जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday, 15 August 2020

कोरोना संकटावर मात करुन विकासाचा मार्ग प्रशस्त करणार - पालकमंत्री अनिल देशमुख

भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा


संपूर्ण जग आज कोरोना महामारीच्या विळख्यात सापडले आहे. प्रत्येकाने यावर मात करण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. कोरोना संकटावर सामूहिक प्रयत्नातून निश्चितच मात करू आणि विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

        भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाच मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालय येथे अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खवले व सहायक जिल्हाधिकारी सावन कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.

        स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद करताना श्री देशमुख म्हणाले,.. 1857 च्या उठावानंतर ते 1947 सालापर्यंत भारतीय नागरिकांनी देशावरील ब्रिटिशांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी 90 वर्षे संघर्ष केला. भारतीय क्रांतिकारकांच्या संघर्षातून आणि बलिदानातून आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारतीयांच्या संघर्ष आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाचे भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळाल्यांचे त्यांनी सांगितले.

        राज्यात महाआघाडी सरकार ह जनतेच्या मनातील अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी अथक परिश्रम घेत असल्याचे सांगून श्री देशमुख म्हणाले, संकटात सापडलेल्या व हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्याचे काम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 27 हजार 714 शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले असून आतापर्यंत 24 हजार 117 शेतकऱ्यांना 100 कोटी 28क्ष रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. खरीप हंगामात 54 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना आतापर्यंत 251 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केल्याचे त्यांनी सांगितले.

         श्री देशमुख पुढे म्हणाले, कोरूनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात खरीप हंगामात गर्दी टाळण्यासाठी 363 शेतकरी गटामार्फत 1405 मेट्रिक टन खत4768 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा शेतकऱ्यांच्या बांधावर करण्यात आला. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन स्टडी उपक्रम राबविण्यात आला. तसेच शिक्षक गृहभेटी देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देत असल्याचे त्यांनी सांगितले.

        जिल्ह्यात कोराना प्रादुर्भावाच्या काळात कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी संचारबंदीच्या काळात 612 गुन्हे दाखल केल्याचे सांगून श्री देशमुख म्हणाले, या गुन्ह्यांपोटी 41 लाख 74 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्ह्यातील 14 पोलिस अधिकारी आणि दोन होमगार्डला कोरोनाची बाधा झाली असून ते उपचार घेत असल्याचे ते म्हणाले.

         कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय ठप्प झाल असताना ग्रामीण भागातील मजुरांना या काळात रोजगार उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात आल्याचे सांगून श्री देशमुख म्हणाले, ही योजना जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरली आहे. 1 एप्रिल ते जुलै 2020 पर्यंत 61 कोटी 62 लाख रुपये निधी रोहयोच्या कामावर खर्च झाला. यातून 1 लाख 4 हजार 410 मजुरांना या काळात रोजगार पुरविण्यात आला. जिल्ह्यातील 1 लाख 56 हजार 680 धान उत्पादक शेतकऱ्यांना 359 कोटी 71 लाख रुपये बोनस म्हणून वाटप करण्यात आला. यंदा पहिल्यांदाच जिल्ह्यात मका उत्पादक 488 शेतकऱ्यांच्या 22 हजार 214 क्विंटल मक्याची आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आली. याची किंमत तीन कोटी 90 लाख 96 हजार 640 रुपये इतकी असल्याचे त्यांनी सांगितले.                          

          जिल्ह्यात कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगून श्री देशमुख म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त ॲन्टीजेन टेस्ट कराव्यात. शासन, प्रशासन, विविध यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्था अनेक आघाड्यांवर लढत आहेत. सफाई कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, परिचारिका, होमगार्ड, माजी सैनिक, पोलिस, महसूल, शिक्षण, नगरपालिका प्रशासन, कृषी व आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच अन्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी देखील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना योध्दे म्हणून लढत असल्याचे त्यांनी सांगितले.

       प्रारंभी पालकमंत्री श्री देशमुख यांनी ध्वजारोहण करुन ध्वजाला मानवंदना दिली. उपस्थित पाहुण्यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, श्रीमती बुलकुंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथीलेश चव्हाण,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, गोंदिया नगर पालिकेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे यांचेसह विविध विभागाचे निवडक अधिकारी-कर्मचारी सोशल डिस्टन्स ठेवून व तोंडाला मास्क लावून उपस्थित होते.


Monday, 29 June 2020

वनहक्क जमिनीचे प्रलंबीत प्रकरणे त्वरित मार्गी लावावीत - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले


         गोंदिया जिल्हा हा झुडपी जंगल व्याप्त आहे. अनेक शेतकरी, आदिवासी जमाती व इतर पारंपरिक वन निवासी यांची उपजिविका चालविण्यासाठी वनहक्क जमिनीचे पट्टे त्यांना मिळणे आवश्यक आहे. प्रशासनाकडे प्रलंबीत असलेल्या वनहक्क जमिनीचे पट्टे देण्यासाठीची प्रलंबीत प्रकरणे कायद्यानुसार तातडीने मार्गी लावण्यात यावीत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
         आज 29 जून रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री, विनोद अग्रवाल, सहेषराम कोरोटे, मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसरंक्षक तथा क्षेत्र संचालक श्री.रामानुजम, गोंदिया न.प.अध्यक्ष अशोक इंगळे, तिरोडा न.प.अध्यक्ष सोनाली देशपांडे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       श्री. पटोले पुढे म्हणाले, जिल्ह्यातील जंगली झुडपी भागात अनेक वर्षापासून आपली उपजिविका चालविणाऱ्या आदिवासी, शेतकरी बांधवांनी वनहक्क जमिनीचे पट्टे मिळण्याकरीता अर्ज केले असून जमिनीचे पट्टे न मिळाल्यामुळे अजुनही ते वंचित आहेत. त्यामुळे सर्व उपविभागीय अधिकारी यांनी  या संदर्भात वनहक्क जमीन पट्टे प्रकरणे तपासून कायद्यानुसार आवश्यक बाबींची पूर्तता करुन प्रलंबीत प्रकरणे मार्गी लावावीत, असे त्यांनी सांगितले.
        वनहक्क जमिनीचे पट्टे विषयी गावातील ज्येष्ठ नागरिकांकडून पुरावा घेवून नामंजूर करण्यात आलेली प्रकरणे पुन्हा तपासून या संदर्भात सकारात्मक भूमिका ठेवून शेतकरी, आदिवासी जमाती व इतर पारंपरिक वन निवासी बांधवांचे वनहक्क दाव्यांची प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्यात यावे असे श्री. पटोले यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.                  
      यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी श्रीमती स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी राहूल खांडेभराड, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा मार्केटींग अधिकारी गणेश खर्चे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गणेश घोरपडे, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार व इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
धान खरेदी बाबत आढावा
      शेतकरी बांधवांनी धान खरेदी केंद्रावर जावून धान विक्री करावी असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. आज 29 जून रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात धान खरेदी बाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री, विनोद अग्रवाल, सहेषराम कोरोटे, मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसरंक्षक तथा क्षेत्र संचालक श्री.रामानुजम, गोंदिया न.प.अध्यक्ष अशोक इंगळे, तिरोडा न.प.अध्यक्ष सोनाली देशपांडे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
        श्री. पटोले पुढे म्हणाले, खरीप व रब्बी धान उत्पादक शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर जावून धानाची विक्री करुन शासनाने जाहीर केलेल्या बोनसचा लाभ घ्यावा. या कामी कोणतेही मध्यस्थ यांचा आधार घेवून धान विक्रीची प्रक्रिया करु नये. काही व्यवसायी याकामी मध्यस्थी करुन शेतकरी बांधवांचा हक्क हिरावून घेण्याचे काम करीत आहेत. प्रशासनाने या संदर्भात एक समिती गठीत करुन धान खरेदी केंद्रावर कोणत्याही प्रकारची अनियमीतता असल्यास संबंधितांविरुध्द दंडात्मक कारवाई करावी. शेतकऱ्यांचे उत्पादित धान ठेवण्यासाठी योग्य त्या ठिकाणी गोदाम तयार करण्याकरीता संबंधीत उपविभागीय अधिकारी यांनी जागा उपलब्ध करुन द्यावी. त्यानंतर गोदामाच्या बांधकामा संदर्भात प्रक्रिया पूर्ण करुन नवीन गोदाम तयार करण्याची व्यवस्था करावी, असे त्यांनी सांगितले.

राईस मिलर्स उद्योजकांच्या समस्या तातडीने निकाली काढा - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले


      गोंदिया जिल्हा हा धान उत्पादन जिल्हा म्हणून ओळखला जातो. सन 1994 ते 2004 या कालावधीत स्थापन झालेल्या राईस मिल्सच्या प्रलंबीत अकृषक व एन.ओ.सी. बाबतच्या समस्या अजूनही जिल्हा स्तरावर प्रलंबीत असल्यामुळे ही प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
        आज 29 जून रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री, सहेषराम कोरोटे, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, गोंदिया न.प.अध्यक्ष अशोक इंगळे, तिरोडा न.प.अध्यक्ष सोनाली देशपांडे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसरंक्षक तथा क्षेत्र संचालक श्री. रामानुजम, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
        श्री. पटोले पुढे म्हणाले, राईस मिलर्सच्या समस्यांचे अर्ज अनेक वर्षापासून जिल्हा स्तरावर प्रलंबीत आहे. त्यामुळे राईस मिलर्स उद्योजकांना व्यवसायात अकृषक नसल्यामुळे नुकसान होत आहे. तसेच शासनाकडून दंड आकारण्यात येत आहे. या संदर्भात प्रशासनाने दखल घेवून प्रलंबीत प्रकरणांचे तातडीने निराकरण करण्यात यावे असे त्यांनी सांगितले.
       राईस मिलर्स यांचेकडून प्राप्त अर्जाची तालुका निहाय छाननी करुन उपविभागीय अधिकारी व संबंधीत तहसिलदार यांनी त्यांच्या अर्जात काही त्रुटी असल्यास संबंधितांना कळवावे व प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्यात यावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
       यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी श्रीमती स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी राहूल खांडेभराड, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा मार्केटींग अधिकारी गणेश खर्चे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गणेश घोरपडे, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार व इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
                                                         00000


















Friday, 26 June 2020

आज 2 रूग्ण कोरोनातून बरे झाले जिल्ह्यातील एका व्यक्तीचा नागपुरात कोरोना बाधित आढळून मृत्यू


                                        
  जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण उपचारातून बरे होऊन घरी जात आहे. आज 26 जून रोजी आणखी दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यात आता केवळ दोनच  कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहे.
      गोंदिया तालुक्यातील  मुंडीपार येथे राहून तिथल्या महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीतील एका उद्योग कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणारा व्यक्ती किडनीच्या आजारावरील उपचारासाठी 24 जून रोजी नागपूर येथे खाजगी रुग्णालयात भरती झाला होता. 25 जून रोजी त्याची प्रकृती ढासळली. याच दिवशी त्याची कोरोना चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. आज 26 जून रोजी त्याचा मेयो रुग्णालय नागपूर येथे सकाळी 7:45 वाजता मृत्यू झाला. विशेष म्हणजे या रुग्णाला किडनीच्या आजारासोबतच मधुमेह व उच्च रक्तदाब हा देखील आजार होता.
       आज 26 जून रोजी जिल्ह्यात नवा बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. आज आणखी 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत 102 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. तर केवळ 2 कोरोना क्रियाशील रुग्ण उपचार घेत आहे. आज जे 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले ते गोंदिया तालुक्यातील असून ते 20 ते 25 वर्ष वयोगटातील आहे.
       जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने कोरोनाचा संसर्ग आपणाला होऊ नये यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. प्रत्येकाने शारीरिक अंतर राखावे. वारंवार हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावे. कोणत्याही वस्तूला हाताळण्यापूर्वी आणि नंतर हात स्वच्छ धुवावे. हाताला सॅनिटायझर लावावे. सार्वजनिक ठिकाणी वावरतांना तोंडावर आणि नाकावर मास्क किंवा रुमालचा वापर करावा. सर्दी,ताप किंवा खोकला असल्यास नजीकच्या दवाखान्यात किंवा फिव्हर क्लीनिकमध्ये जाऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी.
        जिल्ह्यात आतापर्यंत 105 कोरोना बाधित रुग्ण आढळले. 102 रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यात क्रियाशील कोरोना रुग्णांची संख्या आता केवळ 2 इतकी आहे. तर नागपूर येथे कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णाचा नागपूर येथे आज मृत्यू झाला.
        जिल्ह्यात आढळलेले 105 कोरोना बाधित रुग्ण हे अर्जुनी/मोरगाव तालुका- 31,सडक/अर्जुनी तालुका- 10, गोरेगाव तालुका- 4, आमगाव तालुका-1, सालेकसा तालुका- 2, गोंदिया तालुका- 23 आणि तिरोडा तालुक्यातील 34 रुग्ण आहे.
        गोंदिया येथील प्रयोगशाळेत कोरोना संशयित 2351 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यामध्ये 105 रुग्ण हे कोरोना बाधित आढळुन आले. आज नागपूर येथे कोरोना बाधित आढळुन मृत्यू झालेल्या व्यक्तीचा देखील जिल्ह्यातील 105 बधितांमध्ये समावेश करण्यात आला आहे. 128 नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेतून प्राप्त व्हायचा आहे.
       जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 699 आणि घरी 1896 अशा एकूण 2595 व्यक्ती विलगीकरणात आहे. 
       जिल्ह्यातील चोवीस कंटेंटमेंट झोनपैकी  सालेकसा तालुक्यातील बामणी हे झोन वगळता उर्वरित 23 कंटेंटमेंट झोनमधील नागरिकांना उपलब्ध सेवामध्ये शिथीलता देण्याची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी आज दिली.
00000