जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 24 April 2020

कोरोना मुकाबल्यासाठी सर्व ग्रामपंचायत सज्ज



     कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे जग भयभीत झाले आहे. कोरोना हे आजच्या घडीला जगावर आलेले मोठे संकट आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन-प्रशासन एकजुटीने प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला या विषाणूची बाधा होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन हे आरोग्य यंत्रणा, पोलीस विभागासह अन्य यंत्रणांना सोबत घेऊन दिवस-रात्र काम करीत आहे.
        जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची जिल्हा परिषद काळजी घेत असून कोरोना विषाणूचा ग्रामीण भागात मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच 545 ग्रामपंचायती सज्ज आहेत. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये हॅन्डवॉश स्टेशन सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी हात कशाप्रकारे धुतले पाहिजे याची तांत्रिक माहिती देणारे बॅनर या सर्व ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आले आहे. सचित्र बॅनरवरून हात कशाप्रकारे धुवावे याची माहिती ग्रामस्थांना मिळत आहे. कोरोना विषाणुची बाधा होऊ नये यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे याबाबत जागृती करणारे बॅनर्स जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आले आहे. या बॅनरवरील माहिती वाचून नागरिक दक्ष होत आहे, सोबत इतरांना सुद्धा कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याबाबत माहिती देत आहेत.
        जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जंतूनाशकाची फवारणी करण्यात आल्यामुळे कोरोनासह अन्य आजारांना प्रतिबंध घालण्यात मदत झाली आहे. बहुतांश ग्रामपंचायतीच्या नाल्यांची साफसफाई करण्यात आली आहे. त्यामुळे रोगराईस प्रतिबंध करण्यास हातभार लागला आहे. ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यास जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी पुढाकार घेतल्यामुळे  ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. 
       कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात बाहेर राज्यात, जिल्ह्यात रोजगारासाठी  गेलेले गावातील व्यक्ती परत गावात आल्यास त्या व्यक्तीची तसेच विदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची माहिती  गावातील नागरिकांनी सरपंच, तहसीलदार यांना देऊन त्यांची आरोग्य तपासणी करून घेतली आहे. आरोग्य विभागाच्या सल्ल्याने आवश्यकता असल्यास त्यांचे घरीच अलगीकरण देखील करण्यात आले. त्यांच्यावर ग्रामस्थांचे लक्ष होते. यावरून कोरोना विषाणूबाबत ग्रामस्थ किती जागृत आहेत हे यापूर्वीच दिसून आले आहे. गावातील काही गरीब व गरजू व्यक्ती आहेत ज्यांना योजनांचा लाभ मिळू शकत नाही अशांच्या मदतीसाठी  ग्रामपंचायत आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत देखील केली आहे. काही ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना मास्कचे वाटप केले आहे. कोरोनविरुद्धची ही लढाई जिंकण्यास जिल्ह्यातील ग्रामपंचायती तयारीनिशी सज्ज झाल्या आहेत. ग्रामस्थांची सजगता, ग्रामपंचायतींनी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, शासन आणि प्रशासनाचे लाभलेले पाठबळ यातून कोरोनाविरुद्धची लढाई ग्रामपंचायती निश्चितच जिंकतील.
00000

Wednesday, 22 April 2020

माविमच्या महिला करताहेत जनजागृती,मास्क निर्मिती आणि बिझनेस करस्पाँडंट म्हणूनही काम





संपूर्ण जग आज कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करीत आहे. जगातील अनेक विकसित आणि प्रगत देशातील नागरिक या विषाणूच्या संसर्गाने बाधित होऊन मृत्युमुखी पडत आहे. बाधित होण्याचे आणि मृत्युचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे .आपल्या देशात आणि राज्यात देखील या विषाणूची बाधा पोहोचली आहे.आजवर या विषाणूवर लस उपलब्ध झालेली नाही. या विषाणूची संसर्ग साखळी तोडणे  हाच यावरचा सध्याचा उपाय आहे. गोंदियासारख्या दुर्गम, मागास,आदिवासीबहुल, नक्षलदृष्टया संवेदनशील आणि राज्याच्या टोकावर असलेल्या जिल्ह्यात कोणताही नागरिक हा या विषाणूने बाधित होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन आरोग्य विभागासह विविध यंत्रणांना सोबत घेऊन काम करीत आहे.
जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापित ग्रामीण आणि शहरी भागातील बचतगटांच्या महिला कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रशासनाला साथ देण्यासाठी उतरल्या आहेत. माविमच्या ह्या महिला गावोगावी पोस्टर्सच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जनजागृतीचा संदेश देत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयोगात येणार्‍या कापडी मास्कची निर्मिती करीत आहे.तर बँकेत अनुदानाची रक्कम काढण्यासाठी येणाऱ्या ग्रामीण लाभार्थ्यांची बँकेत होणारी गर्दी टाळण्यासाठी त्या लाभार्थ्यांना घरपोच अनुदानाची रक्कम बँक करस्पाँडंट या नात्याने ह्या महिला काम करीत आहे.
माविमच्या बचतगटातील महिला ह्या जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गावोगावी पोस्टर्सवर संदेश लिहून जनजागृती करीत आहे. पोस्टर्सवर  लिहिलेल्या घरीच राहा ,सुरक्षित राहा, खोकतांना किंवा शिंकतांना रुमाल किंवा मास्कचा वापर करा, शासनाच्या आदेशाचे पालन करा,वेळोवेळी हात स्वच्छ धुवा अनावश्यक घराबाहेर पडू नका, गर्दी करू नका असे संदेश या महिला सामाजिक अंतर ठेवून आणि नाक व तोंडाला रुमाल किंवा मास्क लावून गावात घरोघरी देत असल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात कोरोना विषाणूबाबत नागरिकांमध्ये जागृती होत असून लोक दक्षता घेऊ लागले आहे.कोरोना विषाणूचे  गांभीर्य लोकांना त्यांच्या संदेशातून होऊ लागल्याने त्याबाबतचे प्रत्यक्ष आचरण देखील लोक करू लागले आहेत. बचतगटातील महिला कोरोनविषयी जनजागृती करू लागल्याने प्रशासन आणि आरोग्य विभागाला या महिलांची मदत होऊ लागली आहे.
            कोरोनाबाबत जनजागृती करण्यास बचत गटातील महिलांनी पुढाकार तर घेतला आहेच.यापुढेही जाऊन त्यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नाक आणि तोंड झाकण्यासाठी वापरण्यात येणारे कापडी मास्क तयार करून विक्री देखील केली आहे. माविमच्या गोंदिया येथील उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्राच्या कापडी पिशवी उद्योग निर्मिती केंद्रामध्ये ग्रामीण व शहरी भागातील बचतगटांच्या महिला आधुनिक शिलाई मशीनवर कापडी मास्क तयार करीत आहे. आतापर्यंत या महिलांनी 21600 मास्क तयार करून त्याची विक्री देखील केली आहे. मास्क निर्मितीतून या महिलांना रोजगाराचे एक साधन उपलब्ध झाले आहे.जिल्ह्यात कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मास्क निर्मिती करून महिलांनी आपले योगदान दिले आहे .
गर्दी टाळणे आणि सामाजिक अंतर ठेवणे हा सुद्धा कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजनेचा एक भाग आहे.अनेक योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा होत आहे. ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक आहे अशा लाभार्थ्यांना माविमच्या 52 बँक करस्पाँडंट महिला ह्या त्यांच्याजवळ असलेल्या मायक्रो एटीएमच्या माध्यमातून घरबसल्या प्रधानमंत्री जनधन योजना, शेतकरी सन्मान योजना, उज्वला गॅस योजना, संजय गांधी निराधार योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यासह अनेक अन्य योजनांचे अनुदान किंवा मजुरीची रोख रक्कम घरबसल्या लाभार्थ्यांना देत असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्याची बँकेतुन पैसे काढण्यासाठी होणारी पायपीट तर थांबली आहेच सोबतच कोरोना विषाणूच्या संसर्गापासून विविध योजनेच्या लाभार्थ्याचा बचाव करण्यास माविमच्या बँक करस्पाँडंट मदत होत आहे.
 जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील माविमच्या 6028 बचतगटातील हजारो महिला या विषाणूचा जिल्ह्यात संसर्ग रोखण्यासाठी पुढाकार घेत आहे.पोस्टर्सवरील संदेशाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे.कापड मास्क तयार करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यास महिलांचा प्रत्यक्ष हातभार लागत आहे.लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील गरीब लाभार्थ्यांची  अनुदानासाठी बँकेत येण्याची पायपीट थांबवून कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी लाभार्थ्यांना घरीच बायोमेट्रिक पध्दतीचा वापर करुन मायक्रो एटीएममधून अनुदानाची रोख रक्कम उपलब्ध होत असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या लढाईत माविमच्या बचतगटातील महिला देखील आपले योगदान देत आहे.

                                                                                                       विवेक खडसे,गोंदिया

Thursday, 16 April 2020

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विशेष दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा - पालकमंत्री अनिल देशमुख

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला जिल्ह्याचा आढावा

\
    कोरोना विषाणू संसर्ग जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाला होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
         आज 16 एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून  जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची  माहिती जाणून घेतली. गोंदिया येथून जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजीव दोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे,यांच्यासह इतर सर्व नोडल अधिकारी प्रामुख्याने या बैठकीला उपस्थित होते.
         पालकमंत्री देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेने आणि वैद्यकीय यंत्रणेने वेळीच उपचार केल्याने गोंदिया शहरातील एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा निगेटिव्ह होऊन घरी परतल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे व यंत्रणांचे अभिनंदन केले. जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर आपली कोणतीही आवश्यकता असल्यास आपण चोवीस तास उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. जिल्ह्यात लॉकडाऊनचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घरातच राहावे. सार्वजनिक ठिकाणी महत्वाच्या कामानिमित्त जातांना नाक आणि तोंड झाकण्यासाठी मास्क, स्वच्छ कापडाचे रुमाल किंवा दुपट्ट्यांचा वापर करावा. सर्वांनी सुरक्षित सामाजिक अंतर ठेवावे असे आवाहन देखील त्यांनी जिल्ह्यातील जनतेला यावेळी केले. 
         पोलीस विभागाने नाकाबंदीसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी/ कर्मचाऱ्यांसाठी उभारलेल्या ग्रीन शेडची पालकमंत्र्यांनी यावेळी प्रशंसा केली. जिल्ह्यात फिल्डवर कर्तव्यावर असणाऱ्या सर्व पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रीन शेड उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी पोलीस अधीक्षकांना दिले.
         जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी यावेळी सांगितले की, जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा सुरू केल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तू घरपोच सेवा पुरविण्यात येत आहे. नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी  जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने 24 तास नियंत्रण कक्ष, व्हाट्सअप हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना विषयक विविध शंकांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषद गोंदिया येथे 24 तास डॉक्टरांची सेवा हेल्पलाइनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यात 17 निवारागृहात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या 737 नागरिकांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
         पोलीस अधीक्षक शिंदे म्हणाले, जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात कलम 144 चे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. गोंदिया शहरातील गणेशनगर हा भाग कंटेन्मेंट झोनमध्ये येत असल्यामुळे पोलिसांचा या भागात पुढील 28 दिवस चोख पोलिस बंदोबस्त राहणार आहे. 553 नागरिकांना इमर्जन्सी पासेस देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन झाल्यापासून आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकरणात 186 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 3 हजार 877 वाहनचालकांवर कारवाई करून 7 लाख 99 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांना यावेळी दिली.

          जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी जिल्ह्याकरिता कोविड नमुन्यांची चाचणी प्रयोगशाळा उभारणीसाठी व्हेंटिलेटर खरेदीसाठी तसेच पोलीस प्रशासनाला मदतीसाठी 200 गृहरक्षक उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधीची मागणी यावेळी केली. तसेच जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात काम करणाऱ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, तलाठी, पोलिस व महसूल कर्मचारी जे फिल्डवर काम करतात अशा अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांनी यावेळी पालकमंत्र्यांना केली. 
         कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार माइल्ड, मॉडरेट व सिवियर या प्रकारच्या कोरोना संशयित  रूग्णांसाठी किंवा लक्षणे असलेल्या नागरिकांसाठी कोविड केअर सेंटर- 677 खाटाडेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर- 190 खाटा, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल- 200 खाटाचे उभारण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी यावेळी दिली. 
         जिल्ह्यात आज 9 व्हेंटिलेटर उपलब्ध असून 12 व्हेंटिलेटर खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच ट्रिपल लेअर मास्क 64 हजार 850 व एन-95 मास्क 1749 तसेच पीपीई किट 196 उपलब्ध असून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 4 खाटांचे कक्ष उभारण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दोडके यांनी यावेळी दिली.
                                                   00000



Wednesday, 15 April 2020

गोंदिया जिल्ह्यात एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही बारा हजार शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार - पालकमंत्री अनिल देशमुख


         गोंदिया जिल्ह्यातील ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशा बारा हजार कुटुंबांना जिल्हा प्रशासनातर्फे  कुटुंबास एक असे जीवनावश्यक वस्तूंचे संच देण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील एकही व्यक्ती  उपाशी राहणार नाही. अशी ग्वाही पालकमंत्री गोंदिया तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हावासीयांना दिली आहे.
         गोंदिया जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत एकूण 299288 कार्डधारक असून त्यावरील लोकसंख्या 1407078 आहे. यापैकी अंत्योदय कार्डधारक 79156 तर प्राधान्य कुटुंब योजना कार्ड धारक 139613 असे एकूण 218769 कार्डधारक आहेत. यावर नोंदविलेल्या 1025393 लोकसंख्येला एप्रिल, मे व जून या तीन महिन्याचे नियमित अन्नधान्य तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे प्रति मानसी पाच किलो तांदूळ यांचे मोफत वाटप होत आहे. तसेच मे व जून करिता अन्न सुरक्षा योजनेत समावेश नसलेल्या  85133 केशरी कार्ड धारकांची संख्या व त्यावरील 351269 लोकसंख्या यांना मे व जून या दोन महिन्याकरिता गहू प्रति किलो 8 रुपये व तांदूळ प्रति किलो 12 रुपये प्रमाणे प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ राज्य शासन उपलब्ध करून देत आहे.
       कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
00000

Friday, 10 April 2020

गोंदियातील तो युवक झाला कोरोनामुक्त


       जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने मागील महिन्यातच देशात प्रवेश केला. त्यातच गोंदिया येथील गणेशनगरचा एक युवक 17 मार्चला थायलंड या देशातून पर्यटन करून गोंदियात पोहोचला. जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलून तो कोरोना बाधित असल्याच्या शंकेने त्याला 25 मार्चला गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. आज 10 एप्रिल रोजी त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्याला कोरोनामुक्त झाल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले. यावरून त्याला आज घरी जाण्यासाठी सुट्टी देण्यात आली. 
         25 मार्चला या युवकाला गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यानंतर त्याचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. 26 मार्चला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे तो कोरोना बाधित असल्याचे सिद्ध  झाले. कोरोनाविषयक शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे वैद्यकीय चमू त्याच्यावर उपचार करीत होती. त्यानंतर 8 एप्रिलला दुसऱ्यांदा त्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले. त्या नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर पुन्हा  तिसऱ्यावेळी 9 एप्रिलला त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. आज 10 एप्रिल रोजी त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे आरोग्य विभागाने त्याचे समुपदेशन करून सुट्टी दिली. अखेर त्या युवकाने कोरोनामुक्त होऊन कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली.
*समुपदेशन आणि प्रतिबंध*
       गणेशनगर येथील त्या युवकाने कोरोनाविरुद्धची लढाई जिंकल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यापूर्वी त्याचे व त्याच्या परिवारातील सदस्यांचे वैद्यकीय चमूने समुपदेशन केले. आजपासून त्या युवकाला आणखी चौदा दिवस घरीच अलगीकरणात राहावे लागणार आहे. आरोग्यविषयक काळजी त्याने व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना घ्यावी लागणार आहे. आरोग्यविषयक काही तक्रारी असल्यास  तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याबाबत अवगत करावे लागणार आहे. दररोज आपल्या प्रकृतीची माहिती त्याने स्वतः वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे. दिवसातून अनेकदा हात पाण्याने स्वच्छ धुवावे लागणार आहे. त्या युवकाच्या कुटुंबाला  तो राहत असलेले घर व परिसर स्वच्छ ठेवावा लागणार आहे. घरातील व्यक्तींनी सुद्धा वारंवार पाण्याने हात स्वच्छ धुवावे अशा सूचना समुपदेशनातून त्यांना करण्यात आल्या आहे. डॉक्टरांची एक चमू त्याच्या घरी भेट देऊन त्याची नियमित तपासणी करणार आहे. त्या युवकाने नियमित पौष्टिक आहाराचे सेवन करावे असा सल्ला त्याला  समुपदेशनातून देण्यात आला आहे.
         तो युवक कोरोना बाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर तो राहत असलेल्या गणेशनगरचा परिसर यापूर्वीच येण्याजाण्यास पोलिसांनी प्रतिबंधित केला होता. आज 10 एप्रिल रोजी तो युवक  कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त जरी झाला असला तरी आजपासून म्हणजे 10 एप्रिलपासून पुढील 28 दिवस गणेशनगरचा परिसर नागरिकांना येण्या-जाण्यासाठी प्रतिबंधितच राहणार आहे. पोलीस बंदोबस्त 28 दिवस तेथे कायम राहणार आहे. या भागातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000

Tuesday, 7 April 2020

गोंदिया जिल्ह्यात 5100 मेट्रिक टन धान्याचे वाटप

                                    लॉकडाऊनच्या काळातील उपाययोजना
                                        एप्रिलपासून मोफत तांदूळ उपलब्ध


   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. 1 ते 7 एप्रिल 2020 या सात दिवसात गोंदिया जिल्ह्यातील 1,63,500 शिधापत्रिका धारकांना तब्बल 51000 क्विंटल धान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती गोंदियाचे जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3 7 अन्वये कारवाई करण्यात येईल असे त्यांना सूचित करण्यात आले आहे.
         जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या 2,18,544  कार्ड संख्या व त्यावरील लोकसंख्या 10,21,581 इतकी आहे. या लाभार्थ्यांना 998 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत 2 रुपये किलो दराने प्रती कार्ड 10 किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने प्रती कार्ड 25 किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे 20 रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना    2 रुपये किलो दराने प्रती व्यक्ती 2 किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने प्रती व्यक्ती 3 किलो तांदूळ दिला जातो.
          प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी प्रती महीने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे दिलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती 5 किलो तांदुळ या एप्रिल महिन्यापासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
*जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई*
            जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक  ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग,वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याच माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी दिली आहे.

Wednesday, 25 March 2020

काळाबाजार, साठेबाजी व ग्राहकांची लूट होणार नाही याची दक्षता घ्यावी - डॉ.कादंबरी बलकवडे



          कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभर 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसाचा लॉकडाउन करण्यात आला आहे. या दरम्यान सर्व जीवनावश्यक सेवा सुरळीत सुरू राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये.या लॉकडाउन दरम्यान कोणत्याही वस्तूंचा काळाबाजार, व्यापाऱ्यांकडे वस्तूंची साठेबाजी आणि दुकानात ग्राहक म्हणून येणाऱ्या नागरिकांची लूट होणार नाही याची पुरेपूर दक्षता यंत्रणांनी घ्यावी.असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले.
 25 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा आयोजित बैठकीत घेतला यावेळी डॉ. बलकवडे बोलत होत्या.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री चव्हाण,प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संगीता पाटील, उपविभागीय अधिकारी श्रीमती वंदना सवरंगपते, रवींद्र राठोड, गंगाराम तळपाळे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.नितीन कापसे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती
          डॉ. बलकवडे पुढे म्हणाल्या, जिल्ह्यातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहील आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्या वस्तू पोहोचतील यासाठी  पुरवठा विभागाने लक्ष द्यावे. वाजवी किमतीपेक्षा जास्त दराने कोणत्याही वस्तूंची विक्री ग्राहकांना होणार नाही त्यामाध्यमातून त्यांची लूट होणार नाही याकडे विशेष लक्ष असावे. स्वस्त धान्य दुकानातून ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांना व्यवस्थितपणे धान्याचा पुरवठा करण्यात यावा असे त्यांनी सांगितले.
      जीवनावश्यक वस्तूपैकी भाजीपाला खरेदी करण्यासाठी गोंदिया शहरातील भाजी बाजारात नागरिकांची गर्दी होणार नाही यासाठी भाजी बाजारातील काही दुकाने सुभाष हायस्कूलच्या मैदानात लावण्यात यावी असे सांगून डॉ. बलकवडे म्हणाल्या,त्यामुळे ग्राहकांची भाजीपाला खरेदीसाठी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. शहरातील सुपर मार्केटमध्ये ग्राहकांना स्वतः वस्तूंची निवड करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रत्येक ग्राहकाने वस्तू खरेदी करताना  तीन फुटाचे अंतर ठेवून  वस्तू खरेदी कराव्या.नगदी पैसे देऊन ग्राहकांनी वस्तू खरेदी करण्यापेक्षा  डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड,भीम ऍप्स, फोन-पे या ऑनलाइन पद्धतीने आर्थिक व्यवहार करून घेतलेल्या वस्तूंची भूगतान करावे असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक तालुकास्तरावर एक पथक गठित करण्यात आल्याचे सांगून डॉ.बलकवडे म्हणाला,या पथकाच्या माध्यमातून नागरिकांनी घराच्या बाहेर  न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गर्दी  टाळण्यासाठी किराणा दुकानात वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी थोड्या थोड्या संख्येने यावे.तीन फुटांचे अंतर ठेवून वस्तू खरेदी करण्याबाबत तसेच ज्या दुकानांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली आहे तेथे नियमांचे पालन होत नाही अशा दुकानदारावर कारवाई करून सदर दुकान बंद करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
आंतरराज्यीय व आंतरजिल्हा सीमा तपासणी नाक्यांवर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सहकार्य करावे.त्यांची अडवणूक होणार नाही या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे. असे सांगून त्या म्हणाल्या, सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी लक्ष देऊन भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हे वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यातून जिल्ह्यातील  कामानिमित्त गेलेले नागरिक  परत गावाकडे आले असतील तर अशांचा शोध घेऊन त्यांची यादी तयार करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी व त्यांचे समुपदेशन करून त्यांच्या  वास्तव्याच्या ठिकाणी त्यांना अलगीकरण करून ठेवावे. असेे निर्देश त्यांनी यावेळी महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.