरहजर असतात त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी असे सांगून श्री.बडोले म्हणाले, भरारी पथकाच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात व मुख्यालयी असतात का हे शोधावे. ‘तलाव तेथे मासोळी’ अभियानाला प्रोत्साहन दिले पाहिजे. रोहयोतून प्राधान्याने पांदन रस्त्याची कामे करावी.  त्यामुळे शेतकऱ्यांना सुविधा मिळणार आहे. जिल्ह्यात कुपोषणग्रस्त बालक आढळून येणार नाही याकडे लक्ष दयावे. जिल्ह्यातील शाळांमध्ये शौचालयाची व्यवस्था चांगल्याप्रकारे असावी. नादुरुस्त शौचालय तातडीने दुरुस्त करावी. शाळांमध्ये शुध्द व स्वच्छ पाणी उपलब्ध झाले पाहिजे. जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळा इंटरनेटने जोडल्या पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
      श्री.ठाकरे यावेळी म्हणाले, जिल्हा परिषदेच्या विविध विभागाने समन्वय साधून ग्रामीण विकासाच्या दृष्टीने प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यासाठी योग्य समन्वय राखला पाहिजे. जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून गावोगावी शौचालयाचा वापर करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असल्याने ग्रामस्थ आता मोठ्या प्रमाणात शौचालयाचा वापर करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
      यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेचे सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती यांनी विविध समस्या मांडल्या. उपस्थित विविध विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची व तिथल्या प्रगतीबाबतची माहिती यावेळी दिली.
      आढावा सभेला पं.स.सभापती सर्वश्री अरविंद शिवणकर (अर्जुनी/मोर), कविता रंगारी (सडक/अर्जुनी), माधुरी रहांगडाले (गोंदिया), दिलीप चौधरी (गोरेगाव), हिरालाल फाफनवाडे (सालेकसा) यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री.मुंडे, जि.प.मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.मडावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्वश्री वाळके, श्री.पारखे, श्री.राठोड, श्री.बागडे, श्री.भांडारकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.विश्वकर्मा, जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिलींद रामटेके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री.चंद्रिकापुरे यांच्यासह सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.