जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday, 1 July 2017

कृषि क्षेत्रातील क्रांती ही वसंतराव नाईकांमुळे - पालकमंत्री बडोले

     जिल्हा परिषदेत कृषि दिन साजरा
• आदर्श शेतकऱ्यांचा सत्कार
         शेतकरी जगला तर देश जगेल या भावनेतूनच माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांनी काम केले. शेतकऱ्यांसाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. ते खऱ्या अर्थाने शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी कृषि विद्यापीठाची स्थापना केली. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या. कृषि क्षेत्रात झालेली क्रांती ही वसंतराव नाईकांमुळेच आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांची जयंती आज 1 जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात कृषि दिन म्हणून साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, गोंदिया पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, प्रगतीशील शेतकरी रेखलाल टेंभरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांची उपस्थिती होती.
       पालकमंत्री यावेळी म्हणाले, देशाच्या संदर्भात विचार केल्यास मागील दोन वर्षात कृषि क्षेत्रातील उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. स्वामीनाथन आणि वर्गीस कुरियन यांनी केलेल्या संशोधनामुळे कृषि व दुग्ध क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. शेती, पाणी व उत्पादित मालाची योग्य बांधणी न केल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. धानाची उत्पादकता वाढली पाहिजे यासाठी चांगले बीज शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दयावेत. सेंद्रीय धान उत्पादनाची चळवळ जिल्ह्यात उभी राहिल्यास आपण भक्कमपणे सेंद्रीय धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
      केंद्र व राज्य शासनाच्या कृषिशी संबंधित अनेक योजना आहेत असे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. जिल्ह्यात वन, पाणी मुबलक असतांना आपण मानव विकास निर्देशांकात कमी आहोत. आपण मागे का राहिलो याचा विचार करणे गरजेचे आहे. येत्या दोन वर्षात जिल्ह्यातील एक हजार तलावातील गाळ काढून त्यांची सिंचन क्षमता वाढविण्यात येईल. त्यामुळे कृषि क्षेत्रात बदल झालेला दिसेल. शेतकऱ्यांनी मत्स्य, दूध, फळ व भाजीपाला पिकांकडे वळले पाहिजे त्यामुळे आर्थिकस्थिती सुधारण्यास मदत होईल. रोजगार हमी योजनेतून पांदन रस्त्याची कामे घेण्यात यावी, त्यामुळे शेतातील उत्पादीत माल शेतकऱ्यांना बाजारपेठेत पोहोचविणे सहज शक्य होईल असे त्यांनी सांगितले.
      श्रीमती मेंढे म्हणाल्या, शेतकऱ्यांनी तांत्रिक पध्दतीने शेती करावी यासाठी अनेक योजना आहेत. या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे. जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असतांना आपण उत्पादनात मागे आहोत. शेतकऱ्यांनी आता शेतीपुरक व्यवसाय म्हणून कुक्कूटपालन, मत्स्यपालन व दुग्धव्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांपर्यंत कृषि विभागाने योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचवावी. त्यामुळे त्यांना योजनांचा लाभ घेणे सोईचे होईल असे त्या म्हणाल्या.
      जिल्हाधिकारी काळे म्हणाले, दुष्काळातून हरितक्रांतीकडे नेण्यास वसंतराव नाईकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. देश आज महासत्तेकडे वाटचाल करीत असतांना शेतीचा पाया भक्कम असणे गरजेचे आहे. आज शेतीचा खर्च वाढला असून उत्पन्न कमी होत आहे. सेंद्रीय शेतीची चळवळ जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने सेंद्रीय पध्दतीने धानपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना भरीव मदत करणे गरजेचे आहे असे सांगितले.
      श्रीमती गहाणे म्हणाल्या, कृषि‍ विकासाच्या दृष्टीने नियोजनाचा अभाव आहे. जिल्ह्यात सिंचनाच्या दृष्टीने येत्या तीन वर्षात तलावांचे खोलीकरण व कालव्यांची दुरुस्ती होणार असल्यामुळे शेतीची उत्पादकता वाढणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत कृषि विभागाच्या योजना पोहोचविण्याचे काम संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे करावे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम कृषि विभागाने करावे असे त्यांनी सांगितले.                                                 
       श्रीमती दसरे म्हणाल्या, शेतकऱ्यांना वेळोवेळी चांगले बी-बियाणे मिळाले पाहिजे याकडे कृषि विभागाचे लक्ष दयावे. चांगले बियाणे असल्यास पिकाची उत्पादन क्षमता निश्चितच वाढेल. शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या कोणत्याही योजना घेतांना अडचणी येणार नाही याची दक्षता घ्यावी असे त्या म्हणाल्या.
      श्री.कटरे यावेळी म्हणाले, शेतकरी सुजलाम सुफलाम करण्याचे काम वसंतराव नाईकांनी हरितक्रांतीच्या माध्यमातून केले. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विविध योजना राबविल्या. शेतीची उत्पादन क्षमता वाढीसाठी आज शेतीमध्ये अमुलाग्र परिवर्तन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करण्यासाठी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ दिला पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आदर्श शेतकरी देवाजी बनकर, योगेश चौधरी, सुनिल दाते, जगदिश बघेले, तुकाराम भोयर, कमलेश रहांगडाले, मनीष वर्मा, ऋषी टेंभरे, योगेंद्र बिसेन यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सेंद्रीय तांदूळाची पिशवी देवून सत्कार करण्यात आला. कृषि पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

      कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, आत्माचे संचालक हिंदूराव चव्हाण, कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे, आत्माचे उपसंचालक श्री.सराफ, कृषि अधिकारी श्री.निमजे यांच्यासह कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी व जिल्ह्यातून आलेले शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी केले. संचालन विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यांनी केले. उपस्थितांचे आभार कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे यांनी मानले.

पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड काळाची गरज - राजकुमार बडोले


धम्मकुटी येथे 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम
    



          कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पडतो आहे. वातावरणातील ओझोन वायुचे प्रमाण कमी होत आहे. अनेक विषारी किरणे पृथ्वीवर येत आहेत. उत्तर धृवावरचा बर्फ वितळताना दिसतो आहे. या सर्व घडामोडी पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे घडून येत आहे. पृथ्वीचे संरक्षण न झाल्यास पृथ्वी नष्ट होण्याची भिती वाटत आहे. बिघडलेल्या पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्ष लागवड आज काळाची गरज झाली आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
        आज 1 जुलै रोजी सडक/अर्जुनी तालुक्यातील डव्वा/पळसगाव जवळील सम्यक संकल्प धम्मकुटी येथे 4 कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्हास्तरीय वृक्ष लागवड कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, उपवनसंरक्षक एस.युवराज, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी प्रदिपकुमार बडगे, भंते संघधातू, तहसिलदार विठ्ठल परळीकर, जैवविविधता समिती डव्वाचे अध्यक्ष विलास चव्हाण, माजी जि.प.सदस्य श्रीमती किरण गावराणे, पं.स.सदस्य जोशीला जोशी, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.भुमेश्वर पटले, पुष्पमाला बडोले, विठ्ठल साखरे, चेतन वडगाये यांची मंचावर उपस्थिती होती.
        पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, यंत्रणा आणि संस्थांनी जिल्ह्याला दिलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हा लोकाभिमुख झाला पाहिजे. पिवळ्या पळसाची लागवड पुढील वर्षीपासून रस्त्याच्या दुतर्फा केल्यास सौंदर्यात भर पडण्यास मदत होईल. आपला जिल्हा भाग्यशाली आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने तलाव असून 50 टक्के भूभाग हा वनाने आच्छादीत आहे. जीवसृष्टीचा विनाश थांबविणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लागवड केल्यास त्याची जोपासणा केल्यास ही वृक्ष लागवड मोहीम यशस्वी होईल.
       वन समित्यांनी राजकारण न करता वनहक्क पट्टयांचे वाटप करावे असे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्यात वनपर्यटन वाढविण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. पर्यावरणातून पर्यटन आणि त्यामधून समृध्दी कशी येईल यादृष्टीने काम झाले पाहिजे. जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करुन त्याला ट्रीगार्ड लावून वृक्षाचे संगोपन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
       जिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी 15 लाख खड्डे करण्यात आले आहे. जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पळसांची झाडे आहेत. त्यापैकी पिवळ्या पळसाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीत तरतूद करण्यात आली असून टिश्यू कल्चरच्या माध्यमातून 2 लाख पिवळ्या पळसाची रोपटे तयार करण्यात येतील. परदेशी वृक्षाची लागवड न करता केवळ देशी वृक्षांची लागवड राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच होत असल्याचे त्यांनी सांगितले.
       श्री.मोहिते म्हणाले, आपण सर्वजन सुजान नागरिक आहोत. वृक्षाचे महत्व आपणाला माहित आहे. प्रत्येकाला कोणते ना कोणतेतरी फळ नक्कीच आवडते. आज आपण आपल्या आजोबांनी वृक्ष लावल्यामुळेच आज त्या वृक्षांची फळे खायला मिळत आहे. विद्यार्थ्यांनी सुध्दा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
       श्री.बडगे म्हणाले, राज्याचे वनाच्छादीत क्षेत्र 35 टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे वृक्ष लागवड मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. केवळ वृक्ष लागवड करुन चालणार नाही तर ती वृक्ष जगविणेही महत्वाचे आहे. लावलेल्या वृक्षांचा उपयोग भविष्यात निश्चितच होईल. आज पर्यावरण संकटात आहे. पाणी सुध्दा सुरक्षीत राहिलेले नाही. पिण्याचे पाणी सुध्दा विकत घ्यावे लागेल हा विचार कोणी केला नसेल. 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे’ हे सांगून पर्यावरणाचे महत्व तेव्हाच विषद केले आहे.
       प्रास्ताविकातून माहिती देतांना श्री.युवराज म्हणाले, यावर्षी 1 ते 7 जुलै दरम्यान 4 कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्याला 12 लाख 30 हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात 15 लाख 97 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवड मोहिमेत विविध यंत्रणा, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि सेवाभावी संस्था सहभागी आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत 400 रोपांची लागवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

       यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह अन्य मान्यवरांनी सम्यक संकल्प धम्मकुटीच्या परिसरात वृक्ष लागवड केली. डव्वा व परिसरातील शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी.एस.राठोड, एस.के.खांडेकर, पी.व्ही.फुले, डी.डी.नागपुरे, युनूस पठाण, पी.एम.राघोर्ते, एस.आर.गडवार, आर.आर.काळबांधे, ए.बी.बडगे, जी.डब्ल्यू मोहतूरे, विलास गौतम, के.एस.भोयर, डी.डी.माहुरे, एस.सी.बघेले, व्ही.एस.नागरीकर, डी.पी.मुंगूलमारे, महेश तिरपुडे, व्ही.पी.बडोले, सुरेश मेंढे तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे सी.बी.लांडगे व शितल काईट यांनी परिश्रम घेतले. संचालन अरविंद बडगे यांनी केले. उपस्थितांचे आभार वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.राठोड यांनी मानले. 

Friday, 30 June 2017

निलक्रांतीतून जीवनमान उंचावण्यास मदत - अनूप कुमार

तलाव तेथे मासोळी अभियान कार्यशाळा
• मास्टर्स ट्रेनर्सला प्रमाणपत्र वाटप
                                       • अभियानाचे सादरीकरण

          जिल्ह्यातील ढिवर व भोई समाज बांधवांची 300 वर्षाची मासेमारीची परंपरा आहे. पारंपारीक पध्दतीने ते आजही मासेमारी करतात. आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मत्स्योत्पादन घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक गावाशेजारी असलेल्या तलावातून मोठ्या प्रमाणात मत्स्योत्पादन घेतल्यास निलक्रांतीला दिशा मिळेल आणि मासेमारी करणाऱ्या बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले.
       आज 30 जून रोजी जिल्हा परिषद गोंदिया, मत्स्य विभाग आणि अदानी फाउंडेशन यांच्या संयुक्त वतीने अदानी प्रकल्पातील सभागृहात आयोजित तलाव तेथे मासोळी कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून श्री.अनूप कुमार बोलत होते.
       कार्यशाळेचे उदघाटन जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अदानी प्रकल्पाचे प्रमुख सी.पी.साहू, पं.स.सभापती उषा किंदरले, जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रभारी प्रादेशिक उपायुक्त समीर परवेज यांची उपस्थिती होती.
       श्री.अनूप कुमार यावेळी म्हणाले, या अभियानामुळे शेतीपुरक व्यवसायाला चालना मिळेल. गोड्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात मत्स्योत्पादनासाठी होणार आहे. तलाव तेथे मासोळी या अभियानामुळे कुटूंबाचे दरडोई उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात असलेल्या तलावांच जास्तीत जास्त वापर मत्स्योत्पादनासाठी करण्यात यावा. माशांचा आहार केल्यास त्यामधून मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स मिळते. प्रोटिन्समुळे मेंदूचा विकास होतो. संतुलीत आहारासाठी प्रोटीन्स आवश्यक आहे. मागास व आदिवासी भागात तलाव बोड्यामधून मासोळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेवून व आहारात त्याचा वापर करुन प्रोटीन्सची कमतरता भरुन काढता येईल. त्यामुळे कुपोषण टाळण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
      आदिवासी व दुर्गम भागात पोषणाच्या दृष्टीने आहारामध्ये मासोळीच्या वापरास प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे सांगून श्री.अनूप कुमार म्हणाले, अन्नसाखळीत प्रोटीन्सची उपयुक्तता वाढविण्यासाठी माशांचे उत्पादन वाढले पाहिजे. उत्पादीत माशांची विक्री व्यवस्था मजबूत करणेही गरजेचे आहे. मत्स्यव्यवसायासाठी तांत्रिक मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. शीतकरणाच्या माध्यमातून विपणन वाढविणे गरजेचे आहे. विपणन व्यवस्था सुदृढ करणे हा या अभियानाचा एक भाग आहे. प्रत्येक महसूल मंडळात एक तलाव मत्स्य बोटूकलीसाठी आणि दहा तलाव मत्स्यसंवर्धनासाठी निवडावे. मास्टर्स ट्रेनर्सनी मार्गदर्शकाच्या भूमिकेतून काम करावे असेही त्यांनी सांगितले.
      श्रीमती मेंढे म्हणाल्या, आपला जिल्हा हा तलावांचा जिल्हा आहे. मत्स्यव्यवसायाच्या स्पर्धेत जिल्हा अग्रभागी आहे. मासेमार बांधव तलाव ठेक्याने घेवून मासेमारीवर आपली उपजिविका करतात. हा व्यवसाय पुढे गेला पाहिजे, मत्स्य उत्पादन मोठ्या प्रमाणात करुन इतर राज्यात व देशात त्याची निर्यात झाली पाहिजे. मत्स्य सहकारी संस्थांना तलाव हे मत्स्य व्यवसायासाठी मिळाले पाहिजे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.                                                                                     श्री.ठाकरे म्हणाले, जिल्ह्यात मत्स्य उत्पादन अल्प प्रमाणात होत असल्यामुळे मासेमार बांधवांचा आर्थिकस्तर उंचावण्यास अडचण येत आहे. मासेमार बांधवांना चांगल्या प्रकारचे मत्स्यजीरे व बोटूकली मिळाली पाहिजे. जिल्ह्यातील मासेमार बांधवांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी तलाव तेथे मासोळी अभियान उपयुक्त ठरणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून मासेमार बांधवांना सक्रीय पाठबळ उत्पादन वाढीसाठी मिळत आहे. दहा महिन्यानंतर जिल्ह्यात मत्स्य क्षेत्रात वेगळे चित्र दिसेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
       विभागीय आयुक्त यांनी तलाव तेथे मासोळी अभियानाबद्दल सादरीकरण केले. सादरीकरणातून अभियानाचे उद्दिष्ट, गोड्या पाण्यातील मत्स्यशेती, तलावांची उत्पादकता, मत्स्य आहार सकस आहार याविषयी विस्तृत माहिती उपस्थितांना दिली.
       तलाव तेथे मासोळी अभियानाअंतर्गत 23 ते 24 जून दरम्यान नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथे श्री.नितीन गडकरी कृषि व कौशल्य विकास केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या मत्स्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी, मत्स्य सखी, समुदाय मत्स्य व्यवस्थापक या मास्टर्स ट्रेनर्सला मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी मास्टर ट्रेनर विनोद मेश्राम, रिना रॉय व कल्पना नागपूरे यांनी मनोगत व्यक्त केले.
       कार्यशाळेला जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पथाडे, उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, गंगाराम तळपाडे, वर्षा लांडगे, तहसिलदार संजय रामटेके, उपविभागीय कृषि अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, तालुका कृषि अधिकारी प्रदिप पोटदुखे, मत्स्यविकास अधिकारी श्रीमती सलामे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाचे जिल्हा समन्वयक श्री.मुंजे, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विविध मत्स्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी, मत्स्य सखी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविक मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रभारी प्रादेशिक उपायुक्त समीर परवेज यांनी केले. संचालन सविता तिडके यांनी केले. उपस्थितांचे आभार अदानी फाउंडेशनचे प्रमुख नितीन शिराळकर यांनी मानले.
ी, विविध मत्स्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी, मत्स्य सखी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविक मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रभारी प्रादेशिक उपायुक्त समीर परवेज यांनी केले. संचालन सविता तिडके यांनी केले. उपस्थितांचे आभार अदानी फाउंडेशनचे प्रमुख नितीन शिराळकर यांनी मानले.

सिंदीटोला येथे तलाव तेथे मासोळी अभियानाचा शुभारंभ


        जिल्ह्यातील जास्तीत जास्त तलावातून मत्स्योत्पादन घेवून यावर उपजिविका करणाऱ्या कुटूंबियांचे जीवनमान उंचावण्यासाठी तलाव तेथे मासोळी अभियान उपयुक्त ठरणार आहे. या अभियानाचा शुभारंभ 30 जून रोजी तिरोडा तालुक्यातील सिंदीटोला येथे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा मेंढे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाचे मुख्याधिकारी सी.पी.साहू, नितीन शिराळकर, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रभारी प्रादेशिक उपायुक्त समीर परवेज, जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पथाडे, उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, गंगाराम तळपाडे, वर्षा लांडगे, तहसिलदार संजय रामटेके, उपविभागीय कृषि अधिकारी श्री.नायेनवाड, जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर, तालुका कृषि अधिकारी श्री.पोटदुखे, मत्स्यविकास अधिकारी श्रीमती सलामे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

       मत्स्यपालन सहकारी संस्था सिंदीटोलाचे अध्यक्ष श्री.शेंडे, उपाध्यक्ष रविंद्र देवतळे, सचित बी.एम.तुमसरे, सदस्य सर्वश्री कुवरलाल खुळसिंगे, योगराज शेंडे, मधुकर मारबते, संजय शेंडे, ओमप्रकाश तुमसरे, अनिल देवगडे, रुखमाबाई मारबते, तसेच तलाव तेथे मासोळी विभागीय अभियानाअंतर्गत मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षण घेतलेले 20 व्यक्ती यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोहू, कतला, मृगळ व सायप्रिनस जातीच्या माशाचे बोटूकली तलावात सोडण्यात आली.

Thursday, 29 June 2017

दुग्धवाढीसाठी पशुपालकांना सहकार्य करणार - महादेव जानकर

देवलगाव येथे कृती शिबीर



     शेतीपुरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळले पाहिजे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा महत्वाचा ठरणार आहे. पशुपालकांनी दुधाळ जनावरांचे शास्त्रोक्त पध्दतीने संगोपन करावे. पशुपालकांना दुग्धवाढीसाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार, असे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.
       29 जून रोजी अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील देवलगाव येथे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाअंतर्गत आयोजित कृती शिबिराचे उदघाटक म्हणून श्री.जानकर बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, अर्जुनी/मोरगावचे पं.स.सभापती अरविंद शिवणकर, दुग्धविकास विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ.वाणी, जिल्हा उपायुक्त श्री.शहारे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, सरपंच कामदेव कापगते यांची उपस्थिती होती.
       श्री.जानकर यावेळी म्हणाले, 1 ते 7 जुलै दरम्यान राज्यात पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी-कर्मचारी गावोगावी जावून पशुपालकांना दुग्धवाढीसाठी मार्गदर्शन व मदत करणार आहेत. या योजनेमुळे निश्चितच दुग्धवाढीसाठी मदत होईल. विदर्भ आणि मराठवाड्यात दुधाचा महापूर आणण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आत्महत्यापासून परावृत्त करण्यासाठी हा प्रकल्प उपयोगी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असे सांगून श्री.जानकर म्हणाले, चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपले प्रोत्साहन राहणार आहे. पाळीव जनावरांसाठी सुध्दा ॲम्बुलन्स सेवा सुरु करण्यात येईल. त्यामुळे आजारी दुधाळ जनावराला वेळीच उपचार करता येईल. राज्यात अशाप्रकारे 298 ॲम्बुलन्स सुरु करण्यात येणार आहे. दुग्धव्यवसाय हा एटीएम आहे. या व्यवसायामुळे पैसा हाती खेळत असतो. जिल्ह्यात मत्स्य विकासाला सुध्दा चालना देण्यात येईल. जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांनी योजनांचा केवळ अनुदानासाठी लाभ न घेता त्या योजना प्रभावीपणे राबविल्यास जीवनमान उंचावण्यास मदत होईल. ओबीसी बांधवांसाठी सुध्दा या योजनांचा लाभ देण्यात येईल असे सांगितले.
      पालकमंत्री श्री.बडोले म्हणाले, दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून महिलांच्या हाती पैसा खेळता राहील. जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरले जाणार आहे. जिल्ह्यात दुधाचे उत्पादन कमी आहे. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाची निवड केल्यास चांगले दिवस येण्यास मदत होईल. देवलगाव या गावाची निवड दुग्धवाढीसाठी पथदर्शी प्रकल्पात करण्यात आली आहे. दुग्ध व्यवसायाला जिल्ह्यात चालना मिळण्यास हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देखील दुग्धवाढीसाठी जास्तीत जास्त निधी देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
       जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला चालना व दुग्ध उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आनंद यांचेमार्फत जिल्ह्यातील आठ तालुक्यातील प्रत्येकी 8 गाव असे एकूण 64 गावामध्ये प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने निवड केलेल्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील देवलगाव येथे या कार्यमोहीम शिबिराचा शुभारंभ दुग्धविकास मंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
       मान्यवरांनी दुधाळ जनावरांची पाहणी करुन पशुसंवर्धन विभागाने लावलेल्या स्टॉलला भेट देवून माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला पशुसंवर्धन विभागाचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.गोंडाणे, डॉ.पटले यांच्यासह त्यांच्या विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच देवलगाव येथील ग्रामस्थ व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शहारे यांनी केले.

00000

निलक्रांतीचा जास्तीत जास्त निधी गोंदियासाठी देणार - महादेव जानकर

सडक अर्जुनीत भोई/ढिवर समाजाचा मेळावा
                गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावातून ढिवर व भोई बांधव मोठ्या संख्येने पारंपारिक पध्दतीने मासेमारी करुन आपली उपजिविका करतात. जिल्ह्यातील मासेमारी बांधवांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासोबतच मोठ्या प्रमाणात मत्स्योत्पादन घेण्यासाठी निलक्रांती योजनेचा जास्तीत जास्त निधी गोंदिया जिल्ह्यासाठी देणार. असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.
       सडक/अर्जुनी येथील तेजस्वीनी लॉन येथे 29 जून रोजी आयोजित गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील भोई/ढिवर समाजाच्या विविध मागण्या संदर्भात आयोजित मेळाव्याचे उदघाटक म्हणून श्री.जानकर बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, सडक/अर्जुनीच्या पं.स.सभापती कविता रंगारी, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, जि.प.माजी उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, भाजपचे महामंत्री विरेंद्र अंजनकर, जि.प.सदस्य माधुरी पाथोडे, शिला चव्हाण, पं.स.सदस्य गिरीधारी हत्तीमारे, राजेश कठाणे, संजय केवट, गोंदिया जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष तिमाजी चाचेरे, उपाध्यक्ष अजय हलमारे, भंडारा जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, संघर्ष वाहिनी नागपूरचे संयोजक दिनानाथ वाघमारे, प्रा.अजय मोहनकर, सडक/अर्जुनी मच्छीमार संघाचे अध्यक्ष वासूदेव खेडकर यांची उपस्थिती होती.
      गोंदिया जिल्हा हा भविष्यात मासेमारीचा हब होईल असा विश्वास व्यक्त करुन श्री.जानकर म्हणाले, प्रशासनाने यासाठी जागा उपलब्ध करुन दयावी. त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. राज्याच्या मासेमारीचे धोरण उद्या म्हणजेच 30 जूनला जाहीर करण्यात येईल. गोड्या पाण्याला पुढे ठेवून हे धोरण जाहीर करण्यात येईल. 41 हजार कोटीचे कर्ज सागरी मासेमारी करणाऱ्यांना देण्यात आले आहे. त्या तुलनेत गोड्या पाण्यातील मासेमार उपेक्षीत राहिले. आता त्यांचे उपेक्षितपण संपणार आहे. नाबार्डकडून मत्स्य सहकारी संस्थांना मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करण्यात येईल असे ते म्हणाले.
       जिल्ह्यात मासेमारी संस्थांची नोंदणी करण्यासाठी भंडारा जिल्ह्यात जावे लागत होते असे सांगून श्री.जानकर पुढे म्हणाले, येत्या चार दिवसात या संस्थांच्या निबंधकाचे नोंदणी कार्यालय गोंदिया येथे सुरु करण्यात येईल. मागेल त्याला मत्स्यबीज व मत्सखाद्य देण्यात येईल. त्यामुळे आता मत्स्यशेती करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन करुन ते पुढे म्हणाले, ढिवर बांधवांना मासेमारीचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येईल यासाठी त्यांनी पुढे येण्याची गरज आहे. सीड, फीड, मार्केटींग आणि स्कीलचा अभ्यास केला तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. पालकमंत्री बडोले यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे. मासेमारीचा ग्रामपंचायत मार्फत ठेका देण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
      ढिवर व भोई बांधवांनी संघटीत होणे गरजेचे असल्याचे सांगून श्री.जानकर म्हणाले, निलक्रांती योजनेच्या माध्यमातून या समाजातील मुले एमपीएससी, युपीएससीची परीक्षा देवून प्रशासकीय अधिकारी कसे घडतील यासाठी मदत करण्यात येईल. जिल्ह्यातील मत्स्य, दुग्ध आणि पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. गोंदिया येथे जागा उपलब्ध झाल्यास मासेमारी संस्थांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येईल. मत्स्य व्यवसायाला आता शेतीचा दर्जा देण्यात आल्यामुळे निश्चितच या क्षेत्रात क्रांती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
      पालकमंत्री बडोले म्हणाले, निसर्गाने या जिल्ह्याला भरभरुन दिलेले आहे. इथले अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त जातीतील लोक मोठ्या प्रमाणात भूमीहिन आहेत, त्यामुळे या जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक कमी आहे. 67 टक्के भूभागातील जलावर मासेमारी होत असतांना सागरी क्षेत्र केवळ 35 टक्के आहे. मात्र सागरी मासेमारी करणाऱ्या मासेमाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली जाते. ही तफावत आता दूर करुन गोड्या पाण्यातील मासेमारी करणाऱ्या ढिवर बांधवांना सुध्दा मदत करण्यासाठी शासन वचनबध्द आहे. जिल्ह्यातील ढिवर/भोई समाज दारिद्रय रेषेखालील आहे. त्यांना दारिद्रय रेषेच्यावर आणण्यासाठी विविध योजना मत्स्य विभाग राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.                                                                               
       गोड्या पाण्यातील मासेमारीचा वाटा 64 टक्के असतांना त्यांच्यासाठी जास्तीत जास्त योजनांचा लाभ दिला पाहिजे असे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, मासे शीतगृहात ठेवण्यासाठी शीतगृहाच्या बांधकामासाठी अनुदान मिळाले पाहिजे. जिल्ह्यातील प्रत्येक तलावात मासेमारी झाली पाहिजे असे शासनाने धोरण आहे. पंजीबध्द असलेल्या मासेमारी संस्थांना मासेमारीसाठी तलावा मिळाले पाहिजे. जिल्ह्यातील मासेमारी बांधवांचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करुन श्री.बडोले म्हणाले, मत्स्य, दुग्ध व्यवसाय सहकारी संस्थांची नोंदणी गोंदिया जिल्ह्यात व्हावी यासाठी जिल्हा उपनिबंधकाचे कार्यालय गोंदिया येथे झाले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
       जिल्हाधिकारी श्री.काळे म्हणाले, गोड्या पाण्यातून मासेमारी करणाऱ्या मासेमारी बांधवांच्या अनेक अडचणी आहेत. दिवसेंदिवस तलावात येणारे शेतातील पाणी हे रसायनयुक्त असते. त्यामुळे या पाण्याचा तलावातील मासेमारीवर सुध्दा परिणाम झाला आहे. तलावाच्या परिसरातील शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असून यासाठी राज्यात केवळ गोंदिया जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन दिला आहे. सेंद्रीय शेतीचे अतिरिक्त 31 गटसुध्दा जिल्ह्यात तयार केले आहे. सेंद्रीय शेतीकडे मत्स्य विभागाने लक्ष दयावे असे सांगून ते म्हणाले, सेंद्रीय शेतीमुळे शेजारच्या तलावातून चांगली मासेमारी करता येईल.
     श्री.ठाकरे म्हणाले, तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया ओळखला जातो. मासेमारी ही इथल्या ढिवर बांधवांच्या उपजिविकेचे साधन आहे. प्रति माणसी उत्पन्नात आपण मागे आहोत. तलाव तेथे मासोळी हे अभियान विभागीय आयुक्तांचा उपक्रम आहे. या अभियानाचा जास्तीत जास्त फायदा ढिवर बांधवांना होणार असल्यामुळे त्यांच्या उपजिविकेच्या साधनात निश्चितच वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      श्रीमती गहाणे म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या बऱ्याच वर्षानंतरही भोई/ढिवर बांधवांच्या समस्या सुटलेल्या नाही. या बांधवांना शासन योग्यप्रकारे मदत करणार असून त्यांचे जीवनमान निश्चितच उंचावेल. तांडा वस्ती सुधार योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त ढिवर बांधवांच्या वस्तीला मिळाल्यास त्यांच्या विकासाला हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

      श्री.अग्रवाल म्हणाले, जिल्ह्यातील ढिवर/भोई बांधव पारंपारिक पध्दतीने मत्स्यव्यवसाय करतात. व्यवसाय करतांना त्यांना अनेक अडचणी येतात. या पारंपारीक व्यवसायाचे बळकटीकरण आवश्यक आहे. कृषि क्षेत्राप्रमाणे मत्स्यशेती करणाऱ्यांना सुध्दा अनुदान तसेच इतर प्रकारे मदत करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री.वलथरे व श्री.वाघमारे यांनीही आपले विचार व्यक्त केले. मेळाव्याला गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील भोई/ढिवर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अजय मोहनकर यांनी केले. उपस्थितांचे आभार श्री.कुऱ्हाडे यांनी मानले.

Tuesday, 27 June 2017

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’: ‘शेतकरी कर्जमाफी’ वर 2 जुलैपर्यंत प्रश्न पाठविण्याचे आवाहन

दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणारा मी मुख्यमंत्री बोलतोयहा कार्यक्रम यावेळी शेतकरी कर्जमाफीया विषयावर होणार असून, या कार्यक्रमासाठी शनिवार 2 जुलै 2017 पर्यंत प्रश्न पाठवावेत, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
प्रश्न पाठवून थेट या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी राज्यातील जनतेला उपलब्ध होणार असून, हे प्रश्न त्यांना mmb.dgipr@gmail.comया ई-मेल वर तसेच ८२९१५२८९५२ या क्रमांकावर व्हॅाटसॲपद्वारे रेकार्डिंग करून किंवा संदेश स्वरुपात पाठविता येतील, सोबत आपले छायाचित्रही पाठविता येऊ शकेल.
शेतकरी कर्जमाफी-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाया विषयावर आधारित असलेल्या या कार्यक्रमात कर्जमाफी योजनेचे निकष, योजनेची अंमलबजावणी, नियमित कर्जफेडीसाठी प्रोत्साहन, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, शेती क्षेत्रातील गुंतवणूक आदी सारखे विविध विषय समाविष्ट असतील.
या कार्यक्रमात कृषी, पशूसंवर्धन-दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विकास, सहकार व पणन तसेच शेतकऱ्यांच्या स्वावलंबनाविषयी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या सारख्या उपक्रमांचाही समावेश असेल.
०००० ��करण, शेती क्षेत्रातील गुंतवणूक आदी सारखे विविध विषय समाविष्ट असतील.

या कार्यक्रमात कृषी, पशूसंवर्धन-दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विकास, सहकार व पणन तसेच शेतकऱ्यांच्या स्वावलंबनाविषयी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या सारख्या उपक्रमांचाही समावेश असेल.
००००